दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव
जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे विविध पिकांच्या लागवड, जल व खत व्यवस्थापन, तंत्र विकास, संरक्षण आणि उत्पादन वाढ या संदर्भात राज्यातील शेतकऱ्यांचा शिवार पाहणी व कृषी तज्ञांशी चर्चा कार्यक्रम १५ मार्च २०२३ पर्यंत सुरू आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक आकर्षण हे कांदा लागवड संदर्भातील आहे. जैन उद्योग समुहाने खाण्याचा पांढरा कांद्याच्या अनेक जाती विकसीत करून निर्जलिकरणासाठी योग्य कांदा खरेदीची हमीही दिली आहे. ‘जैन’ मधील प्रात्यक्षिक पाहणी शिवारात कांद्याच्या ८२ जाती पाहाता येत आहेत.
महाराष्ट्रातील हवामान व शेतजमीन कांदा पिकाचे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात लागवडीसाठी पूरक आहे. यापैकी रब्बी हंगामाचे नियोजन बहुतांश शेतकरी करतात. यासाठी रोपे तयार करणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते. प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊन कांदा मार्चमध्ये हाती येतो. कांदा पेरणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करून एप्रिल-मे महिन्यात कांदा तयार होतो. कांदा लागवड संदर्भातील नवी पद्धत रोपे, लागवड, पाणी, विद्राव्य खते व्यवस्थापन, यंत्राचा वापर याच्याशी संबंधित आहे.
‘जैन’ च्या कृषि संशोधन आणि विकास विभागाने बैलजोडी वापर करून कांदा बियाणे लागवड यंत्र तयार केले आहे. बियाणे पेरणीसाठी ३६ ते ३८ इंच रुंद व ९ इंच उंच असा वाफा तयार करून नंतर बियाणे पेरणी यंत्राद्वारे होते. या एका वाफ्यावर ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या १८ इंच अंतरावर लावल्या जातात. बियाणे साधारणतः ८\१० दिवसात उतरते. यानंतर तीन वेळा फवारणी आणि खते देण्याचे नियोजन असते. तयार झालेल्या रोपांंची नंतर निर्धारित क्षेत्रात पुुनर्लागवड केली जाते.
कांदा लागवडीसाठी सध्या गादीवाफा पद्धत फायदेशीर ठरते आहे. गादीवाफा तयार करायचे यंत्र सुद्धा विकसित केलेले आहे. ते ट्रॅक्टर सोबत वापरता येते. गादी तयार झाल्यानंतर तयार रोपांची संतुलित पुुनर्लागवड लागवड करण्यासाठीही लागवड यंत्र आहे. शेतकऱ्यांना जैन हायटेक प्लॅन्ट फॅक्टरीत तयार रोपेही मिळतात. मशागत करून तयार असलेल्या गादीवाफ्यात रोपांच्या पुनर्लागवडीचे यंत्र वेगळे आहे.
‘जैन’ कृषि संशोधन आणि विकास विभागाने विकसित केलेल्या कांदा जातीत खरीप हंगामासाठी भीमा सुपर, भीमा रेड, भीमा डार्क रेड, भीमा राज, ॲग्रीफाऊंड डार्क रेड, फुले समर्थ तर रब्बी हंगामासाठी भीमा शक्ती, भीमा किरण, ॲग्रीफाऊंड लाईट रेड, फुरसुंगी, अर्क्रा निकेतन, पांढरा कांद्याच्या खरीप हंगामासाठी जेव्हा ५, जेआयएसएल ९, भीमा शुभ्र, भीमा सफेद, भीमा श्वेता फुले सफेद, रब्बी हंगामासाठी जेव्हा १२, ॲग्रीफाऊंड व्हाईट, उदयपूर १०२ यासह इतरही जाती विकसित केल्या आहेत.
कांदा लागवडीचे नवे तंत्र समजून घेताना ठिबक सिंचनचा वापर व नेमका लाभ, ॲक्यूरेन स्प्रिंकलरचा वापर, त्याचे फायदे या विषयी माहिती मिळते व प्रत्यक्ष लाभ पाहता येतो. तयार होणाऱ्या पिकासाठी पोषके, विद्राव्य खते याची माहिती मिळते. संजिवक वापराचे पर्याय समोर येतात. कांदा पिकावरील सर्व रोग निदान व रोग नाशके याचे प्रात्यक्षिक पाहता येते. कांदा उत्पादन सुधारणेसाठी तयार केलेले ‘जैन गॅप अंमलबजावणी व मापदंड’ समजून घेता येतात. ‘जैन’ ने कांदा काढणी यंत्र व कांदा पात व मूळ कापणी यंत्रही विकसित केले आहे. कांदा लागवड आणि उत्पादन खरेदीसाठी ‘जैन करार शेती’ ची माहिती मिळते.