राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाच्या बैठकीत सूचना
मुंबई – विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कमकुवत आर्थिक स्थिती याचबरोबर तोट्यातील शेती, वाढणारे कर्ज व त्यामुळे वाढते आत्महत्याचे प्रमाण यातून शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी दुग्ध व्यवसाय हमखास व शाश्वत उत्पन्नाचे साधन असून दुधाचे उत्पादन प्रतीदिन २ लाखावरुन ५ लाख लिटरपर्यंत वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांच्यासमवेत आयोजित बैठकीत श्री.ठाकरे बोलत होते.
मराठवाडा व विदर्भातील भौगोलिक स्थिती, सततचे दुष्काळ, सिंचनाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय देण्याकरिता जोडधंद्यांमधून शाश्वत स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी शासन शेतकऱ्यांमध्ये दुग्ध व्यवसायाकरिता क्षमता बांधणी करुन भविष्यात शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकास प्रकल्प मराठवाड्यातील ११ जिल्ह्यात २९३६ गावांमध्ये राबविण्यात येत होता. यामध्ये आता १३२६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. दुधाची उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड व सहयोगी संस्थांद्वारे कृत्रिम रेतनाची सेवा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे, संतुलित पशु खाद्य सल्ला व मार्गदर्शन सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पशुखाद्य पुरके पुरवठा, वैरण विकास कार्यक्रम, जनावरांमधील वांझपणाचे निदान, ॲनिमल इंडक्शन करणार. तसेच गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा पोहोचविल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होईल. मराठवाडा, विदर्भात अनेकदा दुष्काळस्थिती असल्याने पशुखाद्याचा तुटवडा भासतो. जनावरांच्या छावण्यांवर होणारा खर्च, चारा उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी भारतीय वंशांच्या दुधाळ गाई यामध्ये गिर, साहिवाल, राठी, लालशिंधी या गाई आणण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळून चांगला भावही मिळेल. राज्य सरकारच्या सहकार्याने दुग्ध विकास बोर्ड, मदर डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करुन मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्यात जनजागृती करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे, दुग्ध विकास विभागाचे आयुक्त नरेंद्र पोयम, पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव माणिक गुट्टे, प्रकल्प संचालक रविंद्र ठाकरे यांची उपस्थिती होती.