मुंबई (प्रतिनिधी) – राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार झाले असून आज (20 सप्टेंबर) पासून पुढील तीन ते चार दिवस विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागा (IMD) कडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह विजा पडण्याचीही शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण होत आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल व परिणामी वाऱ्यांची दिशा पश्चिम- उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता असल्याने 20 (सोमवार) ते 23 (गुरुवार) च्या दरम्यान राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे के एस होसाळीकर यांनी दिलीय.
या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’
कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)
21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औरंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)
22 सप्टेंबर – पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)
मराठवाड्यात पावसाची स्थिती..
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि मराठवड्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीने होऊन मोठे नुकसानही झाले होते. आता पुन्हा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई येथील हवामान विभाग केंद्रातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.