मोहाडीच्या संजय गोवर्धनेनी साधली फुलशेतीतून प्रगती
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी परिसर हा तसाही फुलशेतीसाठी प्रसिध्द आहे. काटेकोर व्यवस्थापन, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर येथील फुलोत्पादकांनी प्रगती साधली आहे. संजय रघुनाथ गोवर्धने हे त्यापैकी एक ठळक नांव आहे. फुलशेती आणि सिमला मिरचीचं कॉम्बिनेशन साधीत संजय यांनी एकाच पिकावर अवलंबून राहण्याचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. गारपिटीच्या तडाख्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले होते. त्यातूनही ते सावरले आहेत. वडिलोपार्जित फक्त 20 गुंठे जमीन असणाऱ्या गोवर्धनेंनी एकेकाळी शेतमजुरी करुन कुटुंबाचा चरितार्थ चालविला आहे. केवळ शेतीच्या जोरावर त्यांनी एकूण 7 एकरापर्यंत क्षेत्र वाढविले आहे.
दृष्टीक्षेपात शेती
एकूण क्षेत्र : 7 एकर
पिके : फुलशेती (गुलाब), ढोबळी मिरची, पालेभाज्या (शेपू, कोथिंबिर)
विशेष तंत्रज्ञान : शेडनेट (ढोबळी मिरची-1 एकर), पॉलिहाऊस-72 गुंठे)
बरोबरच भाजीपालाही
आजमितीस संजय गोवर्धने यांच्या शेतीत 72 गुंठे पॉलिहाऊस मध्ये गुलाब आहेत. तर दीड एकर खुल्या स्वरुपातही बोडेॅक्स वाणाच्या गुलाबाचे पिक आहे. शेडनेट मध्ये 1 एकर मिरची आहे. तर 1 एकरावर शेपू, कोथिंबिर या पालेभाज्याही केलेल्या आहेत. 1995 पासून ते गुलाबाची शेती करीत असले तरी मागील चार वर्षांपासून ते सिमला मिरची व पालेभाज्यांचे उत्पादनही घेत आहेत.
एका बिघ्यापासून ते 7 एकरापर्यंतचा जिद्दीचा प्रवास
वर्ष 1990 ते 95 चा काळ. बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेलं असलं तरी नोकरी नव्हती. त्यामुळे संजय नोकरीच्या शोधात होते. याच काळात ते शेतमजुरीही करीत होते. वडिलोपार्जित 20 गुंठे क्षेत्र वाट्याला आले होते. पाणी टंचाई आणि शेती कमी यामुळे मजुरी शिवाय पर्यायही नव्हता. मजुरीचंही काही खरं नसल्याने नंतर मात्र शेतीच करण्याचा निर्णय घेतला. 1997 या वर्षी स्वत:च्या क्षेत्रात बोअरींग केलं. त्याला पाणी लागलं. मग 20 गुंठ्यावर गुलाबाची लागवड करायचं ठरलं. गुलाबाचे उत्पादन सुरु झाल्यानंतर दररोज पहाटे उठून गुलाब नाशिकला 22 किलोमीटरवर नाशिक मार्केटला नेऊ लागले. चांगले उत्पन्न मिळू लागले होते. दरम्यानच्या काळात लग्न झाले. काही स्वत:चे उत्पन्न, काही पाहुण्यारावळ्यांची मदत घेऊन दीड एकर नवीन क्षेत्र खरेदी केले. वर्ष 2005 मध्ये 1 एकरावर टोमॅटोचे पिक घेतले.
विश्वासार्हता असेल तर भांडवलाच्या प्रश्नावर मार्ग निघतो
संजय म्हणाले की, त्या काळात फुलशेतीची चांगलीच गोडी लागली होती. फुलशेतीचा अभ्यास करण्यासाठी सांगली, सातारा या भागात अनेक चांगल्या शेतकऱ्यांचे प्रयोग पाहिले. खुल्या स्वरुपानंतर अधिक उत्पादन व गुणवत्ता देणारी “पॉलिहाऊस’ मधील हायटेक शेती करण्याचे वेध लागले. क्षेत्र कमी असल्याने बॅंक तारणासाठी अडवून पाहत होती. दरम्यान शेतकऱ्यांचा जोर वाढू लागल्यानंतर 2009 मध्ये बॅंकांनी अटी शिथिल करीत फुलोत्पादकांना हायटेक शेतीसाठी कर्ज देण्याची तयारी दाखवली. त्याचा लाभ घेऊन पहिल्या पॉलिहाऊससाठी 18 लाख रुपयांचं कर्ज घेतलं. उत्पादकता आणि गुणवत्ता चांगली मिळाली. परिणामी वर्ष 2009 नंतर पुढील तीनच वर्षात पॉलिहाऊस वरील कर्जाची 80 टक्क्यापर्यंत परतफेड केली. वर्ष 2011 मध्ये उर्वरित क्षेत्रात “पॉलिहाऊस’ उभारले. आता एकूण पॉलिहाऊसखालील क्षेत्र 2 एकर झाले होते. वर्ष 2011 ते 2013 या काळात गुलाबाला चांगले दर मिळाले. त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी साडे तीन एकर क्षेत्राचा व्यवहार केला. यावेळी जमीन घेण्यासाठी इतका पैसा जवळ नव्हता. 18 लाख रुपयांची गरज होती. 20 नातेवाईकांनी 10 लाख रुपये तर 20 मित्रांनी मिळून 7 लाख रुपये दिले. जानोरीच्या देना बॅंकेने 10 लाखाचे कर्ज दिले. मात्र शिस्तीच्या व्यवहारामुळे त्यांनी पुढील दोनच वर्षात नातेवाईक व मित्रांकडून घेतलेले पैसे परत दिले.
प्रतिकूलतेसमोर हार नाही
वर्ष 2013 ते 2016 पर्यंतचा तीन वर्षाचा काळ पुन्हा मोठ्या संघर्षाचा होता. 2013 ला फयाण वादळाने पॉलिहाऊसचे मोठे नुकसान केले. पॉलिथिन पेपर फाटल्याने 8 लाख रुपयांचे नुकसान झाले. 2014 मध्ये दुष्काळात पाणी टंचाईने मोठे हाल केले. 2015 ला वाघाड धरणाचे पाणी आवर्तन कालव्याला आलेच नाही. पाणी न मिळाल्याने त्याचा मोठा फटका फुलशेतीला बसला. वर्ष 2016 मध्ये पॉलिहाऊस मधील संपूर्ण पिक काढून टाकावे लागले. मात्र संजय यांनी परिस्थितीसमोर कधीच हार मानली नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी ते नवनवीन प्रयोग करीतच राहिले.
रेन वॉटर हार्वेस्टींग आणि शेततळे
परिसराला तशी पाणी टंचाई नवीन नाही. यावर मात करण्यासाठी संजय गोवर्धने यांनी शोधलेला फंडाही तितका वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. वर्ष 2008 मध्ये आपल्या 10 गुंठे क्षेत्रावर 100 फुट बाय 120 फूट क्षेत्रावर 3 लाख लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले. मात्र हे शेततळे दोन्ही पॉलिहाऊसेसच्या मधल्या जागेत तयार केले. पॉलिहाऊसच्या छतावरील पावसाचे संपूर्ण पाणी शेततळ्यात येईल अशा पध्दतीने पाईप लावले. दरम्यानच्या काळात परिसरात अनेकदा अवकाळी पाऊस झाले. त्यामुळे इतर शेतकरी चिंतेत असतांना याच पावसाचे पाणी गोवर्धनेंच्या शेततळ्यात पडत असल्याने पाऊस त्यांच्यासाठी इष्टापत्ती ठरला होता. तेच पाणी पॉलिहाऊस मधील व खुल्या स्वरुपातील पिकांसाठी गरजेनुसार वापरले जाते.
गुलाब शेतीचं व्यवस्थापन
* संजय यांच्याकडे प्रत्येकी 36 गुंठे क्षेत्रावरील दोन पॉलिहाऊस आहेत. पॉलिहाऊसमधील पिकांत पाणी नियोजन, खत नियोजन व पिक संरक्षण या बाबी सर्वाधिक महत्वाच्या असतात. दररोज एका पॉलिहाऊसमधील पिकाला ठिबक सिंचनातून फक्त 10 मिनिटे पाणी दिले जाते. याच दरम्यान 3 किलो विद्राव्य खत गरजेनुसार दिले जाते.
गुलाबावर लालकोळी (माईटस) ही किड तर डाऊनी हा रोग प्रामुख्याने येतो. त्यासाठी प्रमाणित कंपन्यांची किडनाशके शिफारसीमध्ये दिलेल्या प्रमाणानुसार वापरतो. रोग येण्याच्या अगोदरच प्रतिबंधक स्वरुपाची फवारणी करण्यावर भर देतो. त्यामुळे कमी खर्चात किड व रोगाचे नियंत्रण होते.
ं अर्थशास्त्र
खुल्या स्वरुपातील फुलशेतीला एका एकराला लागवडीपासून ते काढणी पर्यंतचा एकूण 2 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. तर पॉलिहाऊस मधील फुलशेतीला “पॉलिहाऊस’चा खर्च वगळता एकूण खर्च हा 6 लाख रुपयापर्यंत येतो.
खुल्या स्वरुपातील आणि पॉलिहाऊसमधील फुलांच्या गुणवत्तेत फरक असतो. पॉलिहाऊसमधील फुले ही खुल्या स्वरुपातील फुलांच्या तुलनेत अधिक आकर्षक असतात. म्हणून खुल्या स्वरुपातील फुलांच्या 20 फुलांच्या बंडलला सरासरी 20 रुपये दर मिळतो. तर पॉलिहाऊसमधील 20 फुलांच्या बंडलला सरासरी 80 रुपये दर मिळतो. म्हणजे पॉलिहाऊसमधील फुलांना खुल्या स्वरुपातील फुलांच्या तुलनेत 3 ते 4 पटीने अधिक दर मिळाल्याचे दिसून आले असल्याचे गोवर्धने यांनी सांगितले.
बाजारपेठ व गुणवत्ता
ही फुले मुंबई, दिल्ली व गुजरातच्या बाजारपेठेत पाठविली जातात. त्यासाठी खालीलप्रमाणे गुणवत्ता असावी लागते. गुलाब कळीदार (जास्त उमललेला नसावा), लांब दांडा 2 इंची (80 सेंटीमीटर) असावा. वर्षभरातून संजय यांना खुल्या व पॉलिहाऊस मधील शेतीतून जवळपास सारखेच उत्पादन मिळते. दर दिवशी 100 बंडल उत्पादन असे 300 दिवसांत 30 हजार बंडल उत्पादन मिळते. एका बंडल मध्ये 20 फुले असतात. मात्र पॉलिहाऊसमधील फुलांना तुलनेने चांगली गुणवत्ता, आकर्षकता व टिकवणक्षमता मिळते. त्यामुळे तुलनेने दरही चांगले मिळतात. याप्रमाणे महिन्याला गुलाबाच्या माध्यमातून त्यांची लाखो रुपयाची उलाढाल होते.
फुलशेतीतील कामांचा दिनक्रम
-दररोज सकाळी 8 वाजता फुलतोडणी सुरु होते. सकाळी फक्त 8 ते 11 फुलतोडणी केली जाते. दुपारी 2 ते 5 पॅकींग- संध्याकाळी वाहतूक होते. दिल्लीसाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनपर्यंत माल पोहोचवला जातो. तेथून पुढे रेल्वेने दिल्लीला रवाना केला जातो.
दिल्लीच्या बाजारात विश्वासार्हता कायम
संजय यांचे वर्ष 2011 पासून दिल्ली येथील व्यापारी निश्चित आहेत. संजय गोवर्धने यांच्या गुणवत्तेची ओळख खरेदीदार व्यापाऱ्याला झालेली असल्याने या दोघांतील विश्वासार्हता कायम राहिली आहे. दिल्लीत माल पोहोचल्यानंतर खरेदीदार व्यापारी मालाचे पेमेंट संजय गोवर्धने यांच्या खात्यात जमा करतात. मागील 5 वर्षांपासून हा व्यवहार सुरळीत सुरु आहे.
शेडनेटमधील मिरचीचा आधार
शेडनेटमधील सिमला मिरचीच्या उत्पादनातही संजय यांनी मागील 3 वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. एका एकरातून त्यांनी प्रति 10 किलो वजनाच्या 3000 क्रेटपर्यंतचे उत्पादन घेतले आहे. सिमला पॅलीडीन या वाणाची त्यांनी निवड केली आहे. दर आठवड्यात मिरचीचा 1 खुडा होतो. वाहतुकीसाठी 15 रुपये तर तोडणीसाठी 20 रुपये असा 35 रुपये प्रति क्रेट जागेवर खर्च येतो. या शिवाय उत्पादन खर्च वेगळा. मिरची नाशिक बाजारात विक्रीसाठी नेली जाते. त्यांना प्रति क्रेट सरासरी 200 रुपये दर मिळाला आहे.
* संपर्क :
संजय रघुनाथ गोवर्धने, मो. 9021691910
ता. दिंडोरी, जि. नाशिक