औरंगाबाद (प्रतिनिधी) ः रब्बी हंगामाच्या तोंडावर बाजारात डीएपी खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, त्याला पर्यायी खते उपलब्ध असल्याने त्यांचा वापर शेतकर्यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
अतिवृष्टीचा खरीपातील उत्पादनाला मोठा फटका बसला. हे दु:ख बाजूला सारुन शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यादृष्टीने पूर्वमशागतीचे कामेही पूर्ण झाली आहेत. रब्बीतील पिकांची जोमात वाढ होण्यासाठी डीएपी खताला मागणी वाढते. मात्र, सद्यःस्थितीत बाजारात डीएपीचा तुटवडा भासू लागला आहे. ज्यावेळी एखाद्या खताला शेतकर्यांकडून अधिक मागणी होते, अशावेळी नेमक्या त्याच खताचा तुटवडा निर्माण होते. डीएपी खताच्या बाबतीतही असेच झाले आहे. कृषी केंद्रांवर गेल्यानंतर शेतकर्यांना हे खत मिळतच नाही. शेतकरी मात्र याच खताचा अट्टाहास धरतात. मात्र, शेतकर्यांना आता चिंता करण्याची गरज नाही. उत्पादन वाढीसाठी अनेक खते बाजारात उपलब्ध झाली आहेत.
पेरण्यांना सुरवात करावी
खरिपातील नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकर्यांची तयारी झाली आहे. यंदा पाऊस सर्वत्र चांगला झालेला असल्याने पिकांच्या दृष्टीने पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे हरभर्याचे उत्पादन वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतात वाफसा झाला असला तरी शेतकर्यांनी डीएपी खतासाठी वेळ खर्च न करता प्रत्यक्ष पेरणीला सुरवात करावी, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेला आहे.
हा आहे डीएपीला पर्याय
डीएपी खतामुळेच पिकाला चांगला उतारा येतो, अशी बहुतांश शेतकर्यांची मानसिकता झाली आहे. या मानसिकतेचा फायदा घेत काही खत विक्रेते त्याची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने विक्री करतात. मात्र, डीएपी खत सहज उपलब्ध नाही झाले तरी 10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पयार्र्य शेतकर्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. त्यामुळे शेतकर्यांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारसीनुसार, नायट्रोजन, फॉस्परस यांच्या मिश्रणाचा वापर करता येत असल्याचे कृषी अधिकार्यांनी सांगितले आहे.
खत खरेदी करताना घ्यावयाची काळजी
कृषी केंद्रावरुन कुठलेही खत खरेदी केल्यानंतर त्याची विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. त्याचबरोबर वॅट नंबर त्या पावतीवर असणे आवश्यक आहे. भविष्यात खतामध्ये काही त्रुटी असल्यास त्याचा क्लेम शेतकरी ग्राहक मंचाकडे किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांकडे करुन नुकसान भरपाईची मागणी करु शकतात. मात्र, त्यासाठी पक्क्या पावतीवर वॅट क्रमांक असणे आवश्यक आहे.
खताच्या गोणीवर हिरवे, पिवळे, लाल असे उलटे त्रिकोण असतात. यामध्ये हिरव्या रंगाचा त्रिकोण हा कमी विषारी असता. पिवळा मध्यम आणि लाल रंगाचा त्रिकोण अधिक विषारी असतो. पिकानुसार, त्याची निवड करावी लागते. या किटकनाशकांचा वापर करताना शेतकर्यांनी सुरक्षित साधनांचा वापर करुन फवारणी करावी.
शेतकर्यांनी शक्यतो संयुक्त खतांचा वापर करावा आणि त्याची मात्रा विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार द्यावी. संयुक्त खत उपलब्ध झाले नाही तर स्वतंत्र खत घेऊन त्याचे मिश्रण करावे आणि फवारणी करावी.
पक्की पावती म्हणजे पक्के खत. त्यामुळे पावतीवरच समजते की खत पक्के आहे की बोगस. शिवाय खताच्या पोत्यावर जे दर आहेत त्याच दरानुसार त्याची खरेदी करावी. यात अनियमितता आढळून आली तर कृषी अधिकार्यांकडे त्याची तक्रार करुन दोषींवर कारवाई केली जाऊ शकते.
Comments 1