जळगाव :- खिशात केवळ 150 रुपये असतांना मी कंपनी सुरु करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात देखील उतरविले. हे सर्व शक्य झाले ते फक्त स्वप्न पाहिल्यामुळे. तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर स्वप्न पहा व त्या पहिल्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन काम करा, असा सल्ला सनशाईन अॅग्री प्रा.लि.चे संचालक राजेश चौधरी यांनी अॅग्रोवर्ल्ड कार्यालयातील सहकार्यांशी संवाद साधतांना दिला.
सनशाईन अॅग्री प्रा. लि. चे संचालक राजेश चौधरी, संचालिका सौ. लिना राजेश चौधरी, युवा उद्योजक हर्ष राजेश चौधरी यांनी बुधवारी (दि. 5) अॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी अॅग्रोवर्ल्डच्या कामाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अॅग्रोवर्ल्डच्या सर्व सहकार्यांसोबत संवाद साधत त्यांच्या यशामागील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
श्री. चौधरी पुढे बोलतांना म्हणाले की, मी ज्या गोष्टीची सुरुवात केली ती अतीशय खडतर झाली. मग ते शिक्षण असो की कंपनीची सुरुवात. कुटूंबियांचा एकत्रित व्यवसाय असल्यामुळे कमी वयातच जबाबदारी आली, त्यामुळे सुरुवातीला शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. उशिराने शिक्षणाचे महत्व लक्षात आले. त्यानंतर मी पुढील उच्च शिक्षण घेतले. याच अनुभवातून मुलगा हर्ष चौधरी याला परदेशात उच्च शिक्षण दिल्याचे ते यावेळी म्हणाले.
खिशात केवळ 150 रुपये असतांना कंपनी सुरु करण्याचा विचार केला. त्यासाठी बँकेत गेलो तेव्हा बँकेने तारणसाठी काहीही नाही, असे सांगून नकार दिला. त्यानंतर काही नातेवाईक आणि मित्रांकडे गेलो. एका मित्राने मला दोन लाखांची तर दोन नातेवाईकांनी प्रत्येकी 1 लाखांची मदत केली. ते चार लाख रुपये घेवून बँकेत गेलो. ते बँकेत ठेवल्यानंतर बँकेने त्यावर 5 लाखांची सीसी दिली. त्यानंतर कंपनीला सुरुवात केली. त्यासाठी देखील नातेवाईकांची मदत घेवून व्यवसाय वाढविला. आज 4 कंपन्यांच्या माध्यमातून व्यवसाय 100 कोटींवर पोहोचला असल्याचेही त्यांनी सांगितले.
IMD चा आज कोकणसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट; उत्तर- मध्य महाराष्ट्र, विदर्भात ऑरेंज तर मराठवाड्यात यलो अलर्ट
https://eagroworld.in/imd-monsoon-tracking-konkan-red-alert-maharashtra-rain-today-agroworld-jalgaon//
गुणवत्तेला पहिले प्राधान्य
आम्ही पैशांपेक्षा गुणवत्ता आणि विश्वास याला नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच आमच्या उत्पादनांची मागणी इतकी आहे की, आम्ही ती मागणी पूर्ण करण्यात कमी पडत आहोत, असे नम्रपणे राजेश चौधरी यांनी सांगितले.
शिकण्याची आवडीने घडविले – हर्ष
युवा उद्योजक हर्ष चौधरी यावेळी बोलतांना म्हणाले की, मला लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना कॉम्प्युटर इंजिनिअर, सॉप्टवेअर इंजिनिअर व्हावे, अशी इच्छा होती. यासंदर्भात कुटूंबियांशी चर्चा केल्यानंतर केमिकल इंजिनिअर व्हायचे ठरविले. यामुळे व्यवसायात मदत होत असून काही महत्वाचे बदल केले असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. लीना राजेश चौधरी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.
अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. राज्य समन्वयक दिनेश चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. टेलिकॉलिंग इन्चार्ज किरण तायडे यांनी आभार मानले.