धुळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेल्या महिलांना यंदाच्या दिवाळीत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आनंदाची बातमी दिली आहे. कोरोनाच्या कालावधीत अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच करणाऱ्या शेतकऱ्यांच्या महिलांसाठी कृषी विभागाच्या योजना 30 टक्के राखीव असतील, अशी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी केली.
राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा व धुळे कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय महिला किसान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी योजनांमध्ये महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे कुटुंब प्रमुखांनी सातबारा उतारावर महिलांचे नाव लावून घ्यावे. त्यासाठीची प्रक्रिया सुलभ आहे. आठ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महिला शेतकरी पिकवीत असलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी मोठमोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. विपणन प्रक्रियेसाठी कृषी विभागाच्या साडेतीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतील.
प्रक्रिया उद्योग वाढीला प्रोत्साहन
राज्यात फळे व भाजीपाला तसेच इतर पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावरील प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आगामी काळात कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योगांना तातडीने मान्यता देण्यात येईल. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या मदतीचे दिवाळीपूर्वी वितरणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
.
राज्यातील महिला शेतकऱ्यांशी संवाद
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी मंत्री भुसे यांनी राज्यातील महिलांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. मंत्री श्री. भुसे यांनी नम्रता पराळ (ता. अंबरनाथ, जि. ठाणे), भावना निकम (दाभाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक), छाया चव्हाण (सावदा, ता. रावेर, जि. धुळे), कांचनताई परुळेकर (कोल्हापूर), जयश्री जोशी (औरंगबाद), साधना देशमुख (मुरुड, ता. जि. लातूर), जयश्री पारधी (जि. नागपूर) यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापौर प्रदीप कर्पे, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विभागाचे सहसंचालक संजीव पडवळ आदी उपस्थित होते.
Wweh