मुंबई : दक्षिणेकडून उत्तर-पश्चिमेत सरकलेल्या मान्सूनने देशभर जोरदार धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच्या सात टक्क्यांच्या पावसाच्या तुटीपासून आता सोमवारी सकाळी देशाने एकत्रित सरासरी पार केली आहे. देशातील एकूण पाऊस सरासरीच्या दोन टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, पावसाचे विभागात समान वितरण न होता, ठराविक ठिकाणीच एकत्रित मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे विभागाची, राज्याची व देशाची एकत्रित सरासरी गाठली गेली असली तरी बहुतांश भागात अजूनही पेरणीयोग्य समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे देशाच्या अनेक भागात अजूनही पेरण्या खोळंबलेल्या आहेत. देशातील पावसाच्या सर्वाधिक तुटीच्या विभागात मराठवाडाही अजूनही आघाडीवर आहे.
कापसावर मररोगाचे संकट; असे करा उपाय
https://eagroworld.in/cotton-blight-crisis-do-so-solution/
सध्या, उत्तर भारतात तसे उत्तर-पश्चिम व पूर्व भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या जोडीलाच ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे उत्तर-पश्चिम व पूर्व भारतात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीपासून शिमला ते जम्मू-काश्मीरपर्यंतचे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील 736 रस्ते तर देशभरात एक हजाराहून अधिक रस्ते बंद केले गेले आहेत. गेल्या 2-3 दिवसातील पावसात देशभरात 60हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतपासून ते केरळपर्यंत अनेक ठिकाणी आज शाळांना सुटी देण्यात आली आहे.
दिल्लीत 41 वर्षांतील विक्रमी पाऊस
दिल्लीत 41 वर्षांतील विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (NCR) 24 तासांत रेकॉर्डब्रेक 153 मिलिमीटर पाऊस कोसळला. भारतीय हवामान खाते म्हणजेच India Meteorological Department (IMD) च्या माहितीनुसार, जुलै महिन्यात एकाच दिवशी सर्वाधिक पावसाची नोंद यापूर्वी 1982 मध्ये झाली होती. त्यावेळी 142 मिमी पाऊस कोसळला होता. आजही IMD ने दिल्लीसह, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-कश्मीरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. चीन, पाकिस्तानसह, ब्रिटन, जपान वैगेरे देशताही सध्या तुफानी पाऊस सुरू आहे.
मुसळधार पावसाचा पट्टा उत्तरेकडे सरकतोय
मुसळधार पावसासाठी कारणीभूत पट्टा सध्या उत्तर प्रदेशच्या दिशेने पुढे सरकताना दिसत आहे. त्यामुळे येत्या 4-5 दिवसात उत्तर भारतात मान्सून अतिसक्रिय राहू शकतो. उत्तर-पश्चिम भारत आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरात गडगडाटी वादळाच्या निर्मितीचे चिन्ह दिसत आहे. गेल्या 2 दिवसात पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भारतात जोरदार मान्सूनने दमदार हजेरी लावल्यामुळे हंगामातील आतापर्यंतच्या देशभरातील पावसाची आकडेवारी सुधारणा झाली आहे. पाच दिवसांपूर्वीच्या सात टक्क्यांच्या तुटीपासून आता सोमवारी सकाळी देशातील एकत्रित पाऊस दोन टक्क्यांपर्यंत वाढला आहे. देशाच्या अनेक विभागातील तूट मात्र कायम राहिली आहे.
झारखंडमध्ये पावसाची सर्वाधिक तूट
आतापर्यंत झारखंडमध्ये पावसाची सर्वाधिक तूट आहे. देशातील एकूण 36 उपविभागांपैकी अजूनही 15 उपविभाग तुटीत आहेत, असे IMDच्या रविवारी संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक 39 टक्के तूट आहे. याशिवाय मराठवाडयात 36 टक्के, पश्चिम बंगालच्या मैदानी भागात 34 टक्के, तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात 35 टक्के तूट आहे. याशिवाय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा विभागात पावसाची 30 टक्के तूट आहे. देशाच्या उर्वरित बहुतांश भागातही 20 टक्केपर्यंत तूट आहे.
राजस्थानात कमी दाबाचे क्षेत्र कायम
पावसासाठी अनुकूल कमी दाबाचे क्षेत्र सध्या दक्षिण-पश्चिम राजस्थानवर पसरलेले आहे. येत्या काही दिवसात कमी दाबाचा पट्टा आणि पावसाचे क्षेत्र (मान्सून टर्फ) कोटा, सतना, डाल्टनगंज, बांकुरा आणि पूर्वेकडे मणिपूरपर्यंत सरकत जाईल. पूर्वेकडील टोक म्हणजेच मणिपूर गाठून मान्सून पुन्हा एकदा पूर्व भारतातून बंगालच्या उपसागराकडे वळू शकते. त्यावेळी किंवा त्यापूर्वी चक्रीवादळ निर्माण होऊ शकते.
पूर्व भारतात मोठ्या पावसाची शक्यता
IMD ने पुढील पाच दिवसात बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूरच्या पहाडी प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या कालावधीत ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस झारखंड आणि बिहारमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसातील पश्चिम भारतातील पावसाच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या घाट भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील बहुतांश भागात येत्या दोन दिवसात फारशा पावसाची शक्यता नाही.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
https://youtu.be/vJ7zM35MvpM
केरळ, किनारी कर्नाटक भागातील पावसाचा अंदाज
पावसाची कमतरता असलेल्या मध्य भारतात, पुढील पाच दिवसांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी व्यापक ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतातही, पुढील पाच दिवसांत किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये हलक्या, मध्यम ते व्यापक पावसाचा अंदाज आहे.