मुंबई : शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला निंबोळी अर्क कसा तयार करावा ? याचा फायदा शेतातील पिकांना कसा होतो ? हे सांगणार आहोत. आजही बहुतांश शेती पावसावर अवलंबवून आहे. शेती व्यवसायातील खरीप हंगामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरीप हंगामात विविध पिकांवरील किडींचे प्रमाण वाढते. अशावेळी निंबोळी अर्क शेतातील पिकांवर फवारल्याने कीड रोग नियंत्रणात आणू शकतो.
निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंब या झाडाच्या बियांपासून काढलेला अर्क होय. कडुलिंबाच्या बियांना निंबोळ्या किंवा निंबोण्या असे म्हणतात. कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले ‘ॲझाडिराक्टीन’ हे कीटकनाशकाचे काम करते आणि या घटकाचे प्रमाण याच्या बियांमध्ये अधिक असते. या निंबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडींवर परिणाम होतो.
निंबोळी अर्काचे फायदे
निंबोळी अर्क हा भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी फवारला जातो. निंबोळी अर्क पाऊस पडण्याच्या अगोदर फवारल्याने काही किडी या वासामुळे दूर जातात. तसेच पिकांवर हा अर्क फवारल्यामुळे काही किडी पिकांना खाऊ शकत नाही. किडींचे प्रजनन क्षमतेवर निंबोळी अर्क परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करत असते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या उपाशीपोटी मरून जातात. निंबोळ अर्काचा उपयोग हा रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पाने खाणारी अळी अशा किडींच्या नियंत्रणासाठी होतो.
पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला, कसे ओळखाल..? । Sufficient rain for sowing।
https://youtu.be/xpqvjEGSWT0
निंबोळी अर्क कसा तयार करावा ?
शेतात कडुलिंबाची झाडे असतात. या झाडांपासून अगदी साध्या सोप्या पद्धतीने निंबोळी अर्क बनविता येतो. सध्या निंबोळ्या पक्व होण्याच्या अवस्थेत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. निंबोळी अर्क बनविण्याच्या तीन पद्धती आहे. या पद्धती खालीलप्रमाणे…
पहिली पद्धत
सर्वात आधी झाडाखाली पडलेल्या निंबोळ्या वेचून घ्याव्यात. यानंतर जमा केलेल्या निंबोळ्यांचे साल काढून टाकावे. साल काढल्यानंतर उन्हात वाळावव्यात. नंतर 50 ग्रम बिया घेऊन त्याची पूड तयार करून घ्यावी. नंतर तयार केलेली पूड ही एका कापडात बांधून घ्यावी. आता एक लिटर पाण्यात कापडात बांधलेली पूड टाकावी. ही पूड रात्रभर पाण्यात ठेवावी म्हणजेच निंबोळ्यांचा पूर्ण अर्क पाण्यात उतरतो. हा बनवलेला अर्क भाजीपाला आणि विविध पिकांवर फवारल्यास किडींचा बंदोबस्त होतो.
दुसरी पद्धत
2 किलो निंबोळ्या घेऊन त्या बारीक वाटून घ्याव्यात. यात 15 लिटर पाणी टाकावे आणि हे मिश्रण तसेच रात्रभर पाण्यात ठेवावे. दुसऱ्या दिवशी या मिश्रणाला चांगल्या कापडाने गाळून घ्यावे. हा तयार केलेला अर्काची फवारणी करून घ्यावी. या अर्काच्या फवारणीमुळे भुंगेरे आणि फळांवरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त होतो.
तिसरी पद्धत
सगळ्यात आधी 5 किलो निंबोळ्या बारीक कराव्यात. यानंतर बारीक केलेल्या निंबोळ्या कपड्यात बांधून पाण्याने भरलेल्या बादलीत रात्रभर ठेवाव्यात. मग त्या काढून 100 ते 200 ग्रॅम साबणाचा चुरा करून त्यात टाकावा. नंतर हे मिश्रण 100 लिटर होईल इतके पाणी त्यात टाकावे. तसेच निंबोळी अर्काची फवारणी ही दुपारी चार वाजेनंतर करावी.