प्रतिनिधी/मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात लक्षणीय बदल झाले असून, आज (दि.१२ ऑक्टोबर) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह संपुर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन भारतीय हवामान शास्त्र विभागाने केले आहे.
का वाढला परतीच्या मान्सूनचा जोर?
पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-उत्तर दिशेने सरकत आहे. त्याचबरोबर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली असून, बुधवार दि.१४ पर्यंत अंदमानच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याच्या परिणामी परतीचा मान्सून हा राज्यात जोरदार बरसणार आहे.
असा बरसेल परतीचा पाऊस
काल विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यातील दमदार पाऊसानंतर आता
१२ ऑक्टोबर – विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र
१३ ऑक्टोबर – विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोवा
१४ ऑक्टोबर – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा
१५ ऑक्टोबर – विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण
पावसाच्या काळात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळेला राहील. परिणामी मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.