तुलसी गौडा हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. निमित्त आहे पद्मश्री पुरस्काराचे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तुलसी गौडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षणाच्या कामासाठी तुलसी गौडा यांचा हा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी तुलसी गौडा या गळ्यात काळ्या मणींची माळ, अंगावर एक सुती वस्त्र परिधान करुन पायात काहीही न घालता अनवाणी गेल्या होत्या. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यात तुलसी गौडा या लक्षवेधी ठरल्या.
तुलसी गौडा कोण आहेत?
कर्नाटक राज्यातील होन्नाळी गावामध्ये तुलसी गौडा वास्तव्यास आहेत. त्या आदिवासी कुटुंबात वाढल्या असून हलक्की या आदिवासी जमातीचे प्रतिनिधीत्व करतात. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी त्या गेल्या 60 वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत 30 हजार झाडे लावून जगवली आहेत. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना वन विभागात नोकरी मिळाली. वन विभागाची नर्सरी सांभाळताना त्यांनी जंगल संवर्धनाबाबत जागरुकता पसवण्याचेही कार्य केले आहे.
ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात
जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळख
तुलसी गौडा हा लहान असताना आपल्या आई सोबत शेत मजुरी करायच्या. कमी वयात त्यांचे लग्न झाले. मात्र, त्या 17 वर्षांच्या असतानाच त्यांचे पतीन गोविंद गौडा यांचे निधन झाले. लहान वयातच त्यांचे वडील त्यांनी गमावल्यानंतर पतीचे जाणे हा त्यांना दुसरा धक्का होता. वडिलांच्या मृत्यूमुळे त्यांना औपचारिक शिक्षणापासून वंचित राहावे लागले, तर पतीच्या मृत्यूमुळे त्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती.
उदरनिर्वाहासाठी सरपण गोळा करण्यावर त्यांना अवलंबून राहावे लागले. लहानपणापासूनच झाडांविषयी प्रेम असलेल्या तुलसी गौडा यांनी वनसंवर्धनासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र, त्यांना झाडे आणि औषधी वनस्पतीचे अफाट ज्ञान आहे. त्यामुळेच जंगलाचा विश्वकोश म्हणून त्यांचा लौकीक आहे. त्यांनी स्वतः लावलेले झाड जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ते त्याची काळजी घेतात.
वन विभागातील कार्य
पतीच्या निधनानंतर आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी तुलसी गौडा त्यांना उदरनिर्वाहाची गरज असल्याने त्यांनी वन विभागाची नोकरी स्वीकारली आणि कामाला सुरुवात केली. वन विभागात त्या स्वयंसेवक म्हणून रूजू झाल्या होत्या. सुरवातीला त्यांना केवळ 1.25 रुपये पेमेंट होते. जी एक तुटपुंजी रक्कम होती. त्यामुळे काही लोकांनी त्यांना एवढ्या कमी पैशात काम न करण्याचा सल्ला दिला. मात्र, झाडे आणि रोपांची आवड त्यांना असल्याने त्यांनी या कामात स्वतःला पूर्णपणे गुंतवून घेतले. सेवानिवृत्त होऊनही त्यांचे त्यांचे कार्य सुरुच ठेवले आहे. या कार्यात त्यांना त्यांचा नातू शेखर आता मदत करीत असतो.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत
तब्बल 30 हजारांहून अधिक रोपे लावून त्या वाढवणार्या तुलसी गौडा यांचा राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा यांनी पुरस्कार स्विकारला, त्यावेळी त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे हात जोडून स्वागत केले.
नरेंद्र मोदी यांनी हा फोटो इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अनेक नेटकर्यांनी या फोटोला इमेज ऑफ द डे हे कॅप्शन दिले आहे. तुलसी गौडा यांना 1986-87 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडून इंदिरा प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित राज्योत्सव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता.
हरित योद्धा म्हणून लौकीक
तुलसी गौडा या दूरच्या जंगलात फिरून आपल्या काही सहकार्यांसोबत बिया गोळा करायच्या. त्यांची छाननी करुन त्या ओसाड आणि निर्जन जंगलात रोपण करायच्या. होन्नल्ली, मस्तीगट्टा, हेग्गुरु, होलीगे, वज्रहल्ली, डोंगरी, कल्लेश्वरा, अडागुर, आगासूर आणि इगराड आदी गावांमध्ये हजारो झाडे लावली. ज्यांची संख्या 30 हजारांहून अधिक आहे. यात साग, तीळ, नंदी, पिंपळ, फिकस, बांबू, रतन आणि जामुन, काजू, जायफळ, आंबा, फणस आणि कोकम अशी खाद्य फळांची देखील झाडे आहेत.
त्यांचे हुबळी-अंकोला रस्त्यावरील घर सर्वांसाठी खुले आहे. फुले, बिया आणि झाडे वाढवण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी हजारो लोक त्यांच्याकडे जातात. वनस्पतींबद्दलच्या प्रेमापोटी त्यांना वृक्षदेवी देखील म्हणतात. तब्बल सहा दशकांपासून पर्यावरण संवर्धन कार्यात त्या सहभागी आहेत. जवळपास 300 हून अधिक झाडांच्या प्रजाती आणि त्यांची फुले ओळखण्याची त्यांची क्षमता आहे. वनस्पती, वनौषधी आणि झाडे यांचे विपुल ज्ञान त्यांच्याकडे आहे. नुसत्या वासावरुन त्या झाड कोणते हे सहजतेने ओळखू शकतात. त्यांनी लावलेले रोप किंवा झाड कोणी तोडले तर त्या खूप दुःखी होतात, बर्याचदा तर त्यांना रडूच कोसळते. इतके त्यांना झाडांविषयी प्रेम आहे.
झाडे जगाचे तारणहार आहेत आणि त्यांच्यात त्यांना देवत्व दिसते. त्यांच्या या कार्यामुळे हरित योद्धा म्हणून त्यांचा सर्वत्र गौरव केला जातो. मी आतापर्यंत 30 हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. मला आणखी लागवड करायची आहे. झाडे पाणी, माती आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास आणि राखण्यास आणि हवेतील प्रदूषण काढून टाकण्यास मदत करतात. झाडे लोकांचे जीवन समृद्ध करतात आणि जमीनही सुशोभित करतात असे त्या नेहमी म्हणतात.
झाडांसाठी संपूर्ण दिनचर्या
तुलसी यांची पहाटेपासून ते रात्रीपर्यंत झाडांसाठीच दिनचर्या असते. पहाटे त्या हातात भांडे घेऊन घरातून अनवाणी बाहेर पडतात आणि एका पाणवठ्यावर येतात. तेथून भांड्यात पाणी भरल्यानंतर त्या घराकडे जात नाही, तर अलीकडे लागवड केलेल्या आणि पोषणाची गरज असलेल्या रोपट्याकडे जातात आणि त्याला ते पाणी देतात. अनेकदा तर त्या जणू रोपांशी हळूवारपणे बोलतही असतात आणि अनेकदा हसतही असतात. तुलसी गौडा यांनी माळरानावरच नव्हे तर रस्त्याच्या आजूबाजूलाही शेकडो झाडे लावून ती चांगल्या प्रकारे जगवली आहेत. त्यांची तुलना बंगळुरूमधील मगडीजवळ झाडे लावणार्या सालुमरदा थिमाक्का यांच्याशी अनेकदा केली जाते.
स्थानिक काँग्रेस नेते गोपाळ कृष्ण नाईक हे गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या घरी नियमित भेटीला जातात. एवढे मोठे कार्य करुन पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत झालेल्या तुलसी गौडा आजही कुटुंबासह एका छोट्याशा घरात राहतात. अखेरच्या श्वासापर्यंत आपण वृक्षारोपणाची ही मोहीम सोडणार नाही असे त्या सांगतात. वन विभागाच्या नर्सरीमध्ये 35 वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त होऊनही त्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी तिथे जात असतात. वनस्पतींचे प्रचंड ज्ञान असलेल्या अनवाणी पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणूनही तुलसी गौडा यांची ओळख निर्माण झाली आहे.
भविष्यातील काळाची गरज ओळखून तुलसी गौडा यांचे कार्य आपल्या नवीन पिढीसाठी आदर्शवत,व आव्हानात्मक आहे प्रणाम त्यांचे कार्याला