मुंबई : यंदा जोरदार बरसण्याचा अंदाज असलेल्या मान्सूनचा प्रवास फारच मंदावलेला आहे. जून महिना निम्मा सरत आला तरी अजून राज्याच्या निम्म्या भागाला दमदार मान्सूनची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आजवर खरिपात निम्मेच म्हणजे 2.25 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी 15 जूनपर्यंत 4.30 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीखाली होते.
सोयाबीन, कपाशी लागवडीवर शेतकऱ्यांचा भर
खरीप हंगामात सुमारे 150 लाख हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. त्याच बरोबर कमी कालावधीत अधिकच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा पेराही वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. 46 लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन तर कापूस पिकाखाली 42 लाख हेक्टर म्हणजे निम्म्याहून अधिक क्षेत्र या दोन पिकांखाली राहील. याशिवाय, खरीप ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग पेरणीकडे कल जाणवत आहे. त्यादृष्टीने पुरेशी बियाणे आणि खते उपलब्ध असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.
उशिरा पेरणी केली तरी उत्पादनात घट नाही
पुरेसा पाऊस नसल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला असून, खरीप हंगामातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. निम्मा जून महिना मान्सूनविनाच गेल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. मात्र, कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार 15 जुलैपर्यंत पाऊस झाल्यास खरिपातील बहुतांशी पिकांच्या पेरण्या करता येतील. कृषी विभागानेही पावसाच्या अनिश्चितीमुळे नव्याने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. 15 जुलैपर्यंत पेरणी केली तरी उत्पादनात घट होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईत निर्णय घेऊ नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रही अजून कोरडाच
कोकणानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात मान्सूनला सुरूवात होते. यंदा मात्र मान्सूनचा पाऊस या भागात झाला नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. निम्म्या महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग, तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तमिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सून पोहोचेल. शुक्रवार, 17 जूनपर्यंत मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह गुजरातचा आणखी काही भाग, कर्नाटक तामिळनाडूसह विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस असेल. 15-17 जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात तर 19 जून रोजी विदर्भात तुफानी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील सर्वात कमी पाऊस विदर्भात
राज्यातील सर्वात कमी पाऊस आजअखेर विदर्भात नोंदविला गेला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत 14 जूनपर्यंत सरासरीच्या केवळ 32.04 टक्के तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सरासरीच्या 11.09 टक्के पाऊस झाला आहे. उर्वरीत महाराष्ट्राच्या भागात 22 जूननंतरच पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
14 जूनपर्यंत सरासरी 96.09 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात 34.09 मिमी सरासरी पाऊस झाला आहे. तो अपेक्षित सरासरीच्या 36 टक्के इतकाच आहे. गेल्या वर्षी 14 जूनपर्यंत 124 टक्के पाऊस झाला होता. आजवर कोकण विभागात 24.03 टक्के, नाशिक 50.05 टक्के, पुणे 37.08 टक्के, औरंगाबाद 69.04 टक्के, अमरावती 32.04 टक्के व नागपूर विभागात 11.09 टक्के इतका पाऊस झाला आहे. राज्यात पाणीटंचाईच्या झळा कायम असून 591 गावे, 1,312 वाड्यांना 501 टँकरने पुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी 487 टँकर होते. पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर आहे. सर्व प्रकल्पात एकूण उपलब्ध साठा 3,267 इतका म्हणजे 32.16% उरला आहे
Maharashtra farmers waiting for normal mansoon rain delaying kharif sowing. There has already deficit in monsoon showers in Maharashtra so far as per IMD extended range forecast.