भूषण वडनेरे/धुळे
धुळे जिल्ह़यातील शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण ओंकारसिंग राजपूत यांनी दुग्धव्यवसाय व उत्कृष्ट चारा व्यवस्थापनातून आर्थिक उत्कर्ष साधला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेल्या शेतीला हमीच्या उत्पन्नाचा स्रोत तयार करण्यासाठी दूध व्यवसायाकडे वळलेले राजपूत यातून वार्षिक ५ लक्ष रु निव्वळ नफा मिळत आहे. त्याशिवाय या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
तावखेडा ता. शिंदखेडा येथील ५१ वर्षीय प्रगतशील शेतकरी लक्ष्मण् ओंकारसिंग राजपूत हे दोंडाईचा येथे वास्तव्यास असून येथूनच 8 कि.मी अंतरावर यांची तावखेडा येथिल त्यांची दहा एकर शेती कसतात. शिवाय तामथरे ता.शिंदखेडा येथेही वडीलोपार्जीत चार एकर शेती आहे. वडीलांची शेती असल्यामुळे लहानपणपासूनच लक्ष्मण राजपूत यांना शेतीकामाची आवड. त्यामुळे ते शेतीकामात मदत करत. शिक्षण घेवून नोकरी करण्यापेक्षा शेतीतच नवीन काहीतरी करायचे, असे राजपूत यांचे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. त्यामुळे इयत्ता 12 वीपर्यत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण थांबविले आणि पूर्णवेळ शेतीत लक्ष केंद्रीत केले.
सुरुवातीला वडीलांच्या परंपरेनुसार त्यांनी कापूस, केळी, ऊस, पपई असे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यातून फारसा नफा मिळत नव्हता. त्यामूळे शेती परवडत नव्हती. त्यातच लहरी निसर्गामुळे पिकांचे नुकसान होवून तोटाही सहन करावा लागे. त्यामुळे काहीतरी शेतीपुरक उद़योग करावा, त्यातही दूध उत्पादनाकडे वळावे, असा निश्चय त्यांनी केला. कारण परिसरात दुधाला मोठी मागणी होती. शिवाय मागणी कधीही कमी होणारी नाही, याची जाण असल्याने व आपल्याकडे पुरेशी जागा, चारा व पाणी असल्याने त्यांनी म्हैसपालन करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर शेतीपुरक उद़योग सुरु करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेतल्यास व्यवसाय अधिक चांगल्याप्रकारे करता येईल, म्हणून त्यांनी धुऴयातील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले.
एका गायीपासून व्यवसायाचा श्रीगणेशा
लक्ष्मण राजपूत यांनी दोन वर्षापुर्वी म्हणजेच 2019 पासुन दूध उत्पादनाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी एक गाय विकत घेवून या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. धनराज चौधरी यांचे मार्गदर्शन घेऊन सौराष्ट्र (गुजरात) व स्थानिक मार्केटमधुन प्रत्येकी 1 लाख रुपये प्रमाणे 10 लाखांच्या 10 म्हशी घेतल्या. त्यासाठी बँकेचे कर्जही घेतले. मुऱ्हा व जाफराबादी या जातीची जनावरे दुध उत्पादनासाठी चांगली असल्याने या दोन जातींची त्यांनी निवड केली. जनावरे घेण्यापुर्वी त्यांनी दोन महिने आधीच शेतीत चारा व्यवस्थापन केले. कोणत्या प्रकारच्या चाऱ्यातून जनावरांना आवश्यक प्रथिने मिळतील, याची माहिती त्यांना कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. धनराज चौधरी यांनी सविस्तरपणे दिली. शिवाय वेळोवेळी मार्गदर्शनही केले.
त्यानुसार लक्ष्मण राजपूत यांनी महात्मा फुले कृषी विद़यापिठ, राहुरी यांनी संशोधित केलेली सुधारित चारा पिकांची लागवड सुमारे अडीच एकर क्षेत्रात केली. जनावरांसाठी शेतातच गोठा बांधला आहे. त्यासाठी शेतात त्यांनी 100 बाय 80 मीटर जागेत तारकंपाउंड केले. त्यात 50 बाय 40 मिटर जागेत 2 शेड बांधले असून तेथे चाऱ्यासाठी गोडाऊन, जनावरांसाठी गोठा, मजुरांसाठी दोन खोल्या देखील बांधल्या आहेत. या व्यवसायामुळे तीन जणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.
दिवसाची सुरुवात 4 वाजेपासूनच
लक्ष्मण राजपूत यांची दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजेपासून होते तर सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत त्यांची व्यस्त दिनचर्या असते. यात गोठ़याची स्वच्छता, जनावरांची स्वच्छता, नंतर धार काढणे. यानंतर चाऱ्याचे नियोजन, यामध्ये हिरवा चारा व कडबा मिक्स स्वरुपात कुट्टी करुन दिला जातो. खुराक, खनिज मिश्रण याचेही नियोजन केले जाते. जनावरांच्या गरजेनुसार जागेवरच पाण्याचे नियोजन करण्यात येते. हे सर्व मुक्त संचार गोठा पध्दतीने नियोजन केले. तसेच या सर्वांची नोंदही ठेवली जाते. संगोपन करत असतांना जनावरांचे वर्गीकरण करुन म्हणजेच दुधाळ म्हशी, भाकड म्हशी, पारडी, रेडा यानुसार व्यवस्थापन केले जाते. दोन्ही वेळेला दूध काढल्यानंतर जनावरांना मोकळे सोडले जाते. अर्थात ही कामे मजुरांमार्फत केली जातात. लक्ष्मण पाटील हे देखरेख ठेवण्यासह दूध विक्रीची महत्वाची जबाबदारी पार पाडतात. दोन वर्षांपुर्वी घेतलेल्या दहा जनावरांपासून आता 28 जनावरे झाली आहेत. त्यात 3 गायी, मोठ़या म्हशी 12, लहान कालवणी 10, पारडू आदींचा समावेश आहे.
चारा व्यवस्थापन यशाचे गमक
लक्ष्मण राजपूत यांच्या व्यवसायाचे यश हे सर्वस्वी चारा व्यवस्थापनात दडले आहे. त्यांनी चारा लागवड करतांना कृषी विज्ञान केंद्रातील डॉ.धनराज चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिवाय कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम समन्वयक डॉ.दिनेश नांद्रे, डॉ. पंकज पाटील, डॉ.रोहित कडू यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यानुसार राजपूत यांनी कृषी विदयापीठ, राहूरी यांनी संशोधीत केलेले चारा वाण फुले गुणवंत, फुले जयवंत, फुले मारवेल यासोबतच मका आफ्रीकन टॉल असे विविध चारा पिके 2.5 एकर क्षेत्रात लागवड केली. या चारा पिकांमुळे जनावरांना आवश्यक प्रथीने मिळून चांगल्या दर्जाचे दुध मिळू लागले. जनावरांना आलटून पालटून एकदल, दिवदल चारा, वाळलेला चारा, आंबवण (खुराक) यांची ठराविक मात्रा तसेच मार्केटमध्ये मिळणारे खनिजद्रव्य, चाटण व्हीटा असेही जनावरांना आवश्यकतेनुसार दिले जात असल्याचेही लक्ष्मण राजपूत सांगतात.
22 ते 25 किलो चारा हा जनावराच्या उत्पादनानुसार व वजनानुसार दिला जातो. यासोबतच 9 ते 10 किलो कडबा दिला जातो. हिरव्या चाऱ्यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले कृषी विद़यापिठ संशोधित चाऱ्यासह हिरवा मकाही दिला जातो. कडब्यामध्ये प्रामुख्याने ज्वारीचा कडबा दिला जातो. याबरोबर गव्हांडाही दिला जातो. खुराक देत असतांना तो दुध उत्पादनाच्या 40 ते 45 टक्के दिला जातो. म्हणजेच सरासरी एका जनावराला 4 ते 5 किलो खुराक दिला जातो. हे देत असतांना खनिज मिश्रणचाही वापर केला जातो. 80 ते 100 ग्रॅम प्रति जनावर खनिज मिश्रण दिले जाते. चाऱ्याचे व्यवस्थापन करत असतांना कृषी विज्ञान केंद्राची वेळोवेळी मदत व मार्गदर्शन मिळत असल्याचेही श्री.राजपूत यांनी सांगीतले.
सुदृढ पशुधन हेच भांडवल
पशुपालन व दुग्धव्यवसाय करतांना जनावरांची निगा राखणे सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे लक्ष्मण राजपूत हे पशुसंवर्धन व पशुवैद्यक यांच्या माध्यमातून वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करीत असतात. विशेष म्हणजे लसीकरणाच्या नोंदीही ठेवल्या जातात. सुदृढ पशुधन हेच भांडवल असल्याने जनावरांचे आरोग्य हे महत्वपूर्ण आहे त्यामुळे त्याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. यासाठी पशुवैद्यकाशी करार करुन जनावरांची नियमित तपासणी केली जाते व त्या माध्यमातून पुढील नियोजन केले जाते.
वर्षाला 5 लाखांचा निव्वळ नफा
लक्ष्मण् राजपूत यांच्याकडे आजमितीस 12 दुभत्या म्हशी असून त्यांच्यापासून दिवसाला दोन्ही वेळेचे मिळून एकूण सरासरी 80 ते 90 लिटर दूध मिळते. उन्हाळयात दूध उत्पादन काहीअंशी कमी होत. अन्यथा ऐरवी 90 ते 100 लिटर मिळते. डेअरी चालकांना हे दूध विक्री केल्याने कमी नफा मिळत होता. त्यामुळे राजपूत हे स्व:ता दोंडाईचा येथे दूध विक्री करतात. प्रती लिटर 60 रुपये दर मिळत असल्याने चांगल्यापैकी नफा होतो. विशेष म्हणजे जागेवरच बरेचसे दूध विकले जाते. दूध विक्रीतून 70 टक्के भाग हा मजुरांचा पगार, चारा व व्यवस्थापन खर्च वजा जाता 30 टक्के नफा मिळतो. यातून वर्षाकाठी सुमारे 5 लाख रुपये निव्वळ नफा होतो. शिवाय शेतीसाठी खेळते भांडवलही मिळते. दूध विक्रीतून रोजचा पैसा येत असल्याने पैसा खेळता राहत असल्याचे राजपूत सांगतात. त्यांच्या यशस्वी दूध व्यवसायाची यशोगाथेची दखल सह्याद्री वाहिनीने घेत ‘कृषी दर्शन’ या कार्यक्रमात त्यांची मुलाखत दि.12 एप्रील 2021 रोजी प्रसारित केली होती.
भविष्यातील नियोजन
लक्ष्मण राजपूत यांनी सुरुवात दहा म्हशीपासून केली असली तरी आता त्यांना म्हैस पालनाचे व्यवस्थापन चांगलेच अवगत झाले आहे. त्यामुळे त्यांना आता पशुधन 100 पर्यंत वाढवायचे आहे. त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घेवून व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. शिवाय यासोबतच देशी गोपालनासह दूध प्रक्रिया उद़योगातही पाउल टाकायचे असून त्यात प्रामुख्याने पनीर, दही, श्रीखंड असे दुग्धजन्य पदार्थ तयार करुन त्याची स्व:ता मार्केटींग करणार आहे. इतकेच नव्हे तर गोट फ़ार्म, पोल्ट्री फ़ार्म असे शेतीपुरक व्यवसाय गोठयाशेजारील जागेत सुरु करायचे त्यांचे नियोजन आहे. भरपूर जागा उपलब्ध असल्याने पुरक व्यवसायावर भर द्यावयाचा असून यातून आणखी उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याचे राजपूत सांगतात.
लॉकडाऊनमुळे शेतीत नुकसान, तर दुध व्यवसायाने तारले !
अधूनमधून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. याचा फटका उद़योगांसह शेतकऱ्यानाही बसत आहे. लक्ष्मण राजपूत यांनाही लॉकडाऊनमुळे शेतीत प्रचंड नुकसान झाले. गेल्या वर्षी त्यांनी 2.5 एकरवर चारा पिके व उर्वरित क्षेत्रात पपई लागवड केली होती. परंतु, लॉकडाउनमुळे पपईला मार्केट उपलब्ध नव्हते. शिवाय खरेदीसाठी व्यापारीही येत नव्हते. परिणामी, माल सडला. त्यामुळे अक्षरशा: शेतातील तयार मालावर रोटरेटर चालवावा लागला. दोन वर्षात एकुण 10 लाखांचे नुकसान झाले, खर्चही निघाला नाही. मात्र, दुध व्यवसाय लॉकडाऊनमध्येही सुरुच होता. त्यामुळे मोठा आधार मिळाला. शेतीत नुकसान झाले तरी दुध व्यवसायाने तारले असल्याचे राजपूत आवर्जून सांगतात. दरम्यान, लॉकडाऊनपुर्वी शेतीतून 5 ते 6 लाख रूपये निव्वळ नफा होत असे.
प्रतिक्रीया
शेतीपुरक व्यवसायाकडे उद्योग म्हणून बघा!
शेतकऱ्यानी केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुग्धव्यवसाय व्यवसायाभिमुख केला तर नक्कीच आर्थीक उत्पन्न वाढु शकते. तरुणांनी या व्यवसायाकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून न पाहता उद्योग म्हणून पाहिले पाहिजे. त्यासाठी चारा व्यवस्थापनाकडे बारकाईने लक्ष देवून नियोजन केले तर उत्पादन खर्च कमी करुन निव्वळ नफा आपल्याला वाढवता येईल. आजमितीस माझ्याकडे 12 दुभत्या म्हशी असुन दररोज 80-90 लिटर दुध येते. दूध व्यवसायातून निव्वळ 5 लाखांचा नफा मिळत आहे. तर शेतीतून मिळणारे उत्पन्न वेगळे आहे. एकूण 14 एकर शेती असून त्यातील 2.5 एकरवर म्हशींसाठी चारा लागवड व उर्वरित क्षेत्रात कापूस, उस, पपई, केळी अशी पिके घेतो. या पिकातुन खर्च वजा जाता निव्वळ नफा 6 ते 7 लाख मिळतो. मात्र, शेतीतील उत्पन्न हे बाजारभाव व निसर्गावर अवलंबून आहे. ते मिळेलच याची शाश्वती नसते. परंतु, म्हैस पालनातून शाश्वत उत्पन्न मिळत आहे. त्यासाठी मला कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे मर्गदर्शन लाभत आहे.
-प्रगतशील शेतकरी लक्ष्मण राजपूत, तावखेडा ता.शिंदखेडा
मो.नं.9822026830
………………………….
प्रतिक्रिया…
जनांवरांची निवड महत्वाची!
कृषी विज्ञान केंद्रातर्फे आम्ही चाचणी प्रयोगच्या माध्यमातून तसेच प्रशिक्षणाच्या मध्यमतून शेतकऱ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतो. शिवाय तांत्रिक मर्गदर्शन करतो. शेतकऱ्यांनी पशुपालन करतांना स्थानिक भागातीलच जनावरांची निवड केली पहिजे. मुऱ्हा, जफराबादी, नागपुरी, पंढरपुरी या म्हशी दुष्काळातही चांगले दूध देतात. म्हैस घेतांना तिचा बांधा, सडांची रचना, दूध वाहिनी स्पष्ट व झिकझाक वळणाची हवी. जनावर सशक्त असावे. 7 व्या – 8 व्या महिन्यातले गाभण जनावर खरेदीस प्राधान्य द्यावे. जनावरांच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकाच्या संपर्कात राहिले पहिजे. लसीकरणचे नियोजन केले पहिजे. जनावरांना सर्वसमवेशक चारा दिला पहिजे. गोठा, जनावरे व दुधाची भांडी वेळोवेळी स्वच्छ / निर्जन्तुकीकरण केले पाहिजे. या क्षेत्रात नविन येणाऱ्यांनी अगोदर चारा नियोजन केले पहिजे. तरच म्हैस पालनातून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढविता येऊ शकते.
-डॉ.धनराज चौधरी,
विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्ध शाश्त्र, कृषि विज्ञान केंद्र, धुळे.