जळगाव, ता. १२ : शेतकरी हा समाजव्यवस्थेचा मूळ पाया असल्याने राज्य शासनाने सुरवातीपासूनच शेतकरी हिताचा विचार केला आहे. नुकतीच भूविकास बँकेच्या कर्जदारांना 976 कोटीची थकबाकी शासनाने माफ केली 376 कोटी रुपये एका वर्षात विम्याचे दिले. शेततळ्यांचे अनुदान 25 हजारांनी वाढवले. केळीचा रोजगार हमी योजनेत समावेश केला. यासारखे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय राज्यशासनाने घेतले असून हे शासन शेतकर्यांच्या सदैव पाठीशी आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शहरातील शिवतीर्थ मैदानावर (जी. एस. ग्राऊंड) अॅग्रोवर्ल्डतर्फे शुक्रवारपासून (11 मार्च) सुरु झालेल्या कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, महिला शेतकरी, कृषी विभागातील अधिकार्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. प्रदर्शन सोमवारी (ता. 14) पर्यंत सुरू आहे.
आमदार राजूमामा भोळे, आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ के. बी. पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील पाटील, अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी प्रदर्शनातून तंत्रज्ञान समजून घ्यावे
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की शेतकर्यांनाही आता बदलत्या काळानुसार बदलावे लागणार आहे. हवामानात होणार्या बदलांमुळे कमी कालावधीचे पीक घेत येते का याचाही विचार करणे गरजेचे झाले आहे असे सांगून अॅग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनातून तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध झाली आहे. शेतकर्यांनी हे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वर्षाचा पीक विमा असावा ः आ. भोळे
आमदार राजूमामा भोळे यांनी शेतकर्यांचा वर्षाचा पीक विमा काढला जावा व नुकसान झाले तर त्याची पूर्ण भरपाई शेतकर्यांना मिळावी असे सांगून शेतकर्यांचे आपण काही तरी देणे लागतो, ही भावना प्रत्येकाने ठेवावी असे सांगितले.
पालकमंत्र्यांची स्टॉल्सला भेट
प्रदर्शनात सहभागी झालेल्या यंत्र व अवजारे, शासकीय विभाग, बँक, कमी पाण्यात, शाश्वत उत्पादन देणार्या अपारंपरिक पिके, नामवंत ठिबक कंपन्यांसह बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठा उत्पादकांच्या स्टॉल्सला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांनी भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
———————
चौकटीसाठी….
सन्मानार्थी
पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्याहस्ते हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, पणनचे उपसरव्यवस्थापक भास्कर पाटील, कोकीळाबाई पाटील (लोंढे, ता. चाळीसगाव), डॉ. रमेश भदाणे (पंढरपूर), वैशाली पाटील (दसनूर, ता. रावेर), समाधान मालकर (कोल्हे, ता. पाचोरा), सोनू पाटील (कृषी विभाग), प्रवीण पाटील (राजुरी, ता. पाचोरा), विशाल चौधरी (शेंदुर्णी, ता. जामनेर), जगदिश बोरसे (चोपडा), ज्ञानेश्वर पवार (कृषी विभाग, चाळीसगाव), मुकेश सुर्वे (कृषी विभाग, जळगाव), अविनाश पाटील (धुळे), अमोल पाटील (केर्हाळे, ता. रावेर), मंगेश महाले (सायगाव, ता. चाळीसगाव), प्रताप पाटील (लोणे, ता. धरणगाव), डॉ. महेश महाजन (कृषी विज्ञान केंद्र, पाल), शीतल पाटील (कृषी विभाग, जळगाव), श्रुती थेपडे (जळगाव), सुकदेव गिते (पिंपळगाव, ता. पाचोरा), मोनिका भावसार व मयुरी देशमुख (जळगाव) आदींना अॅग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. स्वर्गीय प्रल्हाद पाटील यांना प्रदान करण्यात आलेला मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्लॅन्टो कृषी तंत्रचे संचालक स्वप्नील चौधरी यांनी स्विकारला.
———————
स्व. हरिभाऊ जावळेंचे स्वप्न साकार
सच्चा शेतकरी मित्र असलेल्या स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी केळी उत्पादकांचे प्रश्न सरकार दरबारी सातत्याने उपस्थित केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी देखील विधीमंडळात केळी उत्पादकांचे प्रश्न मांडत आल्याने फळपिकामध्ये केळीचा समावेश करण्यात आला. शिवाय केळीचे नुकसान झाले तर सरकारकडून अडीच लाखांची भरपाई देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्वर्गीय हरिभाऊ जावळेंचे स्वप्न साकार झाले असून हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.