मुंबई : Monsoon Current Update… गेले अनेक दिवस उकाड्याने हैराण झालेले नागरिक आणि शेतकरी बांधव अगदी आतुरतेने मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहे. यंदा वेळेच्या आधी येऊनही मान्सून निकोबार बेटांवर अडकून पडला होता. अनुकूल स्थिती निर्माण झाल्यानंतर मान्सून 4 जूनपर्यंत केरळात व पुढे 8 ते 10 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी, मुंबईत पोहोचण्याचा अंदाज होता. मात्र, मान्सून अजूनही केरळात दाखल झालेला नाही.
पुणे वेधशाळेचे (आयएमडी) प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप भागात सोमवारी अरबी समुद्राच्या आग्नेयेला चक्रीवादळ निर्माण झाले आहे. ते चक्रीवादळ आता पूर्व-मध्य व दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तासात हे चक्रीवादळ उत्त्तर दिशेने सरकणार आहे. सध्या हे वादळ मुंबईपासून 1,120 किलोमीटरवर दक्षिण पश्चिम गोवा क्षेत्रात आहे. ते दक्षिण पोरबंदर आणि पुढे कराचीकडे कूच करण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात CYCIR प्रभावाखाली, त्याच प्रदेशावर काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासांत ते जवळजवळ इतर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण पूर्वेलगत व पूर्व-मध्य अरबी समुद्रावर अतिरिक्त कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ तसेच कर्नाटकातील किनारी क्षेत्रात येत्या एक-दोन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
अचानक निर्माण झालेल्या या चक्रीवादळाने केरळ आणि किनारी कर्नाटक प्रदेशातील मान्सून लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनच्या पावसाचे आगमनही आता लांबण्याची शक्यता आहे. आपल्याला पावसासाठी वाट पाहावी लागेल, असे सूचक ट्विट होसाळीकर यांनी केले आहे.
यापूर्वी पुणे वेधशाळेने, राज्यात पुढील 2, 3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली होती. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र 4-5 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. आता चक्रीवादळाचा प्रवास आणि गती यानुसार पूर्वीच्या भाकितात काही अंशी फरक पडू शकतो.