नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्ष उत्पादक व त्यावरील प्रक्रिया उद्योगाचा जिल्हा म्हणून देश विदेशात ओळखला जाणारा जिल्हा. पण १ सप्टेंबर रोजी याच जिल्हातील काही रेशीम उत्पादक एकत्र आले व त्यांनी रेशीम दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी नाशिकचे श्री. चंद्रकांत किसन बडगुजर उपस्तिथ होते. याप्रसंगी उपस्थित शेतकरी अधिकारी नसलेल्या एका शेतकऱ्यास नाना-नाना म्हणुन मान देऊन त्यांना अनेक प्रश्न विचारीत होते. या व्यक्तीचे नाव होते सखाहारी कचरू जाधव उर्फ नाना. त्यांचे रेशीम शेतीत योगदान काय ? हेच आपण जाणुन घेणार आहोत.
सखाहारी जाधव ४४ हे ९ वी पास असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगर या वाडीवरचे रहिवाशी. इगतपुरी तालुक्यात अशा अनेक वाड्या वस्त्या आहेत. जाधव यांच्याकडे वडिलोपार्जित फक्त साडेतीन ते चार एकर जमीन आहे. आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी (हीचा आता विवाह झाला आहे) असा हा परिवार. दारणा नदी जवळ असल्यामुळे जमीन खडकाळ व पाणथळ. या जमिनीतून निघणाऱ्या उत्पन्नावर ७ जणांचे कुटुंब पोसणे, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न हे कठीण होत चालले होते. जमीन पाणथळ असल्यामुळे खरिपात फारसे उत्पन्न मिळत नसे त्यामुळे या जमिनीवर इंद्रायणी जातीचा तांदूळ उत्पादित केला जात असे. उर्वरित जमिनीवर वांगे, टमाटे, कार्ले, काकडी धने अशा प्रकारचा भाजीपाला घेतला जात असे. सर्व पिके मिळून २ लाख रु. उत्पन्न मिळत होते. पण खर्चही खूप व्हायचा. भाजी विक्रीसाठी घोटी (१७ कि.मी.) तर नाशिक ४० कि. मी.वर होते. तेथे विक्रीसाठी जावे लागत होते. एकंदरीत ही शेती परवडत नव्हती. त्यामुळे पीक कर्ज, सोसायटीचे कर्ज परतफेड करणे अवघड जात होते.
मोबाईलद्वारे मिळाला रेशमी मार्ग
या सर्व चक्रव्यूहात अडकल्यानंतर येथूनच सुरु झाला जाधव यांचा रेशमी प्रवास. नाना जाधव याना आपण शेतीत काहीतरी नवी करावे असं वाटू लागले. हातात मोबाइलला होता याच वस्तीवर राहणारे एक मित्र धनाजीराव यांचे बरोबर युट्युबवर शेतीची माहिती पाहताना रेशीम कोष उत्पादन हा विषय मिळाला. एक महिना हे पाहण्यात घालवला. मग नाशिकला जाऊन रेशीम अधिकारी सारंग सोरते यांच्याबरोबर चर्चा केली, संपूर्ण माहिती घेतली. चर्चेनंतर समूह शेती करीत रेशीम लागवडीचा निर्णय झाला. दोन तीन वाड्या-वस्त्यावरील मिळून १५ शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला. प्रत्येकी ५०० रु भरून रेशीम अधिकारी कार्यालयात अर्ज भरून रीतसर परवानगी घेतली. जुन २०१७ मध्ये रेशीम कोष उत्पादनासाठी तुती लागवडीची परवानगी मिळाली.
पूर्वतयारी
तुती लागवडीसाठी शेत तयार करताना खडकाळ जमिनीसह पाणथळ जमिनीवर ३ फुटापासून ते १२ फुट नदी व बंधाऱ्यातील गाळाचा थर दिला. २०१७ मध्ये प्रथम एक एकर वर तुती लागवडीसाठी जमीन नांगरून घेतली. वखरणी केल्यानंतर ३ ट्रॉली शेणखत मिसळून साडेचार फूट अंतरावर बेड तयार केले. बेडवर १२ एम.एम. ड्रीपच्या नळ्या टाकून घेतल्या. तयार बेडवर ४ इंचाची ३ डोळ्याची कांडी दिड फूट अंतरावर लावली. कांडी लागवडीपूर्वी एम.४५ च्या द्रावणात बुडवून घेतली. ८ दिवसाने एम.४५ चे ड्रिंचिंग केले. काडी लागवडीवेळी एकरी २ किलो यूरिया व पाव किलो ह्यूमिक अॅसिड ड्रीपमधुन दिले. जुलैमध्ये सर्व तुटीला चांगले फुटवे आले. पानांवर सुरुवातीस लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी रोगग्रस्त पाने खुडली व नष्ट केली. नंतर कीटकनाशकाची फवारणी केली.
तुती वाढीस लागल्यानंतर रेशीम संचानालय मार्फत महैसुरला ८ दिवसाचे प्रशिक्षण घेतले. परतल्यानंतर अनेक गावांना जाऊन शेतकऱ्यांनी केलेली रेशीम शेती पाहून माहिती घेतली. नोव्हेंबर मध्ये ५० अंडीपुंजचा पहिला लॉट आणला. शेतात गोठ्याच्या जागी २५ x ६ फुटाचे शेड तयार केले. हे कच्चे शेड तयार करताना चारी बाजूने मेणकापड व बारदाना टाकून चारी बाजूने झाकून घेतले. व्दिस्तरीय शेड मधे ५० अंडीपुंज टाकले २८ दिवसात ४५० किलो रेशीम कोष उत्पादन निघाले. त्यापासून २०२५० रु.मिळाले. फक्त एका महिन्यात शेतातील कोणत्याही उत्पादनातून एवढे उत्पन्न मिळू शकत नाही खर्च वजा जाता हे नेट प्रॉफिट होते.
यामुळे नवीन प्रेरणा मिळून एक एकर वरील तुती लागवड अडीच एकर केली. रेशीम संचालनालयाचे अधिकारी श्री.भास्कर दाभाडे यांनी भेट दिली. त्यानंतर २०x५० फुटाचे दोन शेड मंजुर झाले. नवीन शेड मध्ये ५ x ४० फुटाचे २ रॅक तयार करून मार्च २०१८ मध्ये त्यात १५० अंडीपुंज टाकले. त्यापासून खर्च वजा एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. बाहेरचा मजूर फार कमी वेळेस लावला जातो. अंडीपुंज टाकणे, अळीला पाला टाकणे, हि कामे जाधव दांपत्य करतात. तर पाला तोडणे, शेतातील इतर कामे करणे हि कामे दोन्ही मुले करतात. नाना जाधव यांनी रेशीम शेतीचे सर्व प्रशिक्षण घेतले असल्यामुळे ते सर्व कामे करतात व इतर रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करतात त्यामुळेच ते लोकांमध्ये देखील नाना नावाने ओळखले जातात.
२०१९ पासून त्यांनी वर्षात ५ लॉट (पिके) घेणे सुरु केले आहे. सर्व खर्च वजा जाता त्यांना यावर्षी साडेतीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. जाधव म्हणतात,”शेतातील अळ्या मारण्यापेक्षा तिला सांभाळून लाखात उत्पन्न मिळू शकते. शिवाय खर्चही कमी येतो.” एकदा तुती लागवड केली कि १५ वर्ष त्यापासून उत्पन्न घेता येते. या अळ्यांपासून दरमहा खर्च वजा जात ५० ते ६० हजार रु.मिळतात. शेतात तुतीला नवीन पाला आला कि नवीन लॉट घेता येतो, हे यातील साधे व सोपे गणित आहे. थंडीच्या दिवसात प्लास्टिक टाकले कि उत्पादनात घट येत नाही व उन्हाळ्यात शेडच्या बाजूने बारदाना सोडून तो ओला ठेवला कि चांगले उत्पादन घेता येते. तुतीवर ग्रेसरी, मासडीन व टायचरी हे रोग प्रामुख्याने येतात. त्यांचे नियंत्रण ठेवले कि उत्पादनात घट येत नाही. कोणतेही वातावरण अति तीव्र झाले कि ते रोगाला आमंत्रण असते, त्यामुळे जाधव रोग येण्यापूर्वीच नियंत्रण करतात.
नाना जाधव त्यांचा उत्पादित रेशीम कोष रामनगर येथील अमन खान याना विकतात. तेथे म्हैसूर मार्केटला भावही चांगला मिळतो. पण एकट्या शेतकऱ्यास ट्रान्सपोर्ट खर्च कमी उत्पादनात परवडत नाही. नाशिक मार्केटला किलोला १०० रु कमी भाव मिळतो. पण विक्री होते ,त्यामुळे वेळ व खर्च वाचतो. दोन वर्षात जाधव याना ५३० रु. सर्वोच्च भाव मिळाला आहे . असा दर वर्षातून दोन ते तीन वेळी मिळू शकतो. मात्र त्यासाठी मार्केटिंगचा अभ्यास व अनुभव पाहिजे. आता नाशिक येथेही संजीवन रेशीम उद्योग सुरु झाला आहे. तेथेही विक्री केली जाते. जानेवारी, फेब्रुवारी मधील उत्पादनास अत्यंत चांगला दर मिळतो. कारण येथील कोषापासून चांगल्या प्रतीचा व उच्च दर्जाचा धागा मिळतो.
रेशीम कोष उत्पादक संघ निर्मिती करून रेशीम धागा तयार करण्यासाठी नाना जाधव कार्यरत आहेत. मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत त्यांनी दोन एकरवरील क्षेत्रातून खर्च वजा जाता साडेपाच लाख रु. मिळवले आहेत. त्यांचे सगळे कर्ज फिटले असून फक्त चालु कर्ज आहे. त्यांच्या गावापासून १६ कि.मी. परिसरातील वाड्या वस्त्यावरील व छोट्या गावातील ४० शेतकरी (रेशीम उत्पादक) एकत्र केले आहेत. त्यांना नानाचे वेळोवेळी मार्गदर्शन असते. हे शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांना विविध अधिकारी जसे की, चंद्रकांत अकोले, सांगळे, क्षेत्रीय अधिकारी जोशी, सारंग सोरते व इतर अनेक कृषी अधिकारी वेळोवेळी भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन करतात. तुती लागवड व शेड उभारणीचे संपूर्ण अनुदान जाधव यांना मिळाले आहे.
तुती क्षत्राशिवाय जाधव यांच्याकडे एक एकर ऊस, वीस गुंठे जमिनीवर भात व उर्वरित शेतावर भाजीपाला लागवड आहे. घरातील सर्वजण एकत्रित काम करतात. मुलांचे शिक्षण सुरु आहे. असा हा चार एकरचा शेतकरी यशस्वी शेतकरी म्हणुन जमीनदारांपुढे आदर्श असून अजूनही जमिनीवर घट्ट पाय रोवुन मी शेतकरी असल्याचे अभिमानाने सांगतो आहे.
सखाहारी उर्फ नाना जाधव :-९७६६२७३४०९.