पुणे ः उन्हाळी भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी तसेच कीड, रोगाचे योग्य व्यवस्थापन केले तर खरीपापेक्षा दीडदुपटीने उत्पादन मिळवता येते. भुईमुगाच्या पोषक वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची गरज असते. हे समशीतोष्ण हवामान भुईमूगाला उन्हाळ्यात प्राप्त होते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्यामुळेच हे पीक उन्हाळी हंगामात घेतले जाते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमुगाच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 24 ते 27 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची गरज असते व तापमान 20 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी झाल्यास शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते.
जळगाव येथे उद्या 8 जानेवारी शनिवार मत्स्यपालन कार्यशाळा –
असे करा व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात भुईमूगाच्या पेरणीची वेळ साधणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे पीक दिवस लहान व रात्र मोठी अशा वातावरणात फुलणारे पीक आहे. उन्हाळी भुईमूगाला जास्त फुलोरा येण्यासाठी दिवस फार मोठा नको. दिवस लांबला तर भुईमुगाची नुसती शाकीय वाढ होत राहते. उन्हाळी भुईमूगाला फुले लागण्याचा उत्तम काळ म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा होय. साधारणतः उन्हाळी भुईमूग उगवणीनंतर 30 ते 32 दिवसांनी फुलोर्यावर येतो व साधारणतः पाच ते सात दिवस चांगली उगवण होण्याकरिता लागतात. उन्हाळी भुईमूग पेरणीनंतर 35 ते 37 दिवसानंतर फुलोर्यावर येतो व फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 35 दिवस वजा केले तर 15 ते 20 जानेवारी हा कालावधी उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीसाठी उत्तम आहे.
प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… उद्या वितरण
तापमानाचा घटक महत्त्वाचा
उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यापूर्वी थंडीचे तापमान हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान थंडी नसेल तर पेरणी करावी. मात्र, अतिशय जास्त थंडी असल्यास अशा थंडीत भुईमूग पेरणी थोडी पुढे ढकलता येते. कारण उन्हाळी भुईमुगाची उगवण चांगली होण्यासाठी जमिनीचे तापमान 18 ते 27 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असणे अत्यंत आवश्यक आहे. वातावरणातील तापमानात वाढ झाली झाली तरी जमीन हळूहळू उबदार होते याची नोंद घ्यावी. अतिशय थंडीत भुईमुगाची पेरणी झाल्यास त्याचा भुईमुगाच्या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होऊन उगवणशक्ती कमी होते. टी. ए. जी. 24 सारखा 110 ते 115 दिवसांत परिपक्व होणारा उन्हाळी भुईमूग पिकाचा वाण 10 फेब्रुवारीपर्यंत पेरून सुद्धा उत्पादन घेता येते. मात्र, उशिरा पेरणी केल्यास उन्हाळी भुईमुगाचे पीक मान्सूनपूर्व पावसात सापडून नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. साधारणतः उशिरात उशिरा 10 फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी भुईमूग पेरणी करण्याची शिफारस केली जाते. मात्र, हवामानातील सर्व घटक लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य पेरणीची वेळ साधली तर उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळू शकते.