जगातील सर्वात लांब पायाची महिला असलेल्या एक्टेरिना लिसिना (Ekaterina Lisina) हिच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलेय का? महिलांमध्ये सर्वात लांब पाय असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तर तिच्या नावावर आहेच; पण तिच्यात आणखीही बरंच काही खास आहे. आपण जाणून घेऊया हे सारं काही “वंडर वर्ल्ड” सिरीजमधील या भन्नाट बातमीतून …
जगात महिलांमध्ये सर्वात लांब पाय असलेली एक्टेरिना लिसिना ही जगातील सर्वात उंच मॉडेलही आहे. याशिवाय, रशियामध्ये सर्वात मोठे पाय असलेली ती महिला आहे. किती असेल तिच्या पायाचे माप? तुम्ही अंदाज लावू शकाल का? महिलांमध्ये सर्वात लांब पाय असण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एक्टेरिना लिसिनाच्या नावावर आहे. तिचा डावा पाय 52.3 इंच आहे तर उजवा पाय 52 इंच इतका लांब आहे.
1 फूट म्हणजे 12 इंच. याचा अर्थ जिथे कितीतरी महिलांची एकूण उंची फक्त 4-4.5 फूट असते तिथे एक्टेरिनाच्या फक्त पायांचीच उंची 4 फूट 4 इंच इतकी आहे. तिची एकूण उंची 6 फूट 9 इंच आहे. या अद्भुत उंचीमुळे तिला रशियाकडून बास्केटबॉल खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्येही तिने यशस्वी कारकीर्द केली. क्रीडा आणि मॉडेलिंग या दोन्ही क्षेत्रात तिने सुरुवातीपासूनच पसंती मिळविली.
एक्टेरिना लिसीना ही ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू आहे. 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. इंस्टाग्रामवर 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली ती यशस्वी व्यावसायिक मॉडेल आहे .
कुटुंबात सर्वच सहा फुटाहून जास्त उंचीचे
एक्टेरिना लिसीना हिच्या या ताड-माड उंचीचे रहस्य आहे तिचे कुटुंब. तिच्या कुटुंबाच्या अनुवांशिकतेसाठी ती सदैव ऋणी असते. तिच्या कुटुंबातील एकही सदस्य सहा फुटांपेक्षा कमी उंचीचा नाही. तिचा भाऊ 6.6″, वडील 6.5″ वडील आणि आई 6.1″ फूट उंच आहेत. तिचा मुलगा त्याच्या समवयस्कांपेक्षा खूप उंच आहे आणि तो अजून तसा तारुण्यवस्थेतही पोहोचलेला नाही.
15 ऑक्टोबर 1987 रोजी पेन्झा, रशिया येथे येकातेरिना व्हिक्टोरोव्हना लिसिना हीचा जन्म झाला. (येकातेरिना मूळ रशियन उच्चार) 6’9″ उंचीमुळे अधिकृतपणे तिला जगातील सर्वात उंच मॉडेल बनवले. तोही आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिने केला आहे. याशिवाय, संपूर्ण रशियात महिलांमध्ये तिचे पाय सर्वात मोठे आहेत – त्याचे नाव (आकार) आहे 13!
जास्त उंचीचा त्रासही झाला
एक्टेरिनाचे वडील व्हिक्टोरोव्हना (व्हिक्टर) लिसीना यांना तिच्या जन्माबरोबरच तिचे चमकदार लांब पाय लक्षात आले. हॉस्पिटलमध्ये तिला उचलत असतानाच त्यांना ते लक्षात आले. आता 31 वर्षीय रेकॉर्ड-होल्डर एक्टेरिनाला आपल्या उंचीचा गर्व आहे. ती म्हणते, “देवाने मला अप्रतिम उंचीचा आशीर्वाद दिला आहे, जेणेकरून मी ताऱ्यांपर्यंत सहज पोहोचू शकेन.” अर्थात जास्त उंचीचे काही तोटेही असतात. लाजाळू, असुरक्षित किशोरवयीन वयात, शाळेत असताना तिला या उंचीचा त्रास व्हायचा. कारण इतर मुले सरासरी उंचीची असायची. ते एक्टेरिनाला सहज आपल्यात सामावून घेत नसत, तिच्यापासून दूर राहायचे. ती म्हणाली, “शाळेत खूप कठीण काळ होता. खूप उंच असल्याने बरोबरीच्या मुला-मुलींशी सहजपणे संवाद साधण्यात अडचण यायाची. अनेकदा मला माझा मोठा भाऊ मदतीला येऊन सांभाळायचा, समजवायचा.”
उंचीच्या समस्येमुळे बाहेर येणाऱ्या अनुभवांनी एक्टेरिनाला लहानपणी घरात नेहमीच आरामशीर आणि सुरक्षित वाटायचे. आजही, तिला शरीराच्या मापात व्यवस्थित बसणारी फिटिंगची पॅन्ट मिळत नाही. तिच्या मापाचे फीमेल शूज मिळत नाहीत. बाद, विमानात किंवा करामध्ये बसण्यासाठी धडपड, कसरत करावी लागते, कारण रुफ (टप) डोक्याला भिडतो.
ऑलिम्पिक ऍथलीट
एक्टेरिना लिसीना जेव्हा 16 वर्षांची होती, तेव्हाच तिची उंची 6 फूट 6 इंच होती. 15 वर्षांची असल्यापासून ती व्यावसायिकपणे बास्केटबॉल खेळते. 30 वर्षांची होण्यापूर्वीच तिने बरेच काही साध्य केले. व्यावसायिक बास्केटबॉल खेळणे, 2008 बीजिंग ऑलिम्पिक गेम्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, उंचीचा नेमका वापर करून मॉडेलिंग करिअर सुरू करणे हे सारे प्रेरणादायी आहे. किशोरवयीन वयातच तिला समजले होते, की बास्केटबॉल कोर्ट ही आपल्यासाठी संधी आहे. या वयात उगाचच फॅशन अन् कॅटवॉक करण्यापेक्षा बास्केटबॉल जर्सी घालणे चांगले हे तिने ठरविले. अर्थात, रशियन राष्ट्रीय बास्केटबॉल संघातील एक्टेरिनाचा समावेश फक्त उंचीमुळे झाला नाही. तिच्याकडे खेळाची अनेक कौशल्ये होते. ती 2006 मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या रशियन संघाचा भाग होती. दोन वर्षांनंतर ती ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघात होती.
खेळाकडून मॉडेलिंगकडे
वर्ल्ड कप आणि ऑलिम्पिक विजेत्या रशियन बास्केटबॉल संघात असलेली एक्टेरिना 2008 नंतर एकाएकी स्पोर्ट्समधून फॅशन गीअर्सकडे वळली. तत्पूर्वी तिला या क्षेत्रात आपली उंची स्वीकारली जाण्याबाबत शंका होती. तिच्या सौंदर्याबद्दलही खात्री नव्हती. एक्टेरिना लिसीना म्हणते, “मी 24 वर्षांची असताना मला नव्या क्षेत्रात जावेसे वाटले. मला जाणवले, आत्मविश्वास आला की आपले शरीर खरोखरच आकर्षक वाटले. माझ्याकडे नेहमीच ऍथलेटिक शरीर होते आणि माझ्या वयाच्या तरूणीपेक्षा मी खूप उंच होते; परंतु नंतर मला जाणवले, की उंच असणे खूप आकर्षक आहे.” त्या अनुभूतीतून ती सक्रिय मॉडेलिंग करिअरकडे वळली. तिथेही ती सर्वात उंच मॉडेल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःची नोंद करण्यात यशस्वी झाली आहे. एक्टेरिना म्हणते, “2008 साली बीजिंगमध्ये मला कांस्यपदक मिळाले होते. तेव्हा मी बास्केटबॉल सोडले, मला ब्रेक घ्यायचा होता, मला मुक्त व्हायचे होते. मग मी माझ्या स्वप्नाच्या दूनियेकडे परत गेले.”
जास्त उंचीचे अनेक फायदेही
एक्टेरिना म्हणते “मी इतर लोकांपेक्षा खूप वेगाने चालू शकते. जगातील सर्वात लांब पाय मिळाल्याने मी खरोखरच आनंदी आहे. गिनीज बुकात नोंद झाल्याची बातमी मी पहिल्यांदा ऐकली, तेव्हा मी कार चालवत होते. मी इतकी आनंदित झाली, की भावनेच्या भरात कार जवळजवळ क्रॅशच केली होती!” रशियामध्ये लोकं मला काहीही विचारत नाहीत, ते फक्त गप्प राहतात आणि टक लावून बघत राहतात, असा अनुभव ती सांगते. तुम्ही बसलेले असताना कोणीतरी तुमच्याकडे येते, तुम्ही इतके उंच असावे, अशी त्याची अपेक्षा नसते. मात्र, उभे राहिल्यावर त्याला कळते तेव्हा त्याची प्रतिक्रिया मजेदार असू शकते, मी उभी राहून त्यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया पाहू शकते, असेही एक्टेरिना सांगते.