बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. संकरित कापसासाठी प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश, तर सुधारित वाणांसाठी ८० किलो गाड्या शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर द्यावे किंवा खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे. वीस टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उरलेले नत्र समान दोन हप्त्यांत पेरणीनंतर ३० व ६० दिवसांनी द्यावे. बीटी वाणासाठी शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के रासायनिक खतमात्रा (१२५:६५:६५ किलो प्रति हे.) जास्त घ्याव्यात.
द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते. नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख घटकांव्यतिरिक्त कापूस पिकास मॅग्नेशियम, गंधक, लोह, जस्त, मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुध्दा गरज असते. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमध्ये उपलब्ध असतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे बोंडाची पूर्णपणे वाढ होऊन बोंडे लवकर फुटतात. द्रवरुप खते संचाद्वारे देण्यासाठी व्हेंचुरी किंवा खत टाकी इंजेक्टर पंप या साधनांचा वापर करावा.
आंतरमशागत
नांग्या भरणे
सर्वसाधारणपणे १० दिवसांत सर्व बिया उगवतात, ज्या ठिकाणी बी उगवले नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, त्याच सुधारित अगर संकर वाणाचे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे, किंवा वर उल्लेख केल्याप्रमाणे पॉलिथिन पिशव्यांतील रोपे २० ते २५ दिवसांच्या आतच लावावीत.
विरळणी
पंधरा दिवसांनंतर प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेऊन बाकीची उपटून टाकावीत. विरळणी जमीन ओली असताना करावी.
खुरपणी
पेरणीनंतर जरुरीप्रमाणे दोन खुरपण्या व कोळपणी करुन ६० दिवसांपर्यंत पीक तणविरहीत ठेवावे. यासाठी जेथे शक्य असेल तेथे जरुरीप्रमाणे रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. त्यासाठी खालीलप्रमाणे एक रासायनिक तणनाशक वापरावे व आवश्यकतेप्रमाणे पिकाच्या खुरपण्या कराव्यात. तणनाशकामुळे खुरपणीच्या खर्चात बचत होते.
अ.क्र | तणनाशकाचे नाव | क्रियाशील घटकाचे हेक्टरी प्रमाण | हेक्टरी पाण्याचे प्रमाण | फवारणीची वेळ |
१ | पेन्डीमिथॅलिन | १.५ लिटर | ५०० लिटर | उगवणीपूर्वी एक फवारा |
२ | क्युझॉलोफॉपइथिल | १.५ लिटर | ५०० लिटर | पेरणीनंतर १०-३५ दिवसापर्यंत |
शेंडे व पाने खुडणे
भारी जमिनीत विशेषत: रासायनिक खते व पाणी जास्त दिले तर बागायती क्षेत्रातील संकरित वाणांची कायिक वाढ जास्त होते. त्यामुळे बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते व बोंडाच्या वजनामुळे फांद्या मोडण्याचा संभव असतो. यासाठी पीक ७० ते ८० दिवसांचे झाल्यावर झाडाच्या मुख्य फांदीचा शेंडा खुडावा, यामुळे पिकात हवा खेळती राहते. बोंडे सडत नाहीत व कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
संजीवकाचा वापर
कपाशीला लागणारे पात्या, फुले, बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते. नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलिन अॅसेटिक अॅसीड (प्लॅनोफिक्स) या संजीवकाची हेक्टरी १०० मि.ली व ५०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी त्यानंतर १५ ते २० दिवसांनी करावी. यामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.
सौजन्य – कृषी विभाग
Prempawar7932gmail.com