करडईची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात येत आहे. यामुळे उत्पादन वाढीबरोबरच करडईला मिळत असलेल्या विक्रमी दरामुळे हमखास उत्पन्नाची हमी मिळू शकते. कमी पाणी, कमी खर्च, अवर्षणाचा ताण सहन करूनही जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाचा विचार केल्यास करडईचे पीक फायदेशीर ठरते.
करडईचा पेरा घटत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम तेलाच्या विक्रमी भाव वाढीवर झाला. सोबतच करडई बियांना सुध्दा मोठी मागणी वाढल्याने करडईच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. खाण्यात करडईचे तेल चांगले असते. करडई तेलाच्या सुगंधावरुनच त्याची पारख होते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नवीन करडई तेलाची आवक सुरु होते.
ॲग्रोवर्ल्ड वाचकांसाठी खास मोबाईल अपग्रेड ऑफर!
करडई लागवड
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून मिळवा हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळू शकते. करडईचा वापर तेल काढण्यासाठी आणि कोवळ्या पानांचा वापर हा पालेभाजी म्हणून करतात. करडईचे तेल आरोग्यदायी असते. त्याचे क्षेत्रही मर्यादित असते आणि मागणी जास्त असल्यामुळे भाव कमी होणार नाहीत. त्यात वाढच होईल किंवा दर स्थिर राहतील. ज्वारी पिकापेक्षा करडई पिकासाठी कमी मजूर लागतात. आपण आज सुधारित लागवड तंत्रज्ञान, संरक्षित पाणी, पीक संरक्षण, काढणी, उत्पादन किती मिळते..? हे जाणून घेऊ या…
सुधारित लागवड तंत्रज्ञान
जमीन
करडईच्या पिकास मध्यम ते भारी खोल जमीन निवडावी. ६० सें.मी.पेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड़याफार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.
पूर्वमशागत
करडई पिकाची मुळे खोल जात असल्यामुळे खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात ६ x ६ मीटर अथवा १o x १o मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी ६.२५ टन (१२ ते १३ गाड्या) मिसळून पाळी द्यावी.
पेरणीचा कालावधी
करडईची पेरणी योग्यवेळी करणे फार महत्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबरचा पहिला पंधरावडा) केल्यास पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते. याउलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसरा पंधरावडा) पीक थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. त्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत करण्याची शिफारस करण्यात येत आहे. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी.
बियाणे व बीजप्रक्रिया
पेरणीसाठी करडईचे १o किलो बी प्रती हेक्टरी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रॅम बाविस्टीन प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर या जीवाणूसंवर्धकाची २५ गॅम/किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. अॅझोटोबॅक्टर/ अॅझोस्पिरिलम हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बियाण्याला लावल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे पी.एस.बी. या स्फुरद विरघळवणा-या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
पेरणीचे अंतर
करडई पिकाचे दोन ओळीमधील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपामधील अंतर २0 सें.मी. ठेवावे.
खतांच्या मात्रा
करडई हे पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. या पिकाच्या अधिक उत्पादनासाठी कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. काही प्रमाणात पाण्याची सोय असलेल्या पिकास ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) व ३७.५० किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी द्यावे.
विरळणी व आंतरमशागत
करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढत असल्यामुळे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपातील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. गरजेनुसार खुरपणी व कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीपासून तिस-या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दातेरी सायकल कोळप्याने कोळपणी करावी.
संरक्षित पाणी
करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडईच्या पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३५ ते ४o दिवसांनी किंवा जमिनीस फुलो-यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. करडईची फुले उमलण्यास सुरवात होताच ‘सायकॉसिल’ या वाढ प्रतिरोधकाच्या १ooo पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाची प्रती हेक्टरी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
पीक संरक्षण
करडई पिकाचे माव्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अवर्षणप्रवण विभागात करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुस-या पंधरावड्यात केल्यास या किडीची तीव्रता बरीच कमी होते. मावा किडीच्या नियंत्रणासाठी ३० टक्के डायमिथोएट (१५ मि.लेि. १o लीटर पाण्यात) या कीटकनाशकाची फवारणी करावी किंवा थायोमेथंक्झाम/ अॅसिटामिप्रीड ३ ते ४ ग्रॅम/ १o लीटर पाणी किंवा अॅसिफेट १६ ग्रॅम /१o लीटर पाणी किंवा क्लोथायनिडीन १ ग्रॅम/१० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या पिकावर पानावरील ठिपके (अल्टरनेरिया) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा काबॅन्डॅझिम + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० गॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता कमी झाली नाही तर १० ते १५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी तसेच पिकाची फेरपालट करावी म्हणजे रोगाचे नियंत्रण होते.
काढणी
करडई पीक १३० ते १३५ दिवसात काढणीस तयार होते. या पिकाची बोंडे व पाने पिवळी पडल्यानंतर काढणी करावी. कापणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी आद्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे काटे टोचत नाहीत. करडई चांगली वाळल्यानंतर बडवणी करावी. एकात्मिक काढणी व मळणी यंत्र पिकाच्या काढणीसाठी उपयुक्त आहे. या यंत्राने कमी वेळेत व कमी खर्चात करडईची काढणी करता येते. या मशीनमधून स्वच्छ धान्य बाहेर येते आणि कोणतीही प्रक्रिया न करता माल विक्रीसाठी नेता येतो. करडई पिकास काटे असल्यामुळे मजूर काढणीसाठी तयार होत नाहीत. त्यासाठी एकत्रित काढणी व मळणीयंत्र हे एक वरदान आहे.
उत्पादन
सुधारित तंत्राचा वापर केला असता मध्यम जमिनीत करडई पिकापासून प्रती हेक्टरी १२ ते १४ क्विंटल तर भारी जमिनीत हेक्टरी १४ ते १६ क्विंटल उत्पादन सहज मिळते. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
अशी करा इलायची शेती ज्यातून होईल A-1 बंपर कमाई!
अमेरिकी क्विनोआसारखेच सुपरफूड; पारंपरिक इथिओपियन टेफ आता इस्त्रायली संशोधक नेणार जगभर
हर्बल फार्मिंग : कलियुगातील ‘संजीवनी’ असलेल्या ‘नोनी’ फळाच्या व्यावसायिक शेतीतून कमवा बंपर पैसे, प्रक्रियेतून मिळेल दुप्पट नफा
आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती
आमच्या जवळ मागच्या वर्ष ची 150 किव्टल शिल्लक आहे अजुनही विकली गेली नाही.कोणी व्यापारी घेत नाही
08068441128