पुणे : ऑक्टोबर हीटपूर्वी आता पुण्यासह राज्यात सप्टेंबर कोल्डचा अनुभव येत आहे. पुणे शहरात गारवा वाढलेला असून राज्यातही तापमान खालावलेलेच आहे. मुंबईतही हवेत थोडा गारवा जाणवतो आहे. कमाल आणि किमान या दोन्ही तापमानात सरासरीपेक्षा घट नोंदविली जात आहे.
सप्टेंबर कोल्ड : पुण्यात येतोय हिलस्टेशनचा अनुभव
गेल्या 4-5 दिवसांत पुणे शहरातील कमाल व किमान या दोन्ही तापमानात घट होत आहे. ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे तापमान कमी राहते. त्यामुळे रात्री-पहाटे थंडी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात येत्या 5 दिवसात कमाल तापमानाचा पारा 30 अंश सेल्सिअसपेक्षा कमीच राहणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. या सर्व स्थितीमुळे पुणे हे सध्या जणू हिलस्टेशन असल्याचे आयएमडी पुणे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी मिश्किलीने ॲग्रोवर्ल्डला सांगितले. पुण्यातील स्थिती मुंबईसह राज्यातही अनुभवायला मिळत आहे.
मुंबईत खालावलेल्या तापमानाचा विक्रम
मुंबईत काल दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. तापमान 23 अंशांपर्यंत झाली गेले होते. हा सप्टेंबरमधील खालावलेल्या तापमानाचा विक्रम ठरला आहे. यापूर्वी मुंबईत 1994 मध्ये 23.8 हे सप्टेंबरमधील सर्वात कमी तापमान नोंद झाले होते. तर सर्वात कमी कमाल तापमान 1987मध्ये 25.7 नोंदविले गेले आहे. त्या अर्थाने 1969 नंतर गेल्या 53 वर्षांत कालचा दिवस मुंबईत सर्वाधिक गारेगार ठरला.
पुण्यातील तापमानाचा घसरता पारा
पुणे शहरात सप्टेंबर महिन्यात दिवसाचे सरासरी कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहते. गेला आठवडाभरात ते सरासरी 26-27°C अंशांपर्यंत खालावलेले आहे. 16 सप्टेंबर रोजी तर शहरात 24°C इतके कमी कमाल तापमान नोंदविले गेले. शहरातील किमान तापमानाचा पाराही वेगाने घसरत आहे. अर्थात ते या महिन्यातील सरासरीच्या आसपासच असल्याचे सांगितले जात आहे. 17 व 19 सप्टेंबर हे दोन दिवस शहरात 20°C किमान तापमान नोंद झाले. दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशांनी कमी झाल्याने गारवा जाणवत आहे. राज्यातही बहुतांश ठिकाणी हीच स्थिती आहे.
का आहे राज्यभर सध्या गारवा?
दिवसाचे कमाल तापमान गेल्या काही दिवसांत घसरले आहे. ते सरासरीच्या म्हणजे 30°C पातळीच्या खाली घसरलेले आहे. राज्यातली सध्याच्या ढगाळ हवामानामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. रिटर्न मान्सून संपेपर्यंत ती कायम राहण्याची शक्यता असते. यामुळे सूर्यप्रकाश राहत नाही व पर्यायाने वातावरणातील उष्णता कमी राहते. त्यातून गारवा जाणवतो. अनेकदा तो अंगाला झोंबणारा, बोचरा अनुभव असतो.
👆 आजची स्थिती (उपग्रह छायाचित्र)
असे ढगाळ वातावरणामुळे सतत दिवसाचे तापमान खाली राहिले तर मग किमान तापमानही उतरते. फक्त रात्री ढगाळ वातावरण राहिले तर मग मात्र दिवसा तापमान वाढते. त्यामुळे एकूणच किमान तापमानही वाढते. सध्या तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाच्या कालावधीत म्हणजे 26 सप्टेंबरपर्यंत राज्यात कमाल तापमान हे 30 अंशांच्या सरासरीपेक्षा खालावलेलेच राहील. मान्सूनच्या परतीनंतर त्यात हळूहळू वाढ होत जाऊन मग ऑक्टोबर हीटचा अनुभव यायला सुरुवात होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
Comments 1