नाशिक : कृषी क्षेत्रात नवनवीन क्रांती घडत आहे. उच्च शिक्षण घेवून चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून अनेक तरुण यशस्वी शेती करीत आहेत. इस्राईलमध्ये तर दव बिंदूच्या साहाय्याने व पाणी विना शेती केली जातेय. कृषी क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, नॅनो तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रे यांची माहिती घेण्यासाठी ॲग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी आज (शुक्रवारी) केले.
ॲग्रोवर्ल्डच्यावतीने नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदानावर ६ ते ९ जानेवारी दरम्यान चार दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. ६) रोजी श्री.भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यानतंर त्यांनी प्रदर्शनाची पाहणीही केली. याचबरोबर त्यांच्या हस्ते कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा ॲग्रोवर्ल्ड ऋषी कृषी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रदर्शनास पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद लाभला. प्रदर्शन सोमवारी (ता. 9) पर्यंत सुरु असून प्रवेश मोफत आहे.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, ओम गायत्री नर्सरीचे व्यवस्थापकीय संचालक मधुकर गवळी, प्लॅन्टो कृषी तंत्रचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आ. भुजबळ यांनी ॲग्रोवर्ल्ड शेतकऱ्यांसाठी करीत असलेल्या कामांचे कौतुक करून कोरोना काळात सर्व थांबले होते, मुख बंदी केली मात्र पोट बंदी कसे करणार, म्हणून अशा परिस्थितीही शेतकरी राब राब राबला. मात्र कुठेही जाता येत नसल्याने शेत माल पडून होता. अशा वेळेतही ॲग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांचा हा माल जोखीम घेऊन लोकांपर्यंत पोहोचविला. ४ लाख ८० हजार शेतकऱ्यांना ॲग्रोवर्ल्ड कुठलीही फी न आकारता हवामान आधारित, नवनवीन तंत्रज्ञान, शासकीय योजना यांसारखी माहिती पुरवीत आहे, तसेच त्या- त्या जिल्ह्यात कुठली पिके आहेत, त्याची माहिती घेवून कृषी प्रदर्शन भरवित असल्याचे सांगितले.
सन्मानार्थी ऋषी कृषी
ॲग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात ईश्वरदास पंढरीनाथ गवळी, मधुकर किसनराव शिंदे, दौलत पंढरीनाथ उखर्डे, अशोक दादाजी ह्याळीज, प्रकाश परसराम मोहीते, मधुकर पुंजाराम भामरे, भास्कर कारभारी बरकले, भास्करराव मोतीराव मोगल, वामनराव प्रिताजी मोरे यांचा सत्कार श्री. भुजबळ यांच्या हस्ते ऋषी कृषी पुरस्कार देवून करण्यात आला.
शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला. प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञान, यंत्र, नवनवीन वाणांची रोपे, मजुरीला पर्याय असणारी पिके, यंत्र, द्राक्ष – डाळिंबासाठीची कॅनोपी, पिकांवर फवारणीसाठीचा ड्रोन, शेततळ्याचा कागद, विविध पिकांसाठीचे ब्लोअर हे शेतकऱ्यांचे प्रमुख आकर्षण ठरले.
ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर द्राक्ष विज्ञान मंडळाचे अध्यक्ष वसंत ढिकले यांनी सूत्रसंचालन केले. जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, सिका ई- मोटर्स हे सहप्रायोजक आहेत.