ओरेगॉन : पृथ्वीवर अशी अनेक रहस्यमयी व आकर्षक ठिकाणे आहेत… ज्या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा प्रत्येकाची असते. काही जणांसाठी अशा स्थळांना भेट देणे केवळ स्वप्नच राहून जाते तर काही जण भ्रमंती करुन अशा विविध स्थळांना भेट देवून आनंद घेत असतात. तुम्हालाही जग भ्रमंती करण्याची आणि आकर्षक व रहस्यमयी जागांना भेट देण्याची आवड असेल तर आजची ही वंडरवर्ल्डची स्टोरी आपल्यासाठीच आहे. कारण ज्या जागेविषयी आम्ही माहिती देत आहोत, ती एक अशी जागा आहे, जी समुद्राच्या मधोमध आहे. ही जागा सिंकहोल, पॅसिफिकचे ड्रेनपाइप तसेच थोरची विहीर अशा अनेक नावांनी प्रसिध्द आहे. चला तर मग जाणून घेवू या काय आहे या जागेचे रहस्य…
ताजमहाल, द ग्रेट वॉल ऑफ चायना, माचू पिचू, क्राइस्ट द रिडीमर, पेट्रा आणि चिचेन इत्झा एल कॅस्टिलो ही जगातील सात आश्चर्ये तुम्हाला माहीत असतील. कदाचीत या सात पैकी काही स्थळांना तुम्ही भेटही दिली असेल. परंतु जगात या सात जागां व्यतिरिक्त अजून अशी काही स्थळे आहेत, जी तुम्हाला आश्चर्यचकीत केल्या शिवाय राहणार नाही. अशा काही जागांपैकी सिंकहोल हे देखील एक स्थळ आहे. अमेरिकेच्या पॅसिफिक वायव्य प्रदेशातील ओरेगॉन राज्यात हे स्थळ आहे. ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, पूर्वेला आयडाहो, दक्षिणेला कॅलिफोर्निया व नेव्हाडा तर उत्तरेला वॉशिंग्टन ही राज्ये आहेत.
वेगवेगळ्या नावांनी प्रसिध्द
ओरेगनच्या पश्चिमेला प्रशांत महासागर असून या समुद्राच्या मधोमध एक रहस्यांनी भरलेली एक जागा आहे. त्या जागेला थोरची विहिर, सिंकहोल, नरकाचे द्वार, पॅसिफिकचर ड्रेनपाइप अशा विविध नावांनी ओळखले जाते. ओरेगॉनमध्ये थोरच्या विहीरीबाबत एक म्हण प्रसिध्द आहे, ती म्हणजे थोरच्या विहिरीच्या खूप जवळ जाऊ नका, अन्यथा ते तुम्हाला खाऊन टाकेल..!
आधी होती गुहा…
केप पर्पेटुआ सीनिक एरिया (ओरेगॉन, यूएसए) मध्ये याचॅट्सच्या दक्षिणेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर, उग्र बेसाल्ट किनार्यापासून बनवलेले एक वाडग्याच्या आकाराचे छिद्र आहे, जे थोरची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे. थोरची विहीर म्हणून प्रसिध्द असेलेले हे ठिकाण कधीपासून, कसे तयार तयार झाले याबाबत येथील लोकांकडे कोणतीही माहिती नाही. परंतु या आधी या ठिकाणी गुहा होती. या गुहेचे छत कोसळल्यानंतर या ठिकाणी समुद्राचे पाणी आत आणि बाहेर येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर या थोरच्या विहीरीची उकल झाली.
कधीही भरत नाही ही विहीर
भरती-ओहोटीच्या वेळी समुद्राच्या लाटा या विहीरत खाली सरकतात आणि खालून पून्हा वर येतात. फवारण्यांमध्ये बुडबुडे येईपर्यंत यात पाणी भरत राहते. ही घटना पाहणे जितके मनोरंजक, धाडसी असले तरी ते तितकेच धोकेदायक देखील आहे. ओरेगॉन कोस्टला भेट दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक प्रचंड मोठे अंतराळातील सिंकहोल सारखे दिसेल, जेे समुद्राच्या मध्यभागी असतांनाही कधीही भरत नाही.
जागा किती धोकेदायक?
या जागा कुप्रसिद्ध असली तरी येथील नागरिक ही थोरची विहीर धोकादायक नसल्याचे सांगतात. खरा धोका समुद्राच्या पाण्यापासून येणार्या लाटांपासून असतो. भरती-ओहोटीच्या वेळी या ठिकाणी थोरच्या विहीरीपासून सुरक्षित अंतर राखले पाहिजे. अनेक छायाचित्रकार थोरच्या विहीरीचा फोटो मिळविण्यासाठी या छिद्राच्या अगदी जवळ जातात, हे जिवावर बेतरणारे आहे.
हा समुद्र आहे ज्यापासून लोकांनी सावध असले पाहिजे, कारण एक लाट तुम्हाला छिद्राच्या आत ढकलू शकते, असे झाल्यास त्यातून तुम्ही कधीही परत येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन करतांना या विहीरीपासून सुरक्षित अंतर ठेवूनच पर्यटन करावे, असा सल्लाही येथील नागरिक देतात. थोर वेल ही एक सुंदर आणि विलक्षण नैसर्गिक घटना आहे, साहसी पर्यटन करुन इच्छिणार्यांच्या यादीत हे ठिकाण असणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी जातांना पुर्णतयारी करून जा, असा सल्ला काही अनुभवी नागरिक देतात.