मुंबई : महात्मा बुद्ध यांच्या नावाने देशातील पहिल्या सरकारी कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची घोषणा करण्यात आली आहे. (Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya) सरकारी क्षेत्रातील या पहिल्या कृषी तंत्रज्ञान विद्यापीठामुळे बदलत्या काळातील शेतीचे तंत्र बांधापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. याशिवाय, वाढत्या मजूर समस्येच्या स्थितीत कृषी यांत्रिकीतील संशोधनाला चालना मिळणार आहे.
भारत सध्या अरब देशांमधून 16 लाख कोटी रुपयांचे तेल आयात करतो. देशातील साखर कारखाने इथेनॉलद्वारे तेल उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनण्यास मदत करू शकतात. एकदा देश तेल उत्पादनात स्वयंपूर्ण झाला, की परदेशाऐवजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील. त्यादृष्टीने संशोधनाला कृषी तंत्रज्ञान विद्यापीठामुळे चालना मिळणार आहे.
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे हे महात्मा बुद्ध कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ उभारले जाणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने कुशीनगरमध्ये कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले. त्यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच मार्चमध्ये सूतोवाच केले होते. हे कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ उत्तर प्रदेशसह देशभरात कृषी विकासासाठी एक परिसंस्था निर्माण करण्यास मदत करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
कुशीनगरमध्ये 390 एकर जागेत विद्यापीठ, 750 कोटींचा खर्च
कुशीनगरमध्ये 390 एकर जागेत हे कृषि तंत्रज्ञान विद्यापीठ उभारले जाणार आहे. त्यासाठी अंदाजे 750 कोटी रुपये खर्च येईल. 2026 पर्यंत या विद्यापीठाचे बांधण्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढच्या महिन्यात या कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाची पायाभरणी होण्याची शक्यता आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीमुळे पूर्व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, प्रगत शेती आणि तांत्रिक शेतीशी संबंधित माहितीसाठी संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वासही योगींनी व्यक्त केला. या कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या एकूण 1000 जागा भरल्या जातील.
नरेंद्र देव कृषी विद्यापीठाचे विभाजन
देवरिया, कुशीनगर भागातील हे पहिले विद्यापीठ असेल. उत्तर प्रदेशातील 10 जिल्ह्यांना या विद्यापीठाचा लाभ होणार आहे. यामध्ये गोरखपूर विभागातील चार, बस्तीमधील तीन आणि आझमगडमधील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. नरेंद्र देव कृषी विद्यापीठात एकूण 27 जिल्हे असून त्यापैकी 10 जिल्ह्यांचा आता महात्मा बुद्ध कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय, मंत्रिमंडळाने कौशांबी येथे ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना’अंतर्गत ‘इंडो-इस्त्रायल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर फ्रूट’ स्थापन करण्यासाठी नऊ हेक्टर जमीन फलोत्पादन विभागाला मोफत हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली आहे.
पहिल्या पावसानंतर वखरणी करताना शेतकरी
https://youtube.com/shorts/tk0kZiZ551o?feature=share
Mahatma Buddha Krushi VishwaVidyalaya क्षेत्र हे उत्तर प्रदेशातील शेतीचे प्रमुख केंद्र
कुशीनगरसह गोरखपूर आणि बस्ती मंडल या सातही जिल्ह्यांमध्ये ऊस, हळद आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. हा परिसर उत्तर प्रदेशातील शेतीचे प्रमुख केंद्र मानला जातो. अशा परिस्थितीत आता विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणासाठी इतरत्र जावे लागणार नाही. कुशीनगर जिल्ह्यातील अनेक लोक शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील अनेक भागांचा आजही मागास भागात समावेश आहे. मात्र, या मागास भागातील जमिनीतूनही सोने काढण्याची हिंमत शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या मेहनतीला आता संशोधनाचे बळ लाभणार आहे.
या विद्यापीठाच्या स्थापनेमुळे पूर्व उत्तर प्रदेशातील कृषी क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार कृषी शिक्षण, कृषी क्षेत्रातील विशेष संशोधन, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, कृषी क्षेत्रातील सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळू शकेल. त्यामुळे प्रतिकूल हवामानात पीक उत्पादनाच्या तंत्राला गती मिळेल.
भगवान श्री राम, गौतम बुद्ध आणि महावीर यांची पवित्र भूमी
कुशीनगर शहर हे युगानुयुगे प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे साक्षीदार राहिलेले आहे. या परिसराने शेतीद्वारे अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भगवान श्री राम, गौतम बुद्ध आणि महावीर यांच्या आठवणी या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. या देशाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. जर देश एका निश्चित संकल्पाने पुढे गेला, तर कशाचीही कमतरता राहणार नाही. त्यासाठी उत्तर प्रदेश सरकर आपली पूर्ण क्षमता वापरेल, असे योगी म्हणाले.
विद्यापीठ ठरणार फायदेशीर
1. कृषी विद्यापीठांतर्गत फलोत्पादन, वनीकरण व इतर विभागांची महाविद्यालये उघडण्यात येणार आहेत.
2. पदवी, पदव्युत्तर वर्ग आणि विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन करतील.
3. ऊस संशोधन केंद्राच्या सहकार्याने कृषी विद्यापीठ नवीन तंत्रज्ञान व वाण विकसित करणार आहे.
4. विद्यापीठ विशिष्ट प्रदेशाच्या गरजेनुसार विविध पिकांसाठी कृषी तंत्रज्ञान विकसित करेल.
5. सेंद्रिय शेतीबरोबरच नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल.
6. विद्यापीठ शेतकरी, पशुपालक, शेतकरी महिला आणि ग्रामीण युवकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करेल.