पुणे : गेल्या दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. पण येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी, कोकण, विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा पश्चिम किनारी भागात सक्रिय होत असून त्याचा जोर पुढचे पाच ते सहा दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान निरीक्षणानुसार पुढच्या एक ते दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. संबंध कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात का झाला सक्रीय मान्सून ?
अरबी समुद्र आणि ओमान या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठावाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १४७.६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहे. रायगडमधील माथेरान येथे ४२ मिलीमीटर पाऊस झाला.