….पन्हाळा स्वराज्यात सामील झाला.
गड कबज्यात येताच गडाच्या दरवाज्यांना चौकी-पहारे बसवले अगेले. पहाटेपासून सय्यदखानानं मोकळा केलेला वाडा झाडलोट करून राजांच्या स्वागतासाठी सज्ज झाला. गडाच्या पूर्वेच्या तुटलेल्या कड्यावर दुमजली सदर-इ-महाल उभा होता. त्या महालातली बैठक सजली. बाजीप्रभू आपल्या नजरेखाली तो महाल सजवत असता मानाजी नाईक धावत आले. भर थंडीचे दिवस असूनही मानाजीचा चेहरा घामानं डवरला होता. सारं अंग थरथरत होतं. बाजींना पाहताच त्यांना रडू आवरेना. ते ओरडले,
‘बाजी, घातs झाला!’
‘काय झालं?’ हुंदके देणाऱ्या मानाजींना बाजींनी विचारलं, ‘मानाजी, रडू आवरा आणि काय झालं, ते सांगा.’
मानाजींनी डोळ्यातले अश्रू निपटले. त्यांनी सांगितलं,
‘त्या हरामखोरानं माझी पोर, तुळसा पळवली.’
‘म्हणजे?’
‘तो पाजी सय्यदखानss’
‘पण हे केव्हा कळलं?’
‘आत्ताच! धुणं धुवायला सोमेश्वराच्या तळ्यावर पोर गेली व्हती. माघारी आली न्हाई. तपास केला, तवा खानाच्या कबिल्यातनं तिला नेली, असं समजलं.’
‘आणि ते पाहत तुमची माणसं स्वस्थ बसली? काय इमान? मानाजी, आणि तसल्या माणसांची चाकरी तुम्ही करीत होता?’
‘त्यांचं पाप त्यांच्यासंगं, असं आमी म्हनत व्हतो.’
‘गप्प बसा! या गडावरच्या पोरीबाळी तो बाटवत होता, तेव्हा तुम्हांला त्याची लाज वाटली नाही?’
‘माझी पोरss’
‘चिंता करू नका. त्या सय्यदखानाला ही लूट परवडणार नाही.’ बाजींनी आबाजी प्रभूंना बोलावून घेतलं. त्यांना सांगितलं,
‘आबाजी! त्या सय्यदखानाला मुसक्या बांधून गडावर हजर करा.’
आबाजी पन्नास स्वार घेऊन सय्यदच्या पाठलागावर रवाना झाले.
सूर्य माथ्यावर येण्याआधी राजे गडावर येत असल्याची वर्दी आली. बाजी, फुलाजी राजांच्या स्वागतासाठी चार दरवाज्यावर हजर झाले! चार दरवाज्याशी राजे पायउतार झाले. प्रेमभरानं बाजींच्या पाठीवर हात ठेवत राजे म्हणाले,
‘बाजी, तुमची करामत समजली! सामोपचारानं गड घेतलात. बारं झालं.’
बाजींच्यासह राजे जात असता, गोल घुमटीची तीन मजली इमारत राजांच्या नजरेत भरली. त्या इमारतीकडं बोट दाखवत राजांनी विचारलं,
‘बाजी, ही इमारत….?’
‘राजे! ह्या इमारतीला कलावंतिणींचा सज्जा म्हणतात. आदिलशाहीचा पहिला व दुसरा इब्राहिम अदिलशहा यांच्या कारकीर्दीत त्यांचे मनोरंजन करणाऱ्या तीस नायकिणींच वास्तव्य इथं असे. दुसऱ्या मजल्यावर त्यांचं नाच-गाणं चाले.’
‘तरी नशीब! तिसरा मजला रिकामा ठेवला, ते!.’ राजे म्हणाले, ‘बाजी, असल्या शौकापायीच साम्राज्यं कोसळतात.’
राजे क्षणभर स्वतःशीच हरवले. ते बोलत होते,
‘कैक वेळा आम्हांला कळेनासं होतं. या भोगसंपन्नांचे बादशहा आणि आमचे धर्मभोगते राजे यांत फरक काय? ते देवगिरीचे राजे, त्यांनी उभारलेले धर्ममंडप आणि विजयनगरची देवालयं, त्यांतली कथा-कीर्तनं आणि या उपभोगासाठी बांधलेल्या हवेली— यांत अंतर काय? कैक वेळेला विचारांची गल्लत होते.’
बाजी म्हणाले,
‘राजे, एक धर्मकार्य आणि दुसरा उपभोग ss’
‘उपभोग! त्याचाच अर्थ तृप्ती! जाऊ दे बाजी. यात वैचारिक गोंधळ खूप आहे. याचा उलगडा करणं इतकं सोपं नाही.’
जगदंबेच दर्शन घेऊन राजे वाड्यात आले.
दोनप्रहरी राजे गड पहायला बाजींच्याबरोबर बाहेर पडले. तीनशे बुरूजांनी कडेकोट झालेला तो गड पाहून राजे प्रसन्न झाले. प्रत्येक बुरूज तोफांनी सज्ज होता. गडाची गंगा, जमुना ही धान्याची कोठारं भरलेली होती. राजे गडाची पाहणी करून माघारी आले. सायंकाळची वेळ झाली होती. वाड्यासमोर शिबंदीची गर्दी दिसत होती. चिंतायुक्त मनानं राजांनी वाड्यात प्रवेश केला. आत प्रवेश करताच राजांनी बाजींना विचारलं,
‘बाजी, काय प्रकार आहे, पहा.’
राजे सदरेवर आले तेव्हा, त्यांच्यासमोर मुसक्या बांधलेला सय्यदखान आणि त्याच्या मागं तुळसा अधोवदन उभी होती. मानाजीराव नाईक खाली मान घालून एका कोपऱ्यात उभे होते. ते दृश्य पाहून राजे चकित झाले. आबाजी प्रभूंना त्यांनी विचारलं,
‘हा काय प्रकार आहे?’
‘महाराज!’ आबाजी म्हणाला, ‘गडाचे गडकरी मानाजी नाईक यांची मुलगी तुळसा, तिला या सय्यदखानानं गड सोडताना आपल्या कबिल्यातून बळजबरीनं पळवून नेली.’
‘हे मानाजीरावांना फार उशिरा कळलं.’ बाजी म्हणाले, ‘आम्ही गडाचा ताबा घेतला आणि हे मानाजीराव धावत आले. आबाजीसंगती शिलेदार देऊन या सय्यदचा पाठलाग करवला.’
‘चांगलं केलंत!’ राजे म्हणाले, ‘पण हे सय्यदखान कोण?’
‘आदिलशाहीचे सरदार! गडाचे मानकरी.’ बाजींनी सांगितलं, ‘आपल्या आज्ञेप्रमाणे यांना आपल्या कबिल्यासह बाइज्जत सोडलं होतं. पण….’
‘समजलं!’ राजे म्हणाले. त्यांचा चेहरा उग्र बनला होता. त्यांची जळजळीत नजर सय्यदखानावर खिळली. राजांनी आज्ञा दिली,
‘बाजी! सय्यदखानाला कुठल्यातरी दक्षिणेच्या बुरूजावरून तोफेच्या तोंडी द्या.’
‘रहेम! राजे, रहेमss’ सय्यदखान ओरडला.
‘रहेम! आणि तुम्हांला?’ राजे बोलले, ‘नाही, सय्यदखान. ते होणे नाही! तुम्ही मुसलमान, म्हणून आम्ही ही शिक्षा देत नाही. तुम्ही शत्रूगोटातले म्हणूनही सूड उगवला जात नाही. पण… पण आमच्या राज्यात असल्या बदअम्मलला जागा नाही. रांझ्याच्या पाटलानं असाच बदअम्मल केला होता. आम्ही त्याचे हातपाय तोडले.’
राजे हशमांना म्हणाले,
‘घेऊन जा त्या सय्यदखानाला. शिक्षेची अम्मलबजावणी तातडीनं करा.’
जेरबंद केलेला सय्यदखान मुसमुसून रडत होता. हशमांनी त्याला बाहेर नेलं. राजांची नजर उभ्या असलेल्या तुळसाकडं गेली. ते म्हणाले,
‘मुली, रडू नको. नशिबानं वेळीच संकट टळलं! मानाजी तुमची मुलगी तुम्हांला मिळाली. ही परमेश्वर-कृपा आहे.’
‘क्षमा असावी, राजे!’ मानाजी म्हणाले, ‘त्या सय्यदला शिक्षा मिळाली. मला सगळं मिळालं. पणs’
‘पण काय?’ राजांनी विचारलं.
‘आमची तुळसा, आमची ऱ्हायली न्हाई.’ डोळ्यांत पाणी आणून मानाजी म्हणाले.
‘काय म्हणालात?’ राजांनी विचारलं.
‘एकदा तिला पळवून नेली. ती बाटली, का न्हाई, ते आमास्नी ठावं न्हाई. या म्होरं ती आमास मेली आणि तिला आमी मेलो.’
‘मानाजी! त्या पोरीचा काय कसूरss’
‘न्हाई, राजे! त्याम्होरं तिची वाट वेगळी; आमची वाट वेगळी. तिला आमच्या घरात जागा न्हाई.’
मानाजीच्या बोलण्यानं राजे थक्क झाले. नकळत ते उद्गारले,
‘मग त्या सय्यदखानाला कशाला पकडायला लावलंत?’
‘आबरूसाठी, राजे ss’ मानाजी म्हणाले.
‘छान!’ हताशपणे राजे उद्गारले. त्यांचं लक्ष अश्रू ढाळत उभ्या असलेल्या तुळसाकडं गेलं. राजे किंचित भावनाविवश झाले. ते म्हणाले,
‘मुली! तुझा काही अपराध नाही. तुझ्या आई-बापानं तुला टाकलं, तरी आम्ही टाकणार नाही. यापुढं आमची जशी सखू, राजकुंवर, तशी तूss’
तुळसानं आपले डोळे निपटले. तिनं मान वर केली. त्या नजरेत कोरडेपणा होता. भकास नजरेनं राजांच्याकडे पाहत ती म्हणाली,
‘राजं! तेवढं थोरपन माझं न्हाई. बाबानं सांगितलं, ते खरं हाय. त्यांची वाट येगळी; माजी येगळी. मी माझ्या वाटंनं जाईन.’
तुळसा काय बोलते, याचा अर्थ समजायच्या आत तुळसा वाड्याबाहेर धावत सुटली. राजे ओरडले,
‘अरे, तिला थांबवा!’
राजे सदरेच्या पायऱ्या उतरले. वाड्याबाहेर पडले. आबाजी धावत सुटला. सायंकाळची सावली गडावर उतरत असता एक किंकाळी वातावरणात घुमली.
तुळसानं कड्यावरून उडी घेतली होती!
राजांनी आपल्या दोन्ही कानांवर हात गच्च दाबून धरले. पण उठलेला आवाज कानांत घुमतच राहिला. राजांच्या डोळ्यांतून दोन अश्रू नकळत खाली ठिबकले. राजे माघारी वळले.
मानाजी नाईकांकडं नजर वळताच राजांचं शरीर संतापानं पेटून उठलं. आपला संताप आवारत ते म्हणाले,
‘मानाजी! एकंदरीत तुम्ही अब्रूनिशी बचावलात. आता तुळसाची काळजी राहिली नाही.’
मानाजी नाईक अश्रू ढाळत उभे होते. ते पाहून राजांना आपला संताप आवारता आला नाही,
‘मानाजी, नाव बाळगलंत, पण ते तुम्हांला पेलता आलं नाही. आता रडता कशाला? ती तुम्हांला मेली होती ना? बाजी, ज्यांना आपल्या बायका-मुलींची जबाबदारी पेलता येत नाही, त्यांना आमचं अभय नाही. मानाजी नाईकांना शंभर मोहरा देऊन त्यांच्या कुटुंबासह त्यांची गडाखाली रवानगी करा.’
मानाजी नाईकांचे अश्रू डोळ्यांतच आटले. तो म्हणाला,
‘राजे! मी जाणार कुठं?’
‘फार दूरवर नाही! आदिलशाहीचा मुलूख जवळच आहे. त्या मुलखात जा. मान विसरा. लाचारी करा. कुठंही तुम्हांला जागा सापडेल.’
‘हा अन्याय हाय, राजेss’
‘न्याय, अन्याय आम्हांला शिकवता?’ राजे गर्जले, ‘मानाजी! पोर पळवून नेली, तरी तलवार घेऊन धावला नाहीत? तुम्हांला कुणी अडवलं होतं? तुमची मुलगी पळवून नेली जाते आणि आबाजी तिला सोडवून आणतात, याची लाज वाटायला हवी होती. लाचारss निर्लज्जss ! घेऊन जा त्यांना माझ्या समोरून!’
___आणि त्याच वेळी गडावरून तोफेचा आवाज घुमला.
उद्विग्न झालेले राजे सदरेवरून निघून गेले.