नवी दिल्ली, १७ सप्टेंबर २०२० – साथीच्या आजाराच्या महासंकटातून भारताने सावरण्याच्या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकऱ्यांचे असलेले महत्त्व अधोरेखित करत वॉलमार्ट फाऊंडेशनने आज दोन नव्या अनुदानांची घोषणा केली आहे. पाच वर्षांच्या कालावधीत भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याची बांधिलकी जपत सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी जाहीर केलेल्या २५ दशलक्ष डॉलर्सच्या (सुमारे १८० कोटी रु.) अनुदानाचा भाग म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे. नव्या ४.५ दशलक्ष डॉलर्सच्या निधीमुळे तानागर आणि प्रदान या दोन ना-नफा तत्वावरील संस्थांना शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवणे आणि बाजारपेठेचा अधिक लाभ घेण्यात साह्य करणे शक्य होणार आहे. या दोन्ही संस्था फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्सच्या (एफपीओ) माध्यमातून महिला शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या दोन नव्या अनुदानांसह वॉलमार्ट फाऊंडेशनने आजमितीस भारतातील आठ बिगर-सरकारी संस्थांच्या माध्यमातून एकूण १५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. यातून आजवर ८०००० महिला शेतकऱ्यांसह १४०००० शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम साधण्यासाठीच्या उपक्रमांना साहय केले गेले आहे.
वॉलमार्ट इन्कच्या चीफ सस्टेनॅबिलिटी ऑफिसर व कार्यकारी उपाध्यक्ष आणि वॉलमार्ट फाऊंडेशनच्या अध्यक्ष कॅथलीन मॅकलॉगलिन म्हणाल्या, “जागतिक कोविड १९ संकटाने भारतातील शेतकऱ्यांवर अधिक ताण आला आहे. विशेषत: एका रात्रीत उत्पन्न खालावल्याने महिला शेतकऱ्यांवर घर चालवण्याची अधिकच जबाबदारी येऊन पडली आहे. वॉलमार्ट फाऊंडेशनमध्ये आम्ही आणि आमचे अनुदान भागीदार शेतकऱ्यांना त्यांची या समस्येशी लढण्याची शक्ती वाढवता यावी आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी शाश्वत मार्ग सापडावेत यासाठी साह्य करत आहोत.”
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वॉलमार्ट फाऊंडेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, “भारतातील शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता आणि उत्पादन यावे, बाजारपेठेची मौल्यवान माहिती मिळवता यावी आणि अधिक परिणामकारक व पारदर्शक वितरण साखळीचा भाग होता यावे, यासाठी त्यांना साह्यभूत ठरेल, अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानात्मक सोल्यूशन्सना येथे मोठा वाव आहे. शेतकऱ्यांचे सबलीकरण करणे आणि त्यांना डिजिटल युगात आणणे, यासाठी फाउंडेशनच्या कार्याची भिस्त मोठ्या प्रमाणावर एफपीओंवर आहे.”
या निधीच्या माध्यमातून वॉलमार्ट फाऊंडेशन प्रस्थापित अशा स्वयंसेवी संस्थांसोबत काम कररून एफपीओंना त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी आणि अधिक सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी साह्य करणार आहे. शाश्वत कृषी पद्धतींची माहिती मिळवणे, सुयोग्य व्यवसाय पद्धती, प्राथमिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन व आर्थिक साह्य आणि बाजारपेठेची अधिक चांगली उपलब्धता यासंदर्भात एफपीओंना साह्य करणे, हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे एफपीओ भागीदार कोविड १९ च्या काळात लॉकडाऊनमध्ये भारतात फार महत्त्वाचे ठरले. भारत सध्या पूर्वपदावर येत असताना त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. वॉलमार्ट फाऊंडेशनच्या साह्याने अन्नधान्याच्या आणि स्वच्छता उत्पादनांच्या तातडीच्या गरजा पुरवणे, सुरक्षित विक्री माध्यमे उपलब्ध करून देणे, शेतीच्या कामातील साह्य आणि प्रशिक्षण उपक्रम तसेच शेतीतील बहुविधता आणि हवामानानुरुप योग्य उत्पादन पद्धतींसाठी शेतकऱ्यांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे या संस्थांना आणि एफपीओंना शक्य झाले.
महिला शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा नवा उपक्रम
वॉलमार्ट फाऊंडेशनच्या आताच्या अनुदानातून तानागर या आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्थेला २.६ दशलक्ष डॉलर्सहून अधिक निधी मिळणार आहे. त्यांचा यशस्वी फार्मर मार्केट रेडीनेस प्रोग्राम हा उपक्रम अधिक विस्तारण्यासाठी, तसेच आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना अधिक ज्ञान, स्रोत आणि आवाका यात साहय करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात १३ एफपीओंची शाश्वतता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यात ७ एफपीओ नव्या आहेत. यातून ५६०० महिला शेतकऱ्यांसह १५००० शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता आणि नफा वाढवण्यासाठी साह्य केले जाणार आहे.
फार्मर मार्केट रेडीनेस प्रोग्रामचा पहिला टप्पा २०१७ ते २०२० या काळात वॉलमार्ट फाऊंडेशनकडून मिळालेल्या २० लाख डॉलर्सच्या निधीवर चालवला गेला. हा निधी त्यांच्या २५ दशलक्ष डॉलर्सच्या बांधिलकीचा भाग नव्हता. तानागरच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ५६०० हून अधिक महिला शेतकऱ्यांसह १७५०० शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात सक्षम करण्यात आले. त्यातून त्यांची उत्पादकता आणि बाजारपेठेत जाणारे पीक वाढल्याने सुमारे ३० लाख डॉलर्स (२२० दशलक्ष रु.) किमतीचे ८५०० मेट्रिक टनांहून अधिक पीक विकले गेले.
“अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि एफपीओंना पाठिंबा देणे भारताच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. वॉलमार्ट फाऊंडेशनच्या अनुदानामुळे तानागरला या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातही शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे बाजारपेठेशी जोडता येईल. त्याचवेळी नवी पीके आणि उत्पन्नाचे नवे मार्ग देऊन कोविड १९च्या काळातही या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना साह्य करता येईल. एफपीओंना अधिक शाश्वत व्यवसाय पद्धतींपर्यंत नेणे हा आमचा मूळ उद्देश आहे. आम्ही प्रकल्पाच्या आयुष्याच्या पलिकडे जाऊन याचा विचार करतो,” असे तानागरचे भारतातील टीम लीड अमित कुमार सिंग म्हणाले.
दिल्लीस्थित ना-नफा तत्त्वावरील प्रोफेशनल असिस्टंस फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन (प्रदान) ही संसथा वॉलमार्ट फाऊंडेशनकडून मिळालेल्या १.९ दशलक्ष डॉलर्सच्या निधीचा वापर ‘लाइव्हलीहूड एनहान्समेंट थ्रू मार्केट अॅक्सेस अॅण्ड विमन एम्पॉवरमेंट’ (एलईएपी) हा उपक्रम पूर्व भारतात पश्चिम बंगाल, ओदिशा आणि झारखंडमध्ये राबवण्यासाठी करणार आहे. लीपमध्ये महिलांना एफपीओंमध्ये एकत्र येत नव्या कृषी पद्धती शिकणे, उत्पादनात वैविध्य आणि वाढ करणे आणि नफा मिळवून देणाऱ्या शेतीशी संबंधित उद्योगांचा लाभ यात साह्य केले जाणार आहे.
आदिवासी आणि वंचित समाजातील महिला शेतकऱ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने प्रदानचे वॉलमार्ट फाऊंडेशन प्रणीत लीप उपक्रमातून ४५००० महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून थेट २२५००० लोकांना याचा लाभ देण्याचे लक्ष्य आहे.
“वॉलमार्ट फाऊंडेशन आणि प्रदान यांचा समान दृष्टिकोन आहे… वंचित लोकांसाठी संधी निर्माण करून शाश्वत समुदायांची निर्मिती. लीप उपक्रमातून आम्ही दुर्गम भागातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एफपीओ तयार करणे आणि त्यांना दमदार व न्याय्य मूल्यसाखळीचा लाभ देत आधुनिक अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.” असे प्रदानचे कार्यकारी संचालक नरेंद्रनाथ दामोदरन म्हणाले.