जळगाव : शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या सर्व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती अॅग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनामध्ये पहायला मिळते. शेतकर्यांनी आता हवामान बदलानुसार शेतीत बदल करायला हवेत. पिकांवर फवारणी करताना ड्रोन सारखे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणारे आहे. अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार शेतकर्यांनी करणे काळाची गरज बनले आहे, असे मत खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अॅग्रोवर्ल्डतर्फे आजपासून सुरु झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन, माजी महापौर सीमाताई भोळे, जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन, प्लॅन्टो कृषी तंत्रचे व्यवस्थापकीय संचालक स्वप्नील चौधरी, साईराम इरिगेशनचे कार्यकारी अध्यक्ष श्रीराम पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ के. बी. पाटील, डॉ. अनिल ढाके, अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शन सोमवारी (दि 14) पर्यंत सुरू असून शेतकऱ्यांसाठी मोफत आहे.
हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख आज प्रदर्शनात
हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांचे हवामान सल्ला विषयक अनुभव या विषयावर शनिवारी (ता. 12) दुपारी 2 वाजता चर्चासत्रही आहे. तसेच त्यांचा प्रदर्शनस्थळी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय अॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराने सन्मानही करण्यात येणार आहे.
खासदार पाटील यांनी सांगितले, की अॅग्रोवर्ल्डचे हे कृषी प्रदर्शन शेतकर्यांसाठी चांगली पर्वणी ठरेल. या ठिकाणी सेंद्रियपासून ते रासायनिक पर्यंत, पाण्याच्या बचतीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. तरी शेतकर्यांनी या प्रदर्शनाचा आवर्जुन लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पहिल्याच दिवशी विक्रमी प्रतिसाद
अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाला आज पहिल्याच दिवशी शेतकर्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला. शेतकर्यांची सकाळी दहापासून सुरु झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. प्रदर्शनात सहभागी होणार्या प्रत्येक शेतकर्याला निर्मल सीड्सतर्फे भाजीपाल्याच्या दहा ग्रॅम बियाणाचे पाकीट मोफत दिले जात आहे. 11 ते 14 मार्च या चार दिवसांच्या कालावधीत होणार्या या कृषी प्रदर्शनात तब्बल चार एकरवर 220 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
प्रदर्शनात आज अॅग्रोवर्ल्ड शेतकरी गौरव पुरस्कार वितरण
शेतीमध्ये यशस्वी कामगिरी करणार्या राज्यभरातील शेतकरी तसेच शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी यांचा अॅग्रोवर्ल्डतर्फे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. उद्या (12 मार्च) सकाळी 11 वाजता होणार्या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जि प अध्यक्षा रंजनाताई पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार शिरीष चौधरी,
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मान्यवरांची विविध स्टॉल्सला भेट
प्रदर्शनात सहभागी झालेल्या यंत्र व अवजारे, शासकीय विभाग, बँक, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिके, नामवंत ठिबक कंपन्यांसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांच्या स्टॉल्सला उपस्थित मान्यवरांनी भेटी देऊन माहिती जाणून घेतली. कृषी अवजारे व यांत्रिक दालनलाही भेट दिली.
फवारणीचे ड्रोन ठरले आकर्षण
या प्रदर्शनात प्रत्यक्षात पिकांवर ड्रोनद्वारे कशी फवारणी करता येते, हे शेतकर्यांना पाहता येत आहे. शेतकरी आवर्जुन या ड्रोनची बारकाईने पाहणी करुन त्याविषयी माहिती घेतली.
शेतकर्यांची मोफत आरोग्य तपासणी
प्रदर्शनस्थळी भेट देणार्या शेतकर्यांची गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यासाठी फाऊंडेशनच्या हॉस्पीटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. नाक, कान, घसा, डोळे, हृदयरोग व रक्त तपासणीसह विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी केली जात असून टुडी इको याची देखील दोन दिवस तपासणी केली जाणार आहे.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, र्हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृदयालय हे सहप्रायोजक आहेत.