प्रतिनिधी / पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला असून, पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.
यामुळे आहे पावसाची शक्यता
पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे केरळच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांबरोबरच बाष्पाचा पुरवठा होत आहे. पावसासाठी ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याची तीव्रता वाढून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक असेल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत आहे पावसाची शक्यता
मंगळवार : ( १६ मार्च )
जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.
बुधवार : ( १७ मार्च )
सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ.
गुरुवारी : ( १८ मार्च )
सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ