सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्रास होतो.उन्हाळा म्हटला की आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे उष्माघातचे प्रकार आपण नेहमी पाहत असतो. उन्हाळ्यात आपण आपल्या खाण्या-पिण्यात बदल करत असतो. शरीराची काळजी घेत असतो, जेणेकरुन आपले आरोग्य तंदुरुस्त राहिल. आपण ज्याप्रमाणे आपली स्वत: ची काळजी घेत असतो, त्याचप्रमाणे आपण जनावरांची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात तापमान साधारण ४२ ते ४८ सेल्सिअसपर्यंत पोहोचत असते. यामुळे जनावरांवराच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जनावरांच्या पचनशक्ती आणि दूध उत्पादन क्षमतेवरही परिणाम होत असतो.
अतिउष्णतेमुळे जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे. जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. उन्हाळ्यात हिरव्या वैरणीची टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुकी जनावरे ही या समस्येला सतत तोंड देत असतात. अशा परिस्थितीत जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. हे आजार झाल्यास काय उपाय करावे व आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे.
नाकातील रक्तस्राव
अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांनासुद्धा उन्हाळ्यात रक्तस्राव होत असतो. हा रक्तस्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यामध्ये जनावरांच्या नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते. अशा जनावरांना उपाय म्हणून त्यांच्या डोक्यावर थंड पाणी घालावे. जनावरांना भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत. रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्त्व “क’ आहारातून किंवा औषधाच्या माध्यमातून द्यावे.
विषबाधा
उन्हाळ्यात हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खात असतात, यामुळे विषारी वनस्पती बेशर्म, घाणेरी, गुंज, धोतरा खाण्यात येतात व जनावरांना विषबाधा होते. जनावरे गुंगल्यासारखी करतात, खात नाहीत, खाली बसतात व उठत नाहीत. त्यानंतर पाय सोडून ताबडतोब मरतात. विषबाधेची लक्षणे दिसताच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत.
उष्माघात
हा आजार अतिप्रखर सूर्याच्या किरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. उष्माघातामुळे जनावरांच्या शरीराची कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देणे कमी होते. यावर उपाय म्हणून जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे किंवा ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे व त्यावर वारंवार पाणी मारावे. अशा जनावरांना झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावे. भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी व चारा द्यावा. शक्य असल्यास पाण्यात मीठ व साखर टाकावी.
कडव्या
हा आजार अति प्रखर सूर्यप्रकाशामुळे जनावरांच्या कातडीला होतो. हा आजार प्रामुख्याने ज्या जनावरांच्या चामडीचा रंग पांढरा असतो, त्या जनावरांत याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो; कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत (चामडीत) “मेलेनीन’ नावाचा घटक कमी प्रमाणात असतो; तसेच चाऱ्याच्या अभावामुळे भुकेपोटी जनावरे गाजर (कॉंग्रेस) गवत खात असतात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता हा आजार होतो. या गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो. उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावे. भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावे. उपचारासाठी पशुवैद्यकाचे मार्गदर्शन घ्यावे.
कॅल्शिअमची कमतरता
उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालतात. वाढे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे वाढ्यामधील ऑक्झेलेट खनिज व जनावरांच्या शरीरातील कॅल्शिअम एकत्र होऊन लघवीवाटे निघून जाते, त्यामुळे कॅल्शिअमची पातळी कमी होते. त्यामुळे जनावरांना “मिल्क फिव्हर” नावाचा रोग होतो, त्यामुळे जनावरे थकून एकदम खाली बसतात. शरीराचे तापमान कमी होते, रवंथ बंद होते, जनावरे खात नाहीत, दूध देणे कमी होते, शरीर थंड पडते, जनावरे मान टाकून बसतात. यावर तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.
सौजन्य समाज माध्यम