मुंबई – केरळमध्ये दोन दिवस अगोदर पोहोचलेला मान्सून महाराष्ट्राच्या मध्यवर्ती पोहोचल्यानंतर मात्र काही स्थिरावला. त्यानंतर पुन्हा एकदा मान्सूनने वेगवान वाटचाल करीत उत्तर भारतात नेहमीपेक्षा सहा दिवस अगोदर मजल मारली. पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून सबंध भारत व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. मान्सून उत्तर भारताच्या अनेक भागात पोहोचल्याने त्या भागातील नागरिकांची उष्णतेपासून सुटका झाली.
ला नीना सक्रिय होणार
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनवर परिणाम करणारा एल निनो आता स्थितीत गेला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात हळूहळू ला – निनाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तसे झाल्यास प्रशांत महासागरातील पृष्ठीय पाणी थंड व्हायला सुरुवात होईल आणि परिणामी आकाश ढगळून पुन्हा एकदा चांगल्या पावसाला सुरुवात होईल.
या जिल्ह्यात 106 % तर या जिल्ह्यांमध्ये 96 ते 104 % पावसाचा अंदाज
नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106% पाऊस जुलै महिन्यात पडण्याचा अंदाज आहे. तसेच जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 96 ते 104 % इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र त्या तुलनेने काहीसा कमी असला तरी सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात राज्यासह देशातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. राज्यात कोकण, उत्तर – मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
जूनची नोंद ; जुलैचा अंदाज
जून महिन्यात सरासरी 165.3 मिमी पावसाच्या तुलनेत 147.2 मिमी म्हणजेच कमी पावसाची नोंद झाली. IMD च्या अंदाजानुसार भारतात सध्या मोसमी पावसासाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशात सरासरी 280.4 तर राज्यात सरासरी 362.3 मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
देशातील 25 राज्यांमध्ये अलर्ट
देशातील 25 राज्यांमध्ये आजपासून पुढील 4/5 दिवस पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, झारखंड, दक्षिण आणि उत्तर-पूर्व राज्यांचा समावेश आहे. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी ते ढगफुटीसदृश्य पावसाची शक्यता असल्याने पुराचा धोकादेखील वाढू शकतो. तेव्हा या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही IMD ने केले आहे.