डॉक्टर म्हटले की डोळ्यांसमोर संमिश्र चित्र उभे राहतात. मानवी आयुष्यात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून देवदूताची भूमिका पार पडणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर..! डॉ. राधेश्याम चौधरी असेच एक व्यक्तिमत्व जे डॉक्टर असूनही समाज व सामाजिक प्रश्नांप्रती तळमळीने प्रामाणिक काम करणारे एक समाजकारणी अशी त्यांची ओळख आहे. मानवी मूल्य जपत लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी थेट मुंबई मंत्रालय ते दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयापर्यंत धडका देण्याच्या त्यांच्या प्रयत्नवादी उपक्रमांमुळे ते जळगावकरांच्या कायम चर्चेत असतात. डॉ. राधेश्याम चौधरी यांनी ॲग्रोवर्ल्डच्या कॉर्पोरेट कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध पैलूंना उजाळा दिला.
शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील रहिवाशी असलेल्या डॉ. राधेश्याम चौधरी यांनी आपली वैद्यकीय कारकीर्द आपल्या स्थानिक गावालगतच सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून सुरु केली. त्याही वेळी त्यांनी कारकिर्दीची सुरुवात एक समाजकारणाशी निगडीत वैद्यकीय सेवा देण्यापासून केली. अर्थात हे संस्कार, हे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले होते. सेवा बजावतांना त्यांना उपलब्ध असलेल्या सरकारी गाडीचा वापर देखील त्यांनी एक रुग्णवाहिका म्हणून केला. खेड्यापाड्यातील रुग्णांना तो एक मोठा आधार निर्माण झाला आणि नंतरच्या काळातही त्यांनी विविध ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतांना विविध समाजउपयोगी उपक्रम राबविले. त्यात नवीन वैद्यकीय केंद्र सुरु करणे असो किंवा रुग्णालयातील अंतर्गत सुविधा पुरविणे या सर्वच बाबतीत त्यांनी पुढाकार घेत कार्य सुरूच ठेवले.
हाडाचे शिक्षक असलेल्या मुख्याध्यापक वडिलांचा मुलगा म्हणून त्यांना लहानपणीच संस्कार व तत्वांची शिदोरी मिळाली होती. त्यावरच त्यांच्या आजवरच्या प्रवासाला गती मिळाली. सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉ. चौधरी यांनी यावेळी बोलतांना आपल्या MBBS च्या आठवणी सांगताना मोठ्या अभिमानाने सांगितले की, काळ्या आईची कृपा झाली म्हणून मी आज या क्षेत्रात येऊ शकलो. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण देखील दिले. त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी पैश्यांची अडचण होती. अशाप्रसंगी त्यांच्या शेतात लावलेल्या क्रांती-१ या कापसाच्या वाणाचे विक्रमी उत्पन्न मिळाले आणि त्याच पैशांवर त्यांचे सर्व शिक्षण पार पडले, असे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले.
“कमी दरात उत्तम सुविधा”
व्यवसायाने डॉक्टर असूनही त्यांनी आपले विविध क्षेत्रातील काम करतांना रुग्ण सेवेवर कधीच परिणाम होऊ दिला नाही. “कमी दरात उत्तम सुविधा” हे त्यांचे तत्व त्यांच्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मनाचे प्रतिक आहे. एकूण काय तर डॉक्टरी पेशा, राजकारण आणि समाजकारण या सर्वाची सांगड घालून त्यांनी सुसंकृत असे समाजकारण सुरूच ठेवले आहे. अर्थात या तत्वांचे श्रेय ते स्वतःच्या आई-वडिलांना देण्यास विसरले नाही.
डॉ. चौधरी यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. मात्र त्यांच्या या भिडस्त स्वभावामुळे अनेकदा त्यांची जवळचे लोकं देखील दुखवले गेले. तरीही त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीत कधीही बदल केला नाही की तडजोड स्वीकारली नाही. याचे त्यांनी विविध दाखले दिले. कालांतराने डॉक्टरांनी आपले स्वतःचे हॉस्पिटल २००४ ला सुरु केले. थोड्या दिवसांनी आपल्या स्वतःच्या वास्तूत प्रवेश केला. डॉक्टरांचा आजही बराचसा वेळ हा समाजकारणात जात असून त्यांच्या या समाजसेवी वृत्तीमुळे त्यांच्या भोवतीचे लोकप्रियतेचे वलय अजूनच गडद होत आहे. जळगावात विविध शहरी समस्यांवर देखील त्यांनी “जळगाव फर्स्ट” या अराजकीय मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना सोबत घेत विविध उपक्रम राबविले. त्यांच्या या कामाची दखल घेत विविध राजकीय पक्षांना देखील त्यांना सोबत घेण्याचा मोह झाला आणि आणि समाजकारण करतांनाच त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले.