मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी ग्राहक हा दर्जा देऊन शेतीसाठी वीज पुरवठा लवकरच स्वतंत्र केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच एमएईडीसीएल या नव्या कंपनीची स्थापना केली जाणार आहे. नव्या कंपनीमुळे महावितरणवरील कृषि वीज पुरवठ्याचा भार हलका होऊ शकेल. विजेसाठी शेतकऱ्यांची होणारी परवडही त्यामुळे थांबू शकेल. देशात प्रथमच शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणाऱ्या स्वतंत्र कंपनीचा महाप्रीत प्रयोग महाराष्ट्रात होत आहे.
महाप्रीतने सादर केला कृषी वीज वितरण कंपनीचा प्रस्ताव
महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविध तंत्रज्ञान कंपनी म्हणजेच महाप्रीत हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत महाप्रीत कार्यरत आहे. समाजातील मागासवर्गीय घटकांच्या विकास व प्रगतीसाठी ही निमसरकारी कंपनी कार्यरत आहे. ऊर्जा क्षेत्रात विशेषत: नवनवीन ऊर्जा संसाधनांचा प्रसार आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील ही कंपनी आता इतर विविध क्षेत्रांत आपल्या विस्तार करत आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांना स्वस्तात वीज पुरवठा
सध्या महवितरण कंपनी प्रति युनिटने 7 रुपये दराने वीज खरेदी करते. शेतकऱ्यांना मात्र 1 रुपया प्रति युनिट दराने स्वस्तात वीज पुरविली जाते. अनेक कृषि ग्राहक हे एक रुपया प्रती युनिट दराचे स्वस्तातील बिलही भरत नाहीत. त्यातच विविध कारणांनी वीज कंपनीला सक्तीची वसुली करता येत नाही. अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीवरील आर्थिक भार आता महात्मा फुले नूतनीय ऊर्जा व पायाभूत सुविध तंत्रज्ञान कंपनी उचलू पाहत आहे. कंपनीने त्याचे तांत्रिक नियोजन व प्रकल्प अहवाल पूर्ण केला आहे. राज्य शासनाकडे लवकरच त्याचा प्रस्ताव सादर केला जाईल. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष असलेले बिपीन श्रीमाळी यांनी याबाबत माहिती दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित सौर ऊर्जा पुरवठा
महाप्रितकडे मोठ्या प्रमाणावर निधी आहे. त्यामुळे कृषि ग्राहकांना, महाप्रितकडून शेतीसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करून अखंडित सौर ऊर्जा पुरवठा होऊ शकेल. वीज वितरण कंपनीकडून सध्या 15 हजार मेगावॉट वीज ही शेती क्षेत्रात पुरविली जाते. राज्यातील विजेची एकूण मागणी ही सुमारे 30 हजार मेगावॉट आहे. त्यातील तब्बल निम्मी वीज शेतीसाठी पुरविली जाते.
शेतकऱ्यांसाठीची वीज होणार आता तिप्पट महाग
सध्या वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना एक रुपया प्रती युनिट दराने वीज पुरवठा करत आहे. मात्र, नवी कंपनी तब्बल तीन रुपये प्रतियुनिट दराने वीज पुरवठा करेल. त्यामुळे आगामी काळात राज्यातील शेतीसाठीची वीज ही तिप्पट महाग होणार आहे. याशिवाय, थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तात्काळ कापले जाईल. खासगी कंपनी वीजपुरवठा करणार असल्याने थकबाकी माफी किंवा अभय योजना वैगेरे कोणतेही लाभ भविष्यात उपलब्ध होऊ शकणार नाहीत, अशी शक्यता आहे.
महाप्रीत करणार 15 हजार मेगावॉट वीज उत्पादन
शेतीसाठी राज्यात सध्या असलेली 15 हजार मेगावॉट वीज गरज लक्षात घेऊन महाप्रित कंपनीकडून प्रत्येकी 5 हजार मेगावॉट क्षमतेचे तीन सौर ऊर्जा प्रकल्प तीन टप्प्यांत उभारले जातील. यातून आगामी काळात कृषी ग्राहकांना सरासरी 3 रुपये प्रति युनिट दराने, 15 हजार मेगावॉट वीज पुरवली जाईल. महाप्रित अध्यक्ष श्रीमाळी हे एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुंतवणूक परिषदेसाठी नुकतेच मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीच्या आगामी प्रकल्पांची माहिती दिली.
राज्य वीज कंपनीवरील 60 टक्के भार कमी
महाराष्ट्र राज्य सरकारी महावितरण कंपनी ही सध्याच्या घडीला राज्यातील सर्वांत मोठी वीज वितरण कंपनी आहे. मात्र, कंपनीची सुमारे 60 हजार कोटींची थकबाकी वसुली आहे. या कंपनीचे राज्यात सुमारे तीन कोटी ग्राहक आहेत. यातील शेतकरी ग्राहकांची संख्या दीड कोटींच्या आसपास असावी. 60 हजार कोटी थकबाकीतील तब्बल 40 हजार कोटी रुपयांची थकबाकी ही कृषि क्षेत्रातील ग्राहकांची आहे. सध्या वीज वितरण कंपनीला हा आर्थिक भार सोसण्याची ताकद नाही. मात्र, नवी महाप्रित कंपनी या थकबाकीचा भार सामावून घेण्यास सक्षम आहे. तसे झाल्यास राज्य वितरण कंपनीवरील 60 टक्के इतका आर्थिक भार कमी होऊ शकेल.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्र व शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले महत्वाचे निर्णय..
यंदा मुबलक अन्नधान्य उत्पादन; 5 वर्षांतील उच्चांक! जाणून घ्या ऊस, कापूस, कडधान्य, तेलबियांचा अंदाज…
Comments 3