मुंबई : कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सरकार 15 ते 40 हजार रुपये देणार असल्याची बातमी आली आहे. कृषिप्रधान असलेल्या भारत देशात तरुणांचा कृषी शिक्षणाकडील ओढा कमी होत चालला आहे. त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण तर अतिशय कमी आहे. झपाट्याने बदलत चाललेल्या कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून सरकारची ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
भारतातील कृषी क्षेत्रात तसा महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. अनेक राज्यात महिला शेतीची बहुतांश कामे सांभाळत असतात. मात्र कृषि शिक्षणातील त्यांचा टक्का कमी आहे. महिलांनी कृषी बाजारपेठांचे तंत्र आणि अर्थकारण तसेच नवतंत्रज्ञान आत्मसात केल्यास त्याचा कृषी क्षेत्राला व ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो.
कृषी विद्यार्थी प्रोत्साहन योजना
कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी प्रोत्साहनपर रक्कम योजना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही योजना यंदाही सुरू राहणार आहे. अकरावी व बारावी कृषी शिक्षणासाठी 15 हजार रुपये, तर पदवी व पदव्युत्तरसाठी 25 हजार रुपये आणि पीएचडीसाठी 40 हजार रुपये दरवर्षी सरकारकडून दिले जाणार आहेत. ही आर्थिक मदत विद्यार्थिनींना शासनाच्या कृषी विद्यार्थी प्रोत्साहन योजनेंतर्गत दिली जाणार आहे.
राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा निर्णय
काँग्रेसचे सरकार असलेल्या राजस्थान राज्यात ही कृषी विद्यार्थी प्रोत्साहन योजना राबविली जात आहे. विद्यार्थिनींना देय असलेल्या प्रोत्साहन रकमेसाठी ऑनलाइन अर्ज 1 जुलैपासून सुरू होतील. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यामुळे विद्यार्थिनींची कृषी विषयात आवड वाढेल आणि त्यांना कृषी क्षेत्रात प्रगती साधता येईल. गेल्या वर्षीच्या प्रायोगिक योजनेचा आढावा घेऊन राज्याच्या कृषी आयुक्तालयाने शालेय विद्यार्थिनींना प्रोत्साहन रक्कम तीन पटीने वाढविण्याची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनुसार, राजस्थान युवा कौशल्य आणि क्षमता वृद्धिंगत कार्यक्रमात वाढीव प्रोत्साहन रकमेची तरतूद करण्यात आली.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
मूळच्या राजस्थानच्या असलेल्या (डोमिसाईल) मुलींनाच ही रक्कम दिली जाईल. त्यासाठी राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये कृषी विषयात शिकत मुली पात्र ठरणार आहेत. मागील वर्षी नापास झालेल्या विद्यार्थिनींना त्याच वर्गात पुन्हा प्रवेश घेतल्यावर प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार नाही. ज्या मुली सत्राच्या मध्यभागी कृषी अभ्यासक्रम सोडून इतर विषयांकडे वळतील, त्यांनाही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार नाही.