नाशिक : अगोदरच वेगवेगळ्या कारणांनी अडचणीत असलेले कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत, ते कांद्यांच्या भावात झालेल्या घसरणीमुळे. लासलगावच्या बाजारपेठेत कांद्याचे दर हे आठवड्याभरातच ९०० रुपयांनी घसरले आहेत. अजून एक ते दीड महिना कांद्यांच्या दरांबाबत अशीच परिस्थिती असेल, असा कृषी क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.
कांदा उत्पादकांचे नुकसान
महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळीमुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला. अवकाळीमुळे हे पीक पूर्ण क्षतीग्रस्त झाले होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जो कांदा बाजारात दाखल होत आहे, त्याचा दर्जा अवकाळीमुळे खालावलेला आहे. परिणामी, मार्केटमध्ये येत असलेला कांदा निकृष्ट दर्जाचा असल्याने त्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत खरीप हंगामातील लाल कांदा हा पूर्णतः चांगला दर्जाचा होता. मात्र, ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने राज्यात हजेरी लावली आणि कांद्याला त्याचा फटका बसला. काढणीला आलेला कांदा पावसामुळे अक्षरक्षः मातीमोल झालेला दिसून येत आहे. आता लाल कांद्यांची काढणी सुरू असली तरी बाजारात हा कांदा येत असलेला तो पावसामुळे पूर्णतः भिजलेला येत आहे. परिणामी, त्याला कमीचा दर मिळत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, बाजारात येणार्या कांद्यापैकी ७५ टक्के कांदा हा अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला कांदा येत आहे.
आवक वाढली, पण भाव नाही
बाजारात सध्या येणारा कांदा पावसात भिजलेला असल्याने त्याचा दर्जा घटला आहे. त्यामुळे परराज्यातून या लाल कांद्याला मागणी कमी झाली आहे. हा कांदा परराज्यात पाठवल्यानंतर तो अगोदरच भिजलेला असल्याने तो पोहचेपर्यंत आणखीन खराब होण्याची शक्यता लक्षात घेता, स्थानिक कांदा व्यापारी देखील हा लाल कांदा परराज्यात पाठवत नाहीत. हा कांदा जास्त काळ साठवता येत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या मिळेल त्या भावात कांद्याची विक्री करताना दिसत आहेत. साधारणपणे जानेवारीपासून चांगल्या लाल कांद्याची आवक होईल, तेव्हा कांद्याला चांगला भाव मिळेल असा काही व्यापार्यांचा अंदाज आहे. दरम्यान, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कांदा बाजारात कांद्याची प्रचंड आवक वाढली आहे. मात्र, अपेक्षित भाव नसल्याने शेतकर्यांना हा कांदा कमी दराने नाइलाजास्त विकावा लागत आहे. लासलगावच्या बाजारपेठेत कांद्याचे दर हे आठवड्याभरातच ९०० रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासमवेतच राज्यातील इतर विविध भागातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.