शेतजमिनीवर चार्यासाठी पिके लावता येतील. फक्त गवते लावण्याऐवजी गवत व शिंबी वर्गातील वनस्पतींचे मिश्र पीक घेणे, त्यांच्या पूरक कार्यामुळे जास्त चांगले. मिश्रणाने गुरांना लुसलुशीत, पाचक, सत्त्वयुक्त आहार मिळतो. तसेच केवळ तृणधान्याचे किंवा कडधान्याचे पीक घेण्याऐवजी मिश्र पीक घेतल्याने उत्पादन जास्त मिळते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. वैरण अधिक मिळते.
शिंबी पिके पक्व झाल्यावरही त्यांच्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता तृणांच्या मानाने टिकून राहते. शिंबी पिकात प्रथिने जास्त असतात. त्यामुळे चार्याची गुणवत्ता सुधारते. शिवाय ते मातीत नत्राचा पुरवठा करतात. मातीमधील नत्रे वाढतात, तिचा पोत सुधारतो, मातीची धूप होण्यावर नियंत्रण बसते, हवामानात होणारे तीव्र फेरफार सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते. तृणधान्याबरोबर कडधान्ये लावल्याने चार्याची गुणवत्ता सुधारता येते. मटकी व कुळीथ कमीतकमी पाण्यावर येणारी कडधान्ये आहेत. कुळथाचे पीक खरीप हंगामात घेतात. हे भारी काळ्या जमिनीपासून हलक्या, रेताड व खडकाळ जमिनीत वाढू शकत असले तरी बहुधा हलक्या जमिनीवर पीक घेतले जाते. जिथे इतर तृणधान्ये किंवा कडधान्ये येऊ शकत नाहीत तिथे कुळीथ घेतात. याचे दाणे भरडून, भिजवून किंवा शिजवून दुभत्या आणि कष्ट करणार्या गुरांना खुराक म्हणून चारतात. पाला व भुसकट जनावरांना खायला देतात. दाणे उकडून घोड्यांना खायला देतात. गुरे व मेंढ्यांना पाने हिरवा चारा म्हणून उपयोगी पडते. बाजरी व कुळथाचे मिश्र पीक घेता येते.
मटकीचे पीक पावसाळ्यात घेतात. कांडे व पाने गुरांना खायला देतात. मूग व उडीद खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेता येतात. याची पाने व कांडे गुरांना सकस आहार आहे. वालाची पाने व कांडे तसेच डाळीचा भरडा व कोंडा दुभत्या जनावरांना खायला देात. गुजरात, सातारा व बेळगाव जिल्ह्यांतून गवार चार्यासाठी लावतात. दाणे व हिरवा पाला गुरांना व घोड्यांना देतात. वाटाण्याचे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतात. देशावर व गुजरातेत याची पाने व कांडे गुरांना खायला देतात. मेथीची पाने व देठ गुरांसाठी उत्तम आहार आहे. चवळीचे चार्याचे पीक बाजरी, ज्वारी किंवा मक्याबरोबर खरिपात घेतात. चवळीची हिरवी पाने व कांडे दुभत्या जनावरांसाठी चांगला आहार असतो.
मोहरीचे पीक हिवाळ्यात घेतात. ते लवकर तयार होते आणि गुरांना सकस, हिरवा चारा अल्पकाळात उपलब्ध होतो. याशिवाय धैंचा, लसूणघास, बरसीम आणि स्टायलो या शिंबी कुलातील वनस्पती चार्यासाठी लावल्याने चार्याची तसेच जमिनीची गुणवत्ता सुधारते. शेतजमिनीवर जिथे चार्यासाठी पिके लावण्यास वेगळी जमीन उपलब्ध नसेल तिथेही देान मुख्य नगदी पिकांधील काळात लवकर वाढणारे चार्याचे पीक एकटे किंवा मिश्रणात लावता येते. गहू, ज्वारी फेरपालटीत दोन कालावधी उपलब्ध असतात.
1) एप्रिल ते जून,
2) ऑक्टोबर ते नोव्हेंबर.
पहिल्या कालावधीत ज्वारी+ चवळी, मका+चवळी किंवा बाजरी +चवळी असे मिश्र पीक घेता येते व प्रती हेक्टरी 300 ते 350 क्विंटल चारा मिळतो. दुसर्या कालावधीत चार्याचे टर्निप व लवकर तयार होणारी मोहरी लावून प्रती हेक्टरी 250 ते 300 क्विंटल उत्पन्न मिळते. काही भागात पावसाळ्यातील ओल राखून त्यावर रब्बी पीक घेतात. या ठिकाणी चार्याचे 40 ते 45 दिवसांत वाढणारे पीक घेता येते. चवळी, ज्वारी, गवार, मटकी यांसारखी पिके लावल्यास हेक्टरी 150 ते 200 क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो. चार्याचे पीक काढल्यानंतर हरभरा, आळशी, गहू, करडई इत्यादी मुख्य पीक घेता येते. शहराच्या जवळपास दूधदुभत्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशा ठिकाणी शेतजमिनीवर चार्याची पिके घेणे फायदेशीर असते. गुरांना वर्षभर रुचकर, लुसलुशीत, सत्त्वयुक्त चारा वर्षभर मिळणे जरुरीचे असते. प्रत्येक हेक्टर मधून चार्याचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे असा उद्देश असतो.
माहिती लेखन : वनराई संस्था