देशातील गावांना आत्मनिर्भर करण्यासाठी स्वतंत्रपूर्व काळातच “खेड्याकडे चला” हा मूलमंत्र देणाऱ्या बापूंचे राज्य व देशाच्या अर्थकारणात महत्वपूर्ण भूमिका बजवणारे राज्य म्हणजे गुजरात. राज्याची ओळख ही व्यापाऱ्यांचे राज्य अशीच आहे. त्यामुळेच की काय नोकरी व शेतीमध्ये राज्याची आपल्याला फारशी ओळख नाही, परंतु वर्गीज कुरियन यांच्या नेतृत्वात राज्यात श्वेतक्रांतीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचे व ग्रामीण भागाचे भविष्य उज्वल केले. याच श्वेतक्रांतीने प्रभावित होत बऱ्याच शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे आपला रोख वळविला. शेतकऱ्यांनी आपल्याच वडिलोपार्जित शेतीकडे वा व्यवसायाकडे वळणे यात आपल्याला नवीन वाटणार नाही, किंतु याच राज्यात पंकज प्रविण कंथारिया यासारखे युवक देखील आहेत. ज्यांनी आपली बँकेतील नोकरी सोडून दुग्धव्यवसाय हा आपला प्रमुख उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.
बलेश्वर हे सुरत पासून साधारणतः ३० किंमीवर पलसाणा तालुक्यात असणारे लहान खेडे याच गावात वाणिज्य शाखेतील पदवीधारक ४० वर्षीय पंकज आपल्या पत्नी वैशाली व मुलगा कुश यांच्यासह राहतात. स्वप्ननगरी मुंबईत काही वर्षापूर्वी एका नामांकित बँकेत एक्झीकेटीव्ह म्हणून ते कार्यरत होते. शहरातील निरस व धकाधकीच्या जीवनाचा वीट आल्यानंतर त्यांनी आपले वडिलोपार्जित पितृक गांव बलेश्वर गाठले. पंकजचे आई, वडील व भाऊ उच्चपदस्थ अधिकारी आहेत ते स्वतःच्या मुंबईतील घरात राहतात. त्यांची बलेश्वरला १ एकर जमीन आहे. जमिनीत पाण्याची सुविधा नसल्याने शेती पडीत आहे. मुंबईत जन्म झाल्याने शेती व्यवसाय करणे हा विषय खूप लांब होता, त्यामुळे काही वर्ष पंकजने खाजगी गाडी भाड्याने पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. नवीन काही करता येईल का याचा शोध घेत असतांना त्यांना राज्यात झालेल्या श्वेत क्रांतीने प्रभावित केले आणि दुग्धव्यवसाय करण्याचे निश्चित केले. पंकजचे वडील हे खादीग्रामोद्योग येथे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या परिवारावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे. हाच प्रभाव त्यांना खेड्याकडे जायला प्रभावित करून गेला आणि “खेड्याकडे चला” या मंत्राचे महत्व गुजरातच्या पंकज कंथारिया यांच्या यशस्वी प्रयोगाने पुन्हा अधोरेखित झाले.
असा सुरु झाला व्यवसाय
अतिशय उत्साही असणाऱ्या पंकजने स्वतः भांडवल उभे करत आपल्या व पत्नीच्या नावे एका बँकेकडून व्यवसायासाठी ६.५ लाख रुपयाचे कर्ज घेतले. काही दिवस विविध ठिकाणी भेटी देऊन या व्यवसायातील बारकावे जाणून घेतले आणि २०१५ साली त्यांनी सुरुवातील स्थानिक दलालामार्फत होस्टीयन फ्रिजीयन जातीच्या ५ गायी सरासरी ६० हजार रु प्रमाणे विकत घेतल्या. काही दिवसानंतर पुन्हा ४ गायी घेऊन आपल्या व्यवसायाला ९ गायीपासून सुरुवात केली.
गायीच्या निवाऱ्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च न करता त्यांनी आपल्या गावातील घराच्या मागेच गायीची व्यवस्था केली. त्यामुळे गोठ्यावरील अतिरिक्त खर्च वाचला.
दिनक्रम
पंकज याचा दिनक्रम हा अतिशय चाकोरीबद्ध असतो. सकाळी ४ वाजता त्यांचा दिनक्रम सुरु होतो. पती-पत्नी सकाळीच गायांची व गोठ्याची स्वच्छता करतात. गाय व गोठा पाण्याने स्वच्छ केला जातो. नंतर सर्व गायीचे पंकज व वैशाली स्वतः हाताने दुध काढतात. आजवर फक्त डेअरीवरून दुधाची पिशवी आणणाऱ्या पंकजला दुध कसे काढतात हे सुद्धा माहित नव्हते तोच पंकज अनुभवातून आज सर्व गायींचे दुध स्वत: काढतो. मिल्किंग मशीन असून सुद्धा ते हाताने दुध काढतात, कारण सतत गाईंच्या संपर्कात राहिल्यास त्यांच्याशी एक वेगळे भावनिक नाते तयार होते व परिणामी त्याचा दुग्ध उत्पादनावर परिणाम होतो असा त्यांचा अनुभव आहे. फक्त खूप घाईच्या वेळी मशीन वापरले जाते.
दुध काढल्यानंतर गायींना खुराक दिला जातो. नंतर सकाळी ८ वाजता सुरत येथील सुमुल डेअरीमध्ये दुधाच्या फँटनुसार दुध पुरविले जाते. पुन्हा दुपारी घरी येतांना चाऱ्याचे नियोजन केले जाते. सायंकाळी ४ वाजता पुन्हा हाच दिनक्रम सुरु होतो प्रत्येक कामात पत्नी वैशालीची साथ असल्यामुळे पंकजला कोणत्याही अतिरिक्त मजुराची गरज भासली नाही. त्यामुळे नफ्यात वाढ असल्याचे ते सांगतात.
पशुसंवर्धन व दुधाचे अर्थशास्त्र
पंकजने ९ गायीपासून सुरु केलेला व्यवसाय आज २८ गायी व कालवडी पर्यत पोहचला आहे. त्यांनी नंतर कोणतीही गाय विकत घेतली नाही. अतिशय गुणवत्तापूर्ण गायीची स्वतःच्या गोठ्यावरच निर्मिती केली. प्रत्येक गाय सरासरी १६ लिटर पेक्षा जास्त दुध दोन वेळेचे देते. दररोज १०० लिटर दुध मिळाले पाहिजे याप्रमाणे ते गायीच्या वेताचे नियोजन करतात. भाकड व नुकत्याच व्यालेल्या अश्या गायीपासून ते १०० ली पेक्षा जास्त दुध डेअरीला सरासरी ३० रु भावाने देतात.
सुरुवातीला पशुपालनाचा फारसा अनुभव नव्हता त्यामुळे प्रत्येक वेळी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा लागत होता आता मात्र ते स्वतः गायींच्या आजाराबाबत सजग झाले आहे. त्याचप्रमाणे डेअरीचा पशुवैद्यक प्रत्येक आठवड्याला गोठ्यावर तपासणीसाठी अल्प खर्चात हजर असतो. अनुभवातून शिकल्यामुळे त्यांना आता भविष्यात होणारी हानी कशी टाळावी याचे चांगले गमक गवसले आहे. प्रत्येक दुध देणाऱ्या गायीला प्रती लिटर ५०० ग्राॅम प्रमाणे डेअरीने पुरविलेला खुराक दिला जातो. त्याचप्रमाणे गायींच्या स्वच्छता व आरोग्यावर विशेष लक्ष दिले जाते. कारण त्याच्या मते आज घेतलेली काळजी हि भविष्यात येणाऱ्या खर्चाना आळा घालते आणि साहजिकच यामुळे तुमच्या नफ्यात वाढ होते हे साधे सोपे गुजराती माणसाच्या यशाचे गमक ते सांगून गेले.
सर्व चारा व खुराक विकतच..
दोन वेळच्या चाऱ्याचे अतिशय काटेकोरपणे व्यवस्थापन केले जाते. कारण पकंज हे असे पशुपालक आहे ज्याच्याकडे स्वतःचे एक पाती सुद्धा गवत/ चारा नाही. संपूर्ण चारा ते दररोज स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातून विकत घेत असतात. त्यांच्या गावातील बरेच शेतकरी हे पशुपालकांना चारा पुरविण्याचे काम करतात त्यामुळे त्यांच्या पंचक्रोशीत ऊस, मका व गवत (चारा) याचीच लागवड केली जाते.
आज रोजी पंकजकडे असलेल्या २ गायींना महिनाभर ३० हजार रुपयाचा चारा व २८ हजार रुपयाची खुराक लागतो. त्यामुळे दररोज किंवा ४ -५ दिवसांतच चारा विकत घ्यावा लागत असल्याने चाऱ्यासाठी जास्त रक्कम खर्च करण्याची गरज भासत नाही. स्थानिक शेतकऱ्यांकडून चारा मिळत असल्याने त्याची साठवणूकही करावी लागत नाही.
महिना ४५ हजार निव्वळ नफा
दररोज साधारणतः १०० लिटर पेक्षा जास्त दुध हे सरासरी ३०-३३ रु दराने डेअरीला पोहचविले जाते त्यातून त्यांना दररोजचे सरासरी ३००० रु मिळतात असे महिन्याचे ९० हजारापेक्षा जास्त मिळकत होते. त्याचबरोबर आपल्याकडे महिनोमहिने शेणखत हे आपण खड्ड्यात साठवून ठेवतो. पण पंकज एका स्थानिक व्यापाऱ्याला प्रत्येक महिन्याला १ हजार रु टेंपो या दराने ५ हजार रुपयाचे शेण आहे त्या स्थितीत विक्री होते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला त्याचे सुद्धा अधिकचे उत्पन्न आहे असे दुध व शेणाचे मिळून जवळपास १ लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न पंकज यांना मिळते. या एक लाखातून ५८ हजार रु खाद्य व संगोपनावर खर्च सोडला तर त्यांना फक्त या व्यवसायातून घरची शेती नसतांनाही महिना ४५ हजार रु पगार मिळतो, हो पगाराच कारण पंकज यांच्या मते त्यांनी सुरु केलेले गोपालन ते एक नोकरी सारखे काटेकोरपणे वेळेत करतात म्हणून त्यांना गायीपासून हा पगार मिळतो. (यशस्वी व्यवसायाचे दुसरे गमक).
और कूछ नया करते है !
संपूर्ण दिवसाचे व्यस्त नियोजन आहे तरीही त्यांना सकाळी डेअरीला दुध दिल्यानंतर व संध्याकाळी दुध देण्याच्या वेळेपर्यंत असणारा रिकामा वेळ खटकतो म्हणून त्यांनी आता मधल्या वेळेत काय करता येईल यासाठी मागील ४ वर्षापासून काजू प्रक्रिया युनिटची जुळवाजुळव सुरु केली असून ती आता अंतिम टप्प्यात आहे. दुध डेअरी प्रत्येक महिन्याला एका लिटर दुधामागे ४ रु बचत म्हणून स्वतःकडे ठेवते व वर्षाखेर त्यांना हि बचत परत करते. हि बचत व दुध व्यवसायातील आलेला नफा त्यांनी काजू प्रक्रिया उद्योगामध्ये अडकवला आहे. म्हणजेच त्यांनी पैशाला पैसा कमवायला लावले (यशाचे तिसरे गमक) येत्या दिवाळीत त्यांचे काजू प्रक्रिया युनिट सुरु होणार आहे. यातही त्यांनी आपली दूरदृष्टी वापरली आहे. सुरुवातीलाच यासाठी नवीन मशीन विकत न घेता त्यांनी जुन्या बंद युनिटच्या मशीन घेऊन त्यांची दुरुस्ती केली आहे. आता नव्याने सुरु होणाऱ्या या काजू युनिट साठी देखील पंकज यांनी कोणताही अतिरिक्त मजूर लावला नाही ते आपल्या पत्नी वैशाली यांना या कामात निष्णात करत आहे, कारण त्यांच्या मते तुम्ही गरज नसेल तेव्हा फक्त तुमच्या स्टेटस् साठी मजूर ठेवणे म्हणजे स्व:ताचा नफा कमी करणे आहे.( यशाचे चौथे गमक)
काजू व्यवसायात संधी शोधणाऱ्या पंकज यांना दर महिन्याला विकले जाणारे शेणखत हे जास्त नफा देत नाही असे वाटते त्यामुळे भविष्यात त्यांनी गांडूळखत निर्मीती प्रकल्प उभारण्याचा मनोदय बोलून दाखविला. एकूणच काय सतत नवनवीन संधी शोधणारे पंकज म्हणतात “और कूछ नया करते है !”
सुरत ते दुबई
पंकज यांचा मुलगा कुश हा स्थानिक शाळेत परंतु गावाजवळ असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माध्यमिक शिक्षण घेत आहे. शहरामधून गावात आले म्हणून शिक्षण खराब होते हा समज त्यांनी खोडून काढला. त्यांचा मुलगा कुश शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा स्पर्धेत (हॉकी) देखील नैपुण्य दाखवीत आहे. एका राष्ट्रीय स्पर्धेत तो राज्याचे नेतृत्व करत सिंगापूर येथे आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखऊन आला आहे. त्याचबरोबर देशातील विविध राज्यात तो राष्ट्रीय सामने खेळला आहे.
प्रतिक्रिया
कोणताही व्यवसाय हा नोकरी प्रमाणे काटेकोरपणे वेळ देऊन केला आणि सुरुवातिला जर त्याचा योग्य अभ्यास केला तर नक्कीच गावातही शहारापेक्षा जास्त चांगले उज्वल भविष्य आहे. गरज नसेल तेव्हा फक्त स्वतःच्या स्टेटस् साठी मजूर ठेवणे म्हणजे स्व:ताचा नफा कमी करणे आहे, त्यामुळे शक्य असेल ते प्रत्येक काम स्वतः करण्याकडे लक्ष देणे हे खऱ्या अर्थाने तुम्हाला नफ्यात वाढ करून देते. आमच्या राज्यात एक धारणा आहे की, आम्ही गायीला पोसत नाही तर गायच आम्हाला पोसते. हेच कारण आहे कि आम्ही स्वतःच्या परिवारातील सदस्याप्रमाणे गायची काळजी घेतो व त्या आमची आर्थिक गरज भागवतात. नक्कीच गावाकडून शहराच्या दिशेने जाणाऱ्या तरुणांनी आपल्या स्थानिक भागातच शेतीपूरक व्यवसायाकडे लक्ष दिले तर नक्कीच देश व गाव आत्मनिर्भर होतील.
पंकज प्रवीण कंथारिया
बलेश्वर तहसील- पलसाणा
गुजरात