सचिन कावडे /नांदेड
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिऊर येथील सुनील बाबूलाल पहाडे (३९) यांनी वडिलोपार्जित असलेल्या पारंपारिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून सन २०१४ पासून भाजीपाल्याची शेती करण्यास सुरुवात केली. सोयाबीन, कापूस व हळद आदी पिकांसह भाजीपाला लागवड करून दोन ते तीन महिन्यातच पहाडे हे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.
पैनगंगा नदीच्या काठी वसलेले हदगाव तालुक्यातील शिऊर हे नांदेडपासून ७५ किलोमीटर अंतरावर असलेले छोटेसे गाव. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर १८०० लोकसंख्या असलेल्या या गावालगत पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर तसेच पुरातत्त्व विभागाकडे नोंद असलेल्या प्राचीन लेण्या गावाची शोभा वाढवतात. याच गावातील सुनील पहाडे हे बीए पदवीधर असून सन २००३ पासून शिक्षण घेत वडिलांना शेतीच्या कामात मदत करत असत, यामुळे त्यांना पूर्वीपासूनच शेती विषयी आकर्षण आहे. मागील काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांना पॅरेलेसीस (लकवा) झाल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी सुनील यांच्या खांद्यावर आली.
मिश्र भाजीपाला लागवड :
सुनील पहाडे यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह वडिलोपार्जित असलेल्या ७ एकर शेतीवर चालतो. शेतामध्ये सोयाबीन, उडीद, मुग, कापूस व हळद अशी पारंपरिक पिके घेतली जातात. सुनील यांनी पारंपारिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून सन २०१४ पासून भाजीपाला शेती करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मार्च २०१४ मध्ये दोन एकर शेतीमध्ये भेंडी, दोडके, काकडी व पालकांची लागवड करण्यात आली होती. यामध्ये ३० गुंठ्यात भेंडी, ३० गुंठ्यात दोडके (तुरई), १५ गुंठ्यात काकडी आणि ५ गुंठ्यात पालकाची लागवड केली होती. एप्रिल-मे च्या ४५, ५० दिवसांमध्ये हा भाजीपाला काढणीस सुरुवात होते.
कमी दिवसात जास्त नफा :
दोन ते तीन महिन्याच्या आतच भेंडीच उत्पादन ४० क्विंटल, दोडके २५ क्विंटल, काकडी २५ क्विंटल आणि २५ ते ३० हजाराची पालक झाली होती. सदर भाजीपाला उमरखेड व पुसदच्या मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी नेण्यात आला होता. ४० क्विंटल भेंडी २५ रुपये किलो दराने विक्री करून १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर २५ क्विंटल दोडके ४० रुपये किलो दराने विक्री करून १ लाख, २५ क्विंटल काकडी १० रुपये किलो दराने विक्री करून २५ हजार असे लाखांचे उत्पन्न पहाडे यांना भाजीपाला व्यवसायातून मिळाले. कमी दिवसात जास्त नफा भाजीपाला विक्रीतून मिळत आहे.
कांदा विक्रीतूनही लाखांचे उत्पन्न :
भाजीपाला लागवडीसाठी बियाणे, फवारणी, खत व काढणीच्या वेळेला रोजंदारीवर ४ महिला आणि भाजीपाला विक्रीसाठी मार्केटला नेण्याचा वाहतूकीचा असा एकूण १ लाख रुपये खर्च करण्यात आला. ऑक्टोबर २०१९ मध्ये १४ गुंठ्यात गाजराची लागवड करून जानेवारी २०२० मध्ये जवळपास ४० क्विंटल उत्पादन घेतले. १ क्विंटल २२०० ते २९०० रुपये भाव मिळून जवळपास १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. दरम्यान, २५ जानेवारी २०२० रोजी १४ गुंठ्यात कांद्याची लागवड केली होती. १३० ते १३५ दिवसानंतर कांदा काढणीस सुरूवात करून ९० क्विंटल कांद्याचे उत्पादन झाले होते. पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात शिऊर या गावातच १० रुपये किलो दराने ३० क्विंटल कांद्याची विक्री करुन ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
दरम्यान, सप्टेंबरमध्ये पुसद व उमरखेडच्या बाजारपेठेत १६ ते १७ रुपये किलोदराने ६० क्विंटल कांदा विक्री करुन १ लाख असे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचे सुनील पहाडे यांना उत्पन्न मिळाले आहे. जून व जुलैमध्ये २ एकर शेतीमध्ये कोथिंबीर लागवड केली होती; परंतु या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कोथिंबीरचे उत्पादन कमी होऊन ४ क्विंटलपर्यंत उत्पादन झाले होते. १ किलोला १८० ते २०० रुपये भाव मिळून जवळपास १ क्विंटल १६ ते १८ हजार रुपयाला कोथिंबीरची विक्री करण्यात आली.
५० गुंठ्यात ५ लाखांचा कांदा
तसेच नोव्हेंबर २०२० मध्ये ५० गुंठ्यात कांद्याची लागवड करण्यात आली होती. १० ते १५ फेब्रुवारी २०२१ दरम्यान कांदा काढण्यात आला, यामध्ये २०० क्विंटल कांद्याचे उत्पादन झाले होते. काही व्यापाऱ्यांनी थेट शेतातून २६ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला. कांदा विक्रीतून पहाडे यांना ५ लाख २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर कांदा लागवडीसाठी नर्सरी तयार करणे, खत, बियाणे, औषधी व्यवस्थापन, काढणी व अन्य खर्च असा एकूण एक ते सव्वा लाख रुपये खर्च झाला.
दरम्यान, कांदा काढणीनंतर याच ५० गुंठ्यात ५ मार्च २०२१ रोजी कलिंगडाची (टरबूज) लागवड करण्यासाठी ६ फुट अंतराने ट्रक्टरच्या साह्याने बेड तयार करून रासायनिक खताचा बेसीक डोस टाकून ठिबक सिंचन अंथरुण त्यावर मल्चिंग पेपर अंथरण्यात आला. तर १५ इंचाच्या अंतराने झिक-झॅक पद्धतीने होल तयार करून त्यावर ७ हजार बियांची लागवड करण्यात आली. ६५ ते ७० दिवसात कलिंगड काढणीस सुरुवात करण्यात येईल, अंदाजित ३० टन कलिंगड (टरबूज) उत्पनाची अपेक्षा असल्याचे सुनील पहाडे यांनी सांगितले.
पारंपरिक शेतीला जोड भाजीपाला लागवडची
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतात. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही पारंपारिक शेतीला थोड बाजूला ठेवून आपल्या शेतात काय नव-नवीन करता येईल, याचा अभ्यास करुन वेगवेगळे प्रयोग करायला पाहिजेत. तसेच पारंपरिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून भाजीपाला लागवड करावा, यासाठी मी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करत आहे.
सुनील पहाडे — ९९२१२९०६६०