जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरीता जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवणे गरजेचे आहे.शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे म्हणजे शेतीची कामे होत. पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, जमिनीत पीक पेरणे, पिकांत आंतर मशागत करून वाढीला पोषक वातावरण निर्माण करणे इ. कामे योग्य प्रकारे केली तर पीक जोमदार येऊन उत्पादनही चांगले येते.
यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व शेतकामांना ‘पूर्वमशागत’ म्हणतात. त्यांत जमीन नांगरणे, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, सऱ्या किंवा वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट काढणे इ. कामे येतात. जमीन उघडी करून मातीचे थर खालीवर करणे हा नांगरणीचा उद्देश आहे. असे केल्यामुळे जमिनीतील आधीच्या पिकाची धसकटे, इतर अवशेष, पालापाचोळा वगैरे जमिनीत गाडले जाऊन ते कुजतात आणि मातीतील सेंद्रिय पदार्थांत वाढ होते. त्याचबरोबर जमिनीत असलेले हानिकारक जीवजंतू, कीटक इत्यादींचा उन्हाने तापल्यामुळे नाश होतो. जमिनीवरील आधीचे पीक, नंतर घ्यावयाचे पीक, तणांचा प्रकार व प्रमाण, स्थानिक हवामान आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर जमीन नांगरणे आवश्यक आहे किंवा नाही हे मुख्यत्वे अवलंबून असते.
आधी ऊसासारखे बहुवर्षायू बागायती पीक असल्यास नांगरट आवश्यक असते. त्यामुळे ऊसाची धसकटे, खोडक्या वगैरे निघून जमीन स्वच्छ होते. त्याबरोबरच पिकाच्या कालावधीत दिलेल्या पाण्यामुळे घट्ट झालेली जमीन मऊ करता येते. बटाटा, कपाशी, भुईमूग, बाजरी, ज्वारी व कडधान्ये यांसारखी पिके काढल्यावर पुढच्या पिकासाठी नांगरट न करतासुद्धा जमीन तयार करतात. ज्वारीसारखे पीक घ्यायचे असेल, तर नांगरटीची जरूरी नसते परंतु भुईमुगासारख्या काही पिकांना जमीन भुसभुशीत लागते, त्यासाठी नांगरट करणे आवश्यक असते. दीर्घ मुदतीच्या काही पिकांसाठी खोल नांगरट करावी लागते. काही पिकांना मात्र खोल नांगरटीची गरज नसते. जमिनीत पोसणाऱ्या कंदमूळ वर्गीय पिकांसाठी तसेच मुळे खोलपर्यंत असणाऱ्या तणांच्या बंदोबस्ताकरिता खोल नांगरट आवश्यक असते.
चिकण मातीचे प्रमाण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा जमिनीतील निचराक्षमता सुधारण्याकरिता तीन-चार वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी लागते. मध्यम आणि भारी जमिनी पिकांची काढणी झाल्याबरोबर नांगरतात. त्यावेळी जमिनीत ओल असल्यामुळे नांगर ओढण्याकरिता बैलांना कष्ट कमी पडतात, ढेकळे कमी निघतात, नांगरलेली जमीन जास्त दिवस उन्हात तापल्यामुळे निर्जंतुक होऊन तिची सुपीकता वाढते व पोत सुधारतो. पिकाची काढणी झाल्याबरोबर ज्या जमिनी नांगरता येत नाहीत, त्या वाळून कठीण बनतात. अशा जमिनी वळवाच्या पावसानंतर अगर पावसाळ्यातील पहिल्या पावसानंतर नांगरतात. उन्हाने नांगरटीत निघालेली ढेकळे ठिसूळ होतात व ती नंतर औताने फोडणे सोपे जाते. नांगरटीमुळे लहान-मोठी ढेकळे निघतात, जमिनीचा पृष्ठभाग सपाट रहात नाही आणि मग पेरणी करण्यापूर्वी तिची अनेक प्रकारच्या अवजारांनी मशागत करावी लागते.
ज्या जमिनीत पेरलेले बी चांगल उगवून त्याची जोमदार वाढ होऊन त्यापासून भरपूर उत्पादन मिळते ती जमीन चांगली तयार केलेली आहे, असं समजावं, बी पेरण्यायोग्य, जमीन ओलसर, वाफशावर, बारीक पोताची, साधारण घट्ट अणि जरुर तेवढी खोल असावी.चांगली नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन मुळ जमिनीत खोलवर पसरतात आणि भरघोस उत्पादन मिळत. नांगरटीचा चांगला आणि योग्य फायदा मिळवण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करण अत्यंत आवश्यक आहे. नांगरट उताराला आडवी करावी. दर वर्षी नांगरट करावी लागते, तर काही जमिनीला दोन अगर तिन वर्षांनी जरुरी असते. शिवाय दर वर्षी नांगरट केल्यामुळे कही ठराविक खोलीवर कठिन थर निर्माण होतो. त्यामुळे निचरा होत नाही. म्हणून हा तयार झालेला कठिण थर सब सॉयलर या नांगराने नांगरट करावी.
• पूर्वीच्या पिकाची धसकटे, बुडखे निघतात.
• योग्य वेळी नांगरट केल्यामुळे जमीन दीर्घकाळ सूर्यप्रकाशात उघडी राहून उन्हानं चांगली तापते.
• किडीचे अवशेष म्हणजे अंडी-अळी-कोष नांगरटीमुळे वर येतात.उघडे पडतात आणि प्रखर उन्हामुळे त्यांचा नयनत होतो.
• शिवाय पिकांचा पालापाचोळा, निघालेली बुडखे, धसकटे जमिनीत गाडली जाऊन तिथं कुजतात.
• थराची उलथापालथ होती. जमीन भुसभुशीत होते.
• बागायती पिकं घेताना सुरवातीला त्यांना करावी लागणारी रान बांधणी आणि दिलं जाणार पाणी योग्य प्रकारे साठवण्यासाठी खोल नांगरट जरुर आहे.
• हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
• हरळी-कुंदा यांसारखी आणि इतर सोटमुळाचे बहुवर्षीय तन उलथून उघडे पडते आणि उन्हाने मरून जातात. नांगरट केल्यामुळे जमीन भुसभुशित होते.
• त्यामुळे जमिनीचा पोत आणि रासायनिक तसेच प्राणिज गुणधर्म सुधारतात. त्यामुळेच भरघोस उत्पादन मिळते.
• नांगरट जर उताराला आडवी केली तर उन्हाळी, वादळी पावसच पाणी अडवलं जातं आणि जमिनीत मुरवलं जातं. नांगरटीमुळे निचरा न होणाऱ्या भारी, चिकण आणि रेताड जमिनीत नायट्रोजन आणि पोटॅशियम याचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
नांगरटीचे फायदे
• जमीन भुसभूशीत होते.
• भुसभूशीतपणामुळे पीकास हवा व पाणी भरपूर मिळते.
• पीकास खत पुरवठा व्यवस्थित होतो.
• जमीन ऊन्हात तापल्यामुळे किड व त्यांचे कोष नष्ट होतात.
• जमीन ऊन्हात तापल्यामुळे तण व त्यांचे बी नष्ट होते.
नांगरट करताना घ्यावयाची काळजी
• ट्रॅक्टरला नांगराची जोडणी करताना व्यवस्थितपणे ती थ्री पॉईंट लिंकेजला जोडून सपाट जागेवर आणावा.
• नांगराचे फळ दोन्ही जमिनीला सामन्तर आहे का ते पाहावे, नसल्यास अप्पर लिंक व लोवर लिंक अॅडजस्ट करावी जेणेंकरून तो समांतर येईन.
• वरून पहिले असता अप्पर लिंक व PTO एकमेकाला समांतर असावे.
• पलटी नांगर असेल तर त्याला वंगन केलेले असावे म्हणजे व्यवस्थित पलटी होईल.
• नट बोल्ट व्यवस्थित फिट करून घ्यावे.
सबसॉयलर व मोल नांगर
सबसॉयलर
सबसॉयलरला हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून १.५ ते २ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते.
• पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर (हार्ड पॅन) फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्यृक आहे. हलक्याे व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत १.५ ते २ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालतो. नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्टोरच्या अश्वाशक्तीनुसार १.५ ते २ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.
• जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते.
• सबसॉयलरमुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.
• सबसॉयलर चालविण्यासाठी पावसाळ्यानंतर डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाईपलाईन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे व ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी.
• सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी.
• सबसॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा. सबसॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी.
मोल नांगर
मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जातात, याला मोल निचरा पद्धत असे म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात.
कार्यपद्धती :
• मोल पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो. त्यामुळे जमिनीखालून एक पोकळ फट तयार होते, त्याला मोल म्हणतात.
• मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी. त्यामुळे मोल वाळण्यास अवधी मिळून ते टणक बनतात.
• पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. तसेच जमिनीमध्ये मुरलेले अतिरिक्त पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होते. असे साठलेले अतिरिक्त पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर वाहून जाते.
• या पद्धतीत साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्टतरला जोडून वापरले जाते. प्रत्येकी ४ मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो. त्यामुळे क्षारपड – पाणथळ जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही, त्यांना ही पद्धत उपयुक्त ठरते.
मोल निचरा पद्धतीचे फायदे :
• मोल निचरा पद्धतीसाठी साधारणतः हेक्टयरी ३ हजार ते ४ हजार रुपये इतका खर्च येतो.
• मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास ३ ते ५ वर्षे टिकू शकते.
निचरा पद्धतीसंदर्भात शिफारशी :
• भारी काळ्या क्षारयुक्त – चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी आवश्य कतेनुसार जिप्सम या भूसुधारकाचा (आवश्यलकतेनुसार ५० टक्के) तसेच हिरवळीचे पीक धैंचा यांचा एकात्मिक वापर फायदेशीर आढळून आला आहे.
• कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. त्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी.
मोल निचरा पद्धत वापरण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता
• जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्यांा पेक्षा जास्त असावे.
• जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी ०.२ टक्के असावा. साधारणतः १ ते १.५ टक्के उतार असलेली जमीन मोल निचरापद्धतीसाठी उत्कृष्ट असते.
• मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असायला हवे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवरून चालवले जाते. त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. तसेच ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टळर जमिनीमध्ये रूतू शकतो. यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे, त्या खोलीवरील मातीतील ओलावा साधारणतः २० ते २५ टक्के असावा.
• मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी.
• दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे ४ मीटर अंतर ठेवावे.
• मोलची खोली ४० ते ७५ सें.मी. ठेवावी.
• मोलची लांबी सामान्यतः २० ते १०० मीटर ठेवावी.
• मोल निचरा करण्यासाठी साधारणतः ७५ किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्स पावरचा ट्रॅक्टओर वापरावा.
• मोल करत असताना ट्रॅक्टारचा वेग सामान्यतः १ कि.मी. प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा.
लेखक:
इंजी. वैभव सूर्यवंशी
(विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)
9730696554