शेती करण्याबरोबरच शेतमाल विक्री करणे हे कौशल्य शेतकऱ्याने आत्मसात केले पाहिजे. हीच बाब लक्षात घेऊन जळगावातील सुपरॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकरी व ग्राहक यांच्या दुवा साधत थेट शेतमाल विक्रीचा उपक्रम जळगावात सुरु केला आहे. याचा शेतकरी व ग्राहक दोघांनाही निश्चित लाभ होईल. असा विश्वास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी व्यक्त केला.
जळगावात रास्त दरात शेतमाल उपलब्ध करून देण्यासाठी सुपरॲग्रो शॉपीच्या दालनाचे उद्घाटन श्री. ठाकुर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. नगरसेविका सौ. उज्वला बेंडाळे अध्यक्षस्थानी होत्या. आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री. मधुकर चौधरी, सुपरॲग्रोचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते.
निवृत्तीनंतरही प्रत्येकाच्या हाती सर्वात मोठी उपलब्धी काय असेल तर अनेक वर्षात आलेला अनुभव असतो. याच अनुभवातील शिदोरीवर सेवानिवृत्त झालेल्या 11 कृषि शिलेदारांनी वेगळी पायवाट निवडलेली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून रास्त दरात ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद नक्कीच मिळणार व लवकर सुपरअॅग्रो फार्मर्स प्रोडयूसर कपंनीच्या इतरत्रही शाखा असतील. याशिवाय इतरही सेवानिवृत्त झालेल्यांसाठी हा एक आदर्श ठरू शकतो, असे मत श्री चव्हाण यांनी व्यक्त केले. लक्ष्मण तळेले यांनी सुत्रसंचालन केले. प्रभाकर पाटील प्रास्ताविक तर वासुदेव पाटील यांनी आभार मानले.