मुंबई : Pik Lagwad… शेतकरी दोन ते तीन महिन्यात पैसे कमविण्यासाठी अनेक पद्धतीचे पिक नेहमीच घेतो. परंतू, ते पिक घेऊन जर चांगला नफा मिळत नसेल तर, तुम्हाला आम्ही आज अशा पद्धतीचं पिक सांगणार आहोत, जे फक्त चार महिन्यात तुम्हाला भरघोस नफा देऊ शकेल. होय.. आज आपण रताळ्याच्या शेतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भारतातील एक औषधी वनस्पती म्हणून रताळ्याचा उपयोग होतो. यामध्ये उच्च प्रकारचे तंतू असतात. रताळे तणाव दूर करण्यास मदत करते. भारतामध्ये उपवासामध्ये आवर्जून रताळे खाल्ले जाते. रताळे चवीस थोडे गोड असतात. यास बाजारपेठेत मोठ्या संख्येने मागणी आहे. त्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. मात्र योग्य नियोजन आणि व्यवस्थापन कौश्यल्याने रताळ्यातून बक्कळ पैसे शेतकरी कमावू शकतो. दरम्यान, भारतातील रताळ्यांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. रताळे जगातील अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात. रताळे निर्यातीत भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
कशी कराल रताळ्याची शेती
रताळ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य मातीची निवड करणे आवश्यक आहे. तसेच माती फार कठीण आणि खडकाळ नसावी. जेथे पाणी साचले आहे अशा ठिकाणी शेती करू नका. मातीचे pH मूल्य 5.8 ते 6.8 दरम्यान असावे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल.
या जातींची करा लागवड
लागवडीकरिता जमिनीची चांगली मशागत करावी. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. लागवड करण्यासाठी कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी. रताळ्याच्या उत्पादनासाठी, 25,000-30,000 कट वेली किंवा 280-320 किलो कंद प्रति एकर आवश्यक आहेत. जानेवारी-फेब्रुवारी, एप्रिल ते जुलै महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या खतांचा वापर केला जातो. वेळेवर सिंचन करावे लागते. शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला जातो. रताळ्याच्या लागवडीसाठी स्फुरद, नायट्रोजन यांचाही वापर केला जातो.
इतके टन होईल उत्पादन
लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली, हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो, तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकास काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत, असे समजावे. प्रति हेक्टरी सुमारे 20 टन रताळी मिळतात. रताळ्याची शेती खूप फायदेशीर आहे. यातून प्रति हेक्टर शेतकरी 15 ते 20 टन रताळ्याचे उत्पादन सहज घेऊ शकतात. सध्या रताळ्याचा 1500 ते 3000 हजार प्रति क्विंटल भाव सुरु आहे. यानुसार 1 हेक्टर क्षेत्रातून केवळ चार महिन्यात शेतकरी 4 लाख रुपये कमावू शकतो.