सचिन कावडे/ नांदेड
मागील अनेक दशकांपासून पारंपारिक शेतीतून उगवणाऱ्या पिकांना आता शाश्वत भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील माधव गवळी व शंकर गवळी या दोघा मित्रांनी पारंपरिक शेतीला बाजूला सारून जिरेनियम (सुगंधी वनस्पती) ची शेती करण्यास सुरुवात करुन लाखोंची उलाढाल करत आहेत. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात जिरेनियमची पहिली रोपवाटिका उभारण्याचे काम त्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर ते वसमत हायवे रोडवरुन ३ किलोमीटर आतमध्ये असलेले उमरी हे गाव नांदेड शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शोतीच आहे. या गावातील जवळपास सर्वच शेतकरी हे हळद, कापूस, सोयाबीन, ऊस व केळी अशी पारंपरिक पिके घेण्यावरच भर देतात. उमरी येथील माधव बाबूराव गवळी व शंकर राजाराम गवळी आज तिशीत असलेले हे दोघे लहानपणापासूनचे जीवलग मित्र दोघांच्याही घरी वडिलोपार्जित शेती आहे. या दोघांनी पारंपरिक शेतीला बाजूला सारून गतवर्षीपासून जिरेनियम (सुगंधी वनस्पती) ची शेती करण्यासा सुरुवात केली.
३५ गुंठ्यातून जिरेनियम शेतीची सुरुवात :
माधव व शंकर या दोघा मित्रांनी पारंपारिक शेती न करता शेतीमध्ये काही तरी वेगळे प्रयोग करून चांगले उत्पन्न कशा पद्धतीने घेता येईल, याची माहिती घेण्यास सुरुवात केली. युट्युबवर पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी केलेल्या जिरेनियम (सुगंधी वनस्पती) शेतीची त्यांना माहिती मिळाली. तसेच गतवर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये बारामती येथील झालेल्या कृषी प्रदर्शनातही जिरेनियम शेतीबद्दल संपूर्ण माहिती घेतली. जिरेनियम शेती करण्याचा निश्चय करून २८ फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अंबोळ येथून जिरेनियमची ८ हजार रोपे विकत आणून ३५ गुंठ्यात रोपांची लागवड करण्यात आली.
रोपांची लागवड आणि खर्च :
अहमदनगर येथील अंबोळ या गावातून जिरेनियमची ८ हजार रोपे प्रतिरोप दर ८ रुपये दराने असे एकूण ६४ हजार रुपयांची रोपे व वाहन भाडे १५ हजार असे ७२ हजार रुपये सुरुवातीला खर्च करण्यात आले. ३५ गुंठ्यातील जमिनीत शेणखत व कंपोस्ट खत मिसळून ट्रक्टरने नांगरणी व रोटायटर करून ४ फुटाचे बेड करून ठिंबक अंथरुण सव्वा फुटावर ट्रिपच्या साह्याने रोपांची मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच लागवड करण्यात आली. रोपे लागवडीसाठी कंपोस्ट खतासाठी एक ट्राॅलीचा ७ हजार रुपये खर्च, तर रोपे लागवडीसाठी ३ रोजंदारीवरील महिलांना दीड हजार रुपये देण्यात आले.
पहिल्या प्रयत्नात थोडा फटका :
जिरेनियम रोपांची लागवड केल्यानंतर साधारण साडेतीन ते चार महिन्यातच सुगंधी वनस्पतींच्या पानाचा पहिला लाॅट काढणीला येतो. माधव आणि शंकरने मार्च महिन्यात रोपांची लागवड केल्यामुळे ऐन पावसाळ्यातच उत्पादन आल्याने पाण्यातच गेल्याने थोडा आर्थिक फटका सहन करावा लागला.
जिल्ह्यात पहिलीच जिरेनियम रोपवाटिका :
जिरेनियम शेतीच्या पहिल्या प्रयत्नात आर्थिक फटका सहन करुनही माधव व शंकर या दोघांनी खचून न जाता २६ बाय ६० च्या जागेत नांदेड जिल्ह्यातील पहिली सुगंधी वनस्पती रोपांची पहिली रोपवाटिका उभारण्यात आली. या रोपवाटिकेतून तयार करण्यात आलेली रोपे नांदेड, तुळजापूर, अकोला, हिंगोली व उमरखेडसह अन्य जिल्ह्यात साडेपाच रुपये प्रतिरोप दराने ४५ हजार रोपांची विक्री करुन ४० ते ४५ दिवसात २ लाख ४७ हजार रुपये उत्पन्न मिळविले.
जिरेनियम डिस्टिलेशन युनिट :
औषधी व सुगंधी वनस्पतीची शेती करीत असताना जिरेनियम डिस्टिलेशन युनिटची आपल्या शेतात असणे आवश्यक असते. त्यामुळे या दोघा मित्रांनी ५ लाख रुपये खर्च करुन शेतातमध्ये या युनिटची स्थापना केली. यामध्ये ५०० किलोच्या दोन टाक्या असून यामधून जवळपास १ टन सुगंधी वनस्पतीच्या पाल्यातून ९०० ते एक हजार एमएल ऑईल तयार केले जाते. तसेच ३५ गुंठ्यातून दुसऱ्या लाटेत सुगंधी वनस्पतीच्या पानांपासून ११ लिटर (१० किलो) ऑईल तयार करण्यात आले. एक किलो ऑईल १२ हजार ५०० रुपये दराने असे १० किलो ऑईल जवळपास सव्वालाख रुपये दराने मुंबई येथील एस. एच. केळकर या कंपनीसोबत करार करुन विक्री करण्यात आले.
अडीच एकरमध्ये २२ हजार रोपे :
रोपवाटिकेत तयार करण्यात आलेली २२ हजार जिरेनियमची रोपे डिसेंबर २०२० मध्ये अडीच एकरात लावण्यात आली. एप्रिल महिन्याच्या शेवटी जिरेनियमची झाडे काढणीला येणार आहेत. सुगंधी वनस्पतीच्या पानांपासून जवळपास २० किलो ऑईलची निर्मिती होऊन अडीच लाख रुपयांचे उत्पन्न होणार असल्याचा मानस माधव गवळी व शंकर गवळी या दोघा मित्रांनी व्यक्त केला. वर्षाकाठी ३ ते ४ वेळा जिरेनियम शेतीतून उत्पन्न घेता येत असल्यामुळे वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होत आहे.
———————-
इतर पिकांच्या तुलनेत ७५ टक्के खर्च कमी
पारंपारिक शेतीत श्राश्र्वत उत्पन्न नसल्यामुळे आम्ही दोघांनी पारंपारिक शेतीला बाजूला सारून जिरेनियम (सुगंधी वनस्पती) शेतीस सुरुवात केली आहे. यामध्ये उत्पन्नाची हमी असून इतर पिकांच्या तुलनेत ७५ टक्के खर्च कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिरेनियम शेतीची आणखी ३ एकर शेतीमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
माधव गवळी –९६३७६६२६३३
————————
जिरेनियम शेती करणाऱ्यांना मोफत मार्गदर्शन
जिरेनियम शेतीची गतवर्षी सुरुवात केल्यानंतर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आमच्या जिरेनियम शेतीला भेट दिली आहे. तर अनेक शेतकऱ्यांना आम्ही दोघे जिरेनियम शेती करणाऱ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहोत. तसेच जिल्ह्यात एकमेव जिरेनियमची रोपवाटिका असल्याने मोठ्या प्रमाणात रोपांची लागवड करुन आम्ही रोपांची विक्री करत आहोत.
शंकर गवळी