मुंबई : राज्य व केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. अशीच एक योजना हाती घेण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जात असून ही योजना फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर ठरणार आहे.
राज्यात फळबाग शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत फळबाग योजनेचा समावेश करण्यात आला असून 15 डिसेंबर 2022 रोजी या योजनेमध्ये केळी पिकासाठी अनुदान देण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून केळी लागवड करणाऱ्या दहा संवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत केळी पिकासाठी अनुदान घेण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत, यात लागवडीचे अंतर हे 1.841.50 मीटर ठेवावे लागणार आहे. योजनेत लाभार्थींनी क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे निकष विद्यापीठ शिफारसीनुसार ठरविण्यात आलेले आहेत.
योजनेअंतर्गत लागवड वर्षासह सलग तीन वर्षात मंजूर अंदाजपत्रानुसार अनुदान देय असते. यात केळी पिक लागवडीसाठी पहिल्या वर्षी प्रतिहेक्टर एक लाख 73 हजार 84 रुपये अनुदान मिळणार असून दुसऱ्या वर्षासाठी 43 हजार 748 रुपये मिळेल तर तिसऱ्या वर्षासाठी 36 हजार 200 रुपये अनुदान देण्याचे प्रावधान या योजनेत आहे. योजनेमध्ये अतिरीक्त कलमे किंवा रोपे यांचे अनुदान देय नसते. दरम्यान योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचा लाभ हा त्यांच शेतकऱ्यांना मिळणार आहे जे लाभार्थी बागायती शेतीसाठी कमीत कमी 20 टक्के तर कोरडवाहू वृक्षपिकांसाठी किमान 75 टक्के झाडे ही जिवंत ठेवतील, अशाच लाभार्थींना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देण्याचे ठरवण्यात आले आहे.
या संवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश
सदर योजनेचा लाभ या पुढील संवर्गातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यात अल्प व अत्यल्प लाभार्थी (पाच एकर पेक्षा कमी शेतजमीन), महिला लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटूंब प्रमुख असलेल्या कुटुंबियांना तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीस व पंतप्रधान आवास योजनेखालील लाभार्थी यांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
या फळपिकांसाठी अनुदान
फळबाग योजनेमध्ये केळी या पिकासोबतच अनेक फळपिकांच्या समावेश आहे. यात ड्रॅगनफ्रूट, अव्हाकॅडो, द्राक्ष, आंबा, चिकू, डाळिंब, बोर, सीताफळ, पेरु, कागदी लिंबु, मोसंबी, संत्रा, आवळा, कवठ, जांभुळ नारळ, चिंच, फणस, अंजीर, पानपिंपरी, शेवगा, काजू आदि फळ पिकांना तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध या फुल पिकांना सुद्धा अनुदान दिले जाणार आहे.
असे आहेत निकष
योजनेचे लाभार्थी होण्याचे काही निकष ठरविण्यात आले आहेत. ज्यात लाभार्थी हा नोकरदार व्यक्ती नसावा. तसेच लाभार्थी ऑनलाईन रोजगार कार्डधारक असावा. आणि या योजनेत पात्र होण्यासाठी लाभार्थीस ग्रामसभेची मंजुरी असावी व ग्रामपंचायत लेबर बजेटमध्ये त्याचा समावेश असावा लागतो त्यासाठीचा ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्याकडे कमीत कमी 0.05 हे. व जास्तीत जास्त 2.00 हे. प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा असणार आहे. इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व 7/12 च्या उताऱ्यावर कुळाचे नाव असेल तर योजना राबवत असताना कुळाची संमती घेणे देखील आवश्यक ठरणार आहे.
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे
फळबाग योजनेचे लाभार्थी होण्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
१ . जॉब कार्ड म्हणजेच मजूर कार्ड असणे आवश्यक आहे.
२ . लागवड करावयाच्या जागेचा 7/12 उतारा तसेच 8 ‘अ’ खाते उतारा आवश्यक असणार आहे.
३ . ग्रामपंचायतीने सादर केलेल्या लाभार्थी यादीत नाव असणे आवश्यक आहे.
४ . प्रपत्र ‘अ’ अर्जाचा नमुना प्रपत्र व संमतीपत्र आवश्यक ठरणार आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी संबंधित तालुक्यातील कृषी सहायक व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.