शेतकऱ्याचा नाद करायचा नाय असे म्हणतात ते खरेच आहे. सततच्या लोडशेडिंगला कंटाळून मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने स्वतःच 7 कोटी रुपये खर्चून धरण बांधले. स्वदेश चित्रपटातील कथेप्रमाणेच या धरणातून वीज निर्मितीसाठी या शेतकऱ्याने टर्बाइनही उभारले! या बहाद्दर शेतकऱ्याची हटके स्टोरी आपण जाणून घेऊ.
आश्चर्यचकित करणारी अशी ही स्टोरी आहे. लोडशेडिंगमुळे शेतीला पुरेशी वीज मिळत नसल्याने मध्य प्रदेशातील शेतकरी मोहनलाल जांगडे यांनी गावातच नदीवर मोठा बंधारा तयार केला. कुंदा नदीवर बांधलेले हे धरण 600 फुटांपेक्षा जास्त लांब आणि सुमारे 5 फूट रुंद आहे. या धरणाच्या टर्बाइनमधून 100 किलोवॅट वीजनिर्मिती होते. खंडित वीजपुरवठ्यामुळे 12 वर्षांपूर्वी त्यांनी ही सारी उठाठेव सुरू केली. त्यामुळे आता वीज आणि सिंचनाच्या समस्यांपासून गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
वडिलांच्या अंत्यविधी तर्पणात सुचली कल्पना
मध्य प्रदेश राज्यातील बारी येथील रहिवासी असलेले मोहनलाल जांगडे हे व्यवसायाने शेतकरी असले तरी त्यांनी यांत्रिकी शिक्षणात उच्च माध्यमिक आणि आयटीआय पदविका प्राप्त केली आहे. 2009 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी केस दान करण्यासाठी मोहनलाल कुंदा नदीच्या काठावर गेले होते. त्यानंतर त्यांना तिथे धरण बांधण्याची कल्पना मनात आली.
रितसर सरकारी परवानगी मिळवून उभारणी
त्यावेळी शेतात सिंचनासाठी वीज फक्त 6 तास उपलब्ध होती. हे मोहनलाल आणि परिसरातील इतर शेतकऱ्यांना पुरेसे नव्हते. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी 2011 मध्ये कुंदा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी डब्ल्यूआरडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि पॉवर प्लांटची माहिती घेण्यासाठी एसजीएसआयटीएस इंदूर येथे गेले. भोपाळमधील ऊर्जा विभागाकडे डीपीआर कागदपत्रे सादर केल्यानंतर 2013 मध्ये त्यांना यासाठी परवानगी मिळाली.
टर्बाइन तयार करण्यासाठी लागली 4 वर्षे
सरकारी परवानगी मिळाल्यानंतर मोहनलाल यांनी धरण बांधण्याचे काम सुरू केले. टर्बाइन तयार करण्यासाठी 4 वर्षे लागली. यानंतर बाकीची तयारी सुरू होती. आता 2023 मध्ये प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 7 कोटी रुपये खर्च झाल्याचेही मोहनलाल यांनी सांगितले. हा सर्व पैसा त्याच्या खिशातून गेला आहे. यात 14 मीटर 200 आरपीएम टर्बाइन आहे, एकदा प्लॅनेटरी गिअरबॉक्स चालवल्यानंतर टर्बाइन 252 वेळा फिरते, याद्वारे एका वेळी सुमारे 100 किलोवॅट वीज निर्माण करता येते.
आता सरकारकडून हवी आहे मदत
प्रकल्पाच्या डीपीआर मंजुरी आणि पत्रासोबत धरणाच्या जागेवर जिल्हाधिकाऱ्यांनी 3,100 चौरस मीटर जागा दिली आहे. वीज व्यवस्थापन कंपनी जबलपूरसोबत वीज खरेदी करारही करण्यात आला आहे, मात्र अद्यापही अनुदानाची रक्कम या शेतकऱ्याला मिळालेली नाही. वास्तविक, केंद्रीय योजनेत 90 टक्के अनुदान निश्चित करण्यात आले होते. शेतकरी मोहनलाल यांनी सांगितले की, त्यांना इंदूरच्या GSITS पॉवर प्लांटची माहिती मिळाली. तेथून केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत अनुदान मिळत असल्याचे उघड झाले.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना साकडे
या प्रकल्पात शेतकरी मोहनलाल यांना स्वतःच्या पैशापैकी फक्त 10% रक्कम गुंतवायची होती, परंतु संपूर्ण रक्कम खर्च करूनही त्यांना अनुदान मिळाले नाही. मोहनलाल यांनी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव आणि पंतप्रधान मोदी यांनाही या धरणासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने मदत केल्यास या धरणातून एक मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती करता येईल, असे ते म्हणाले.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇