प्लॅन्टो कृषीतंत्र या नावाने संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध असलेले प्रलशर बायो प्रॉडक्टस प्रा. लि., गोवा या कंपनीचे जळगांव आणि गोवा कनेक्शन काय आहे? काय आहे हे तंत्र? कशी झाली याची सुरुवात? हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. निम्मित होते अॅग्रोवर्ल्डच्या जळगाव कार्यालयातील “भेट-कृषीऋषीं” ची हा कार्यक्रम..! या कार्यक्रमात कंपनीचे कार्यकारी संचालक व कायम प्रसन्न हसतमुख व्यक्तिमत्व लाभलेले स्वप्नील चौधरी व निखील चौधरी बंधू उपस्थित होते. यावेळी त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दात खास अॅग्रोवर्ल्डच्या वाचकांसाठी..!
जळगावपासून चार किमीवर असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी असलेल्या आसोदा या लहानशा खेड्यात आमचे बालपण गेले. आजोबा त्याकाळी प्रगतीशील शेतकरी होते. डेअरी व्यवसाय व नवनवीन भाजीपाला पीक उत्पादनात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आजोबांनी वडिलांना कृषी संबधित शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. आमचे वडील प्रल्हाद चौधरी यांनी कृषी पदवी घेतल्यानंतर विविध कृषी संबंधित कंपनीमध्ये काम केले. काही दिवस कृषी केंद्र चालविले. राज्यात हरितक्रांती झाल्याने शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली, त्याचबरोबर अतिरिक्त रासायनिक कीटकनाशके आणि बेसुमार रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्यच संकटात आले. हीच बाब हेरून वडिलांनी वेगळा काही उद्योग करता येईल का याची चाचपणी करत असतांना त्यांच्या वाचनात बायो टेक्नोलॉजी फर्टीलायझर या विषयी माहिती मिळाली आणि त्यादृष्टीने त्यांनी गोवा स्थित CSIR च्या अधिपत्याखाली असलेल्या प्रयोगशाळेत भेट देऊन त्याबाबतच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती घेऊन त्यांच्या सोबत सदर तंत्रज्ञानाचा करार केला व प्रलशर बायो प्रॉडक्टस प्रा. ही कंपनी सुरु केली. त्यांनतर कंपनीमध्ये सतत संशोधन सुरु असल्याचे यावेळी चौधरी बंधूनी सांगितले.
वडिलांनी सुरु केलेली कंपनी असल्याने आम्हाला फक्त त्यात प्रचार-प्रसाराचेच काम बाकी राहिले. वर्ष 1993 मध्ये गोव्यात प्रलशर बायो प्रॉडक्टस प्रा. ही कंपनी स्थापित झाली. बायो टेक्नोलॉजी फर्टीलायझरचे तंत्रज्ञान गोव्याच्या संस्थेकडून घेतले होते, तिकडेच युनिट सुरु केले. गोवा युनिटमध्ये प्लांटोझाइमचे व्यावसायिक उत्पादन प्रारंभ केले. प्रलशरच्या यशामागे “बाळासाहेब” म्हणजेच वडील कै. प्रल्हाद व्ही. चौधरी हेच होते. बाळासाहेबांचा प्लांटोझाइम आणि त्यामागील तंत्रज्ञानावर ठाम विश्वास होता. या विश्वासामुळेच त्यांनी प्रलशरची स्थापना केली आणि शेतकऱ्यांमध्ये “प्लॅन्टो कृषीतंत्र” प्रसिद्ध केले. त्यासाठी त्यांनी पीक उत्पादन वाढविण्यामध्ये प्लॅन्टोझाइमचे महत्त्व पटवून देण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांच्या शेतावर लाखो किलोमीटर प्रवास केला. कंपनी वाढीचे सर्व श्रेय वडिलांनाच जाते. यावेळी आम्ही पण दिवाळीच्या सुट्टीमध्ये या कामात वडिलांची मदत करायचो. त्यामुळे साहजिकच आमचा ओढ हा याच व्यवसायाकडे आपसूकच झाला, असेही यावेळी स्वप्नील चौधरी यांनी नमूद केले.
वसा व वारसा
कंपनीची धुरा आम्ही बंधूनी सांभाळल्यानंतर वडिलांनी दिलेला शेतकरी हिताचा वारसा आणि नेहमी व्यवसायापेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी कार्य करण्याचा वसा आम्ही आजही जपत असून हाच वसा व वारसा कृतीतून पुढील पिढीसाठी आम्ही देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्याहून पुन्हा जळगावला..
मध्यंतरी काही काळ सहकुटूंब पुण्यात वास्तव्याला असलेले निखील चौधरी सहपरिवार पुन्हा जळगावला स्थलांतरीत झाले. याबाबत विचारले असता निखील दादांनी सांगितले, की आमच्या घरात एकत्र कुटुंब पद्धत आहे. आजही आम्ही सर्व एकाच छताखाली राहतो. माझा परिवार हा नोकरी निम्मित पुण्यात स्थायिक होता. पत्नी उच्चपदस्थ संशोधक म्हणून कार्यरत होत्या. पुण्याच्या वातावरणात मुलाचा कल हा शहरी संस्कृतीकडे होता. मुलाला अमेरिकेचे जास्त आकर्षण होते. देशातील शहरांच्या तुलनेत त्यांना अमेरिकन शहरांची जास्त माहिती होती. त्याच्या भविष्याचा विचार करता हीच बाब आम्हाला चिंतादायी वाटत होती. प्रत्येक वडिलांना वाटते की, त्यांचा व्यवसाय हा त्याच्या मुलाने सांभाळावा. साहजिकच मला सुद्धा असेच वाटत होते. आमचा व्यवसाय हा कृषी उद्योगासंबंधीत आहे. त्यामुळे शहरी वातावरण आम्हाला गरजेचे नव्हते. शेतकऱ्यांच्या बांधावर जर आम्ही पोहचलो तरच आपण या क्षेत्रात टिकाव धरू शकतो, ही गोष्ट घरी पत्नीला समजावून सांगितली. त्यांना सुद्धा हे पटले आणि तिने क्षणात नोकरीचा राजीनामा देऊन जळगावला रहायचे निश्चित केले. जळगावमध्ये आल्यावर खऱ्या अर्थाने मुलाची शेतीशी नाळ जुळली असून, कोण
त्याही प्रकारचे त्यांचे शैक्षणिक नुकसान न होता तो आज प्रगती करत आहे, याचा अभिमान वाटतो असे सांगताना निखील दादांचा चेहरा अभिमानाने फुलला होता.
—————-
देशातील १० राज्यात
देशातील उत्तरेकडील १० राज्यात कंपनीचा प्रसार झाला असून ३१० हून सहकाऱ्यांच्या सहाय्याने हा उद्योग सुरु आहे. देशभरात तीन हजार डीलर असून कंपनीची उलाढाल जवळपास ७० कोटींपर्यंत पोहोल्याचे स्वप्नील दादांनी सांगितले. आता शेतीत नवीन पिढी सक्रीय होत आहे. त्यामुळे ते जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूक असून, नवीन तंत्रज्ञान वापरण्याकडे त्यांचा कल असतो. त्याच अनुषंगाने आम्ही देखील जास्तीत जास्त नवीन पिढीपर्यंत गुणवत्तापूर्ण उत्पादने पोहचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
—————————————
प्लॅन्टो कृषीतंत्र काय आहे..?
निखील स्वतः वाणिज्य पदवीधर असून मी माइक्रो-बायोलॉजी केलेले आहे. तरीही दोघांनी नंतर व्यवसायाची गरज लक्षात घेता पुढे कृषी पदवी घेतल्याचे स्वप्नील चौधरी यांनी नमूद केले. प्लॅन्टो कृषीतंत्र काय आहे..? हे विचारले असता चौधरी बंधुंनी सांगितले की, प्लॅन्टो कृषीतंत्र हे कोणतेही एक प्रकारचे उत्पादन नसून शेतकऱ्यांनी जर पिकावर एक रुपया खर्च केला तर त्याचा परतावा त्याला खर्चाच्या कित्येक पट मिळावा, यासाठी काय करावे लागेल याची ही प्रणाली आहे. त्यासाठी आम्ही विविध शासकीय संशोधन केंद्रावर अभ्यास करून हे प्लॅन्टो कृषीतंत्र सिद्ध केले आहे. नुकतेच आम्ही ऊस संशोधन केंद्र, पाडेगांव येथे प्रयोग केले असता खर्चाच्या तुलनेत समाधानकारक परतावा मिळाल्याचे दिसून आले. आता द्राक्ष पिकावर देखील असेच प्रयोग सुरु आहेत. राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना प्लॅन्टो कृषीतंत्र वापरल्यामुळे १ रु खर्च केल्यावर १५-२० रु पर्यंत परतावा मिळाल्याचे यावेळी निखील दादांनी सांगितले.
————————-
प्रसन्न – हसतमुख व्यक्तिमत्व
सतत प्रसन्न व हसतमुख व्यक्तिमत्व असणाऱ्या दोन्ही बंधूंच्या प्रसन्नतेचे कारण सांगताना चौधरी बंधू म्हटले की आम्ही कधीच आमच्या प्रतिस्पर्धी कंपनीचा, त्यांच्या उत्पादनाचा विचार करत नाही किंवा फार दूरचा विचार न करता आज मिळालेल्या दिवसाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. वडिलांनी आम्हाला कंपनीचा वारसा दिला आहे, तसाच सतत प्रसन्नतेचा वारसा सुद्धा त्यांनीच आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असल्याचे त्यांनी मोठ्या प्रसन्नतेनेच सांगितले.
—————————————
प्लॅन्टो हे नाव काय..? लवकरच टिशूकल्चर केळीतही…
प्लॅन्टो हे नाव काय आहे हे विचारले असता त्यांनी सांगितले की हे नाव वडिलांनी निवडले असून कदाचित प्लांटशी निगडीत म्हणून प्लॅन्टो निवडले असावे. भविष्यातील नियोजनाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, लवकरच आम्ही जैविक कीडनाशके, बुरशीनाशके यांची एक रेंज बाजारात आणणार असून त्याचे उत्पादन सुरु झाले आहे. प्लॅन्टो कृषीतंत्र हे उत्तरेकडील १० राज्यात खूप लोकप्रिय झाले असून, आता आम्हाला दक्षिणेकडील राज्यांत याचा प्रसार करायचा आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकांच्या टिशूकल्चरचे उत्पादन सुरु करण्याचा भविष्यातील मानस त्यांनी बोलून दाखविला.
——————
जळगावात अॅग्रोवर्ल्डचे तुल्यबळ कृषी प्रदर्शन
प्लॅन्टो कृषीतंत्र राज्यातील जवळपास सर्वच कृषी प्रदर्शनात सहभाग घेत असते. त्याचप्रमाणे जळगाव येथे होणाऱ्या अॅग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनात देखील आमचा नियमित सहभाग असतो. इतर प्रदर्शनांच्या तुलनेत जळगावला होणारे अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन हे इतरांच्या तुल्यबळ तसेच काटेकोर नियोजन व सुसज्ज वातवरणात, चांगल्या प्रतिसादात पार पडत असल्याचे यावेळी बोलतांना त्यांनी आवर्जून नमूद केले.