• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी

Team Agroworld by Team Agroworld
January 3, 2021
in यशोगाथा
0
अंगावर शहारे आणणारी अरुणिमाची कहाणी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मंजिले बड़ी जिद्दी होती हैं
हासिल कहां नसीब से होती हैं
मगर वहां तूफान भी हार जाते हैं
जहां कश्तियां ज़िद पर होती हैं

व्हॉट्सअॅपवर सहजपणे कुणी तरी ही शायरी शेअर केली, तेव्हा लाइकचा एक थम्ब आपण सहजपणे देतो. या शायरीच्या अर्थामध्ये अजिबातच जात नाही. मात्र, जेव्हा अरुणिमाची कहाणी ऐकली तेव्हा या शायरीचा नव्याने अर्थ उमगला…

२०११ ची ही घटना आहे. अवघ्या 21 वर्षांची अरुणिमा लखनौहून दिल्लीला ट्रेनमधून येत होती. अचानक काही गुंड तेथे धुमाकूळ घालतात. प्रत्येकाला लुटत होते. कुणाची चेन ओढत होते. सगळे घाबरले होते. कोणीही विरोध केला नाही. विरोध केला तो फक्त एका मुलीने.. तिचं नाव अरुणिमा सिन्हा Arunima Sinha |.

गुंडांनी तिच्या गळ्यातली सोन्याची चेन खेचण्याचा प्रयत्न केला असता तिने जोरदार प्रतिकार केला.. दुर्दैवाने गुंडांसमोर तिचा निभाव लागला नाही. या गुंडांनी तिला धावत्या ट्रेनमधून थेट बाहेर फेकलं. त्याच वेळी बाजूनेच दुसरी ट्रेन येत होती. अरुणिमा त्या ट्रेनवर आदळली आणि खाली पडली. दोन्ही ट्रेन झपकन् निघून गेल्या. रेल्वे ट्रॅकवर रात्रीच्या नीरव शांतता भयानक होती. आवाज फक्त ट्रेनच्या धडाडण्याचा. तिने दोन हातांचा आधार देऊन उठण्याचा प्रयत्न केला तर काय…? मरणप्राय वेदनांनी ती विव्हळली. कारण तिच्या दोन्ही पायांवरून ट्रेन गेली होती. एका पायाची मांडी फक्त दिसत होती, तर दुसऱ्या पायाची हाडे बाहेर आली होती. ती वेळ रात्रीची होती. कोणत्या भागात आपण पडलो हेही तिला माहीत नाही; पण त्या भयंकर वेदनांनी कुणाचाही थरकाप उडेल अशी अवस्था होती. तरीही ती जिवाच्या आकांताने ओरडत होती.

कोणी तरी वाचवेल.. पण कोणीही आलं नाही! एवढ्या रात्री ट्रॅकवर येणार तरी कोण? ओरडून ओरडून तिचा आवाज क्षीण झाला. आता तिचा आवाजही फुटेना. डोळ्यांसमोरील चित्र धूसर होत चाललं होतं. दृश्यमानता कमी झाली होती. ट्रेन येत होत्या-जात होत्या. जाणवायचा तो फक्त भयावह कंप. ट्रॅकवर उंदरं सैरावैरा पळत होते. ते तिचे पाय कुरतडत होते. तिचा मेंदू तेवढा जागेवर होता, पण शरीर निश्चल झालं होतं. यातून आता बाहेर कसं पडायचं, हाच विचार तिच्या मनात घोळत होता. संपूर्ण रात्र ती असहायपणे तशीच पडली होती. सकाळ झाली. गावातली लोकं आली. तेव्हा तिला कळलं, की आपण उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात आहोत. ग्रामस्थांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. या रुग्णालयात कदाचित पहिल्यांदाच अशी रुग्ण दाखल झाली होती, जिच्यावर उपचार करताना भयंकर उणिवा जाणवल्या. ते डॉक्टर आपापसांत चर्चा करत होते. ती चर्चा अरुणिमाच्या कानावर पडली…

“अरे आपल्याकडे अॅनेस्थेशिया नाही, रक्त नाही. आता हिच्यावर उपचार तरी कसा करायचा?”

शब्द कानी पडल्यानंतर कुणीही रुग्ण गर्भगळित झाला असता… पण कोण कुठून अरुणिमाला हिंमत आली नि म्हणाली, “डॉक्टर, माझे पाय कटल्यानंतर मी संपूर्ण रात्र रेल्वेच्या ट्रॅकवर काढली. आता वेदनांचं भय राहिलं नाही. तुम्ही माझा पाय भूल न देताच कापा.”

तो प्रसंग असा होता, की दुसरा कोणताही पर्याय समोर नव्हता. त्या डॉक्टरांनी तिला भूल न देता पाय मांडीपासून वेगळा केला. डॉक्टर आणि फार्मासिस्टने तिला एकेक युनिट ब्लड दिलं. हे इतकं भयंकर होतं, की ऐकलं तरी काळजाचा थरकाप उडतो. या घटनेला आता नऊ वर्षे उलटली आहेत; मात्र अरुणिमाला या वेदना आजही अस्वस्थ करतात. जेव्हा जेव्हा ती हा प्रसंग आठवते, तेव्हा तेव्हा तिला त्या वेदना आजही जाणवतात. ही घटना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली तेव्हा अरुणिमाची एक ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली होती. एक राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू शरपंजरी अवस्थेत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अरुणिमाची रवानगी लगेच लखनौच्या केजीएमसी (किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज) रुग्णालयात झाली.

क्रीडामंत्र्यांच्या शिफारशीनंतर तिची रवानगी लखनौहून दिल्लीच्या ‘एम्स’ AIIMS | ट्रॉमा सेंटरमध्ये झाली. तोपर्यंत सगळं काही ठीकठाक होतं. एक खेळाडू म्हणून तिला चांगली ट्रीटमेंट मिळू लागली. ‘एम्स’मध्ये ती जवळजवळ चार महिने होती.चार महिन्यांनी ती सुस्थितीत आली आणि वृत्तपत्रांत अरुणिमाच्या साइड स्टोऱ्या येऊ लागल्या. त्या वाचून तिला धक्काच बसला. एक बातमी अशी होती… ‘तिकीट नव्हते म्हणून अरुणिमाने घेतली रेल्वेतून उडी!’ अरुणिमाच्या कुटुंबाने या बातमीचं जोरदार खंडण केलं. त्यानंतर दुसरी न्यूज आली… ‘अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला…’ ज्या मुलीच्या शरीराचा एक तुकडा कापला गेला, जिला माहिती नव्हतं, की आपण आता चालू शकू किंवा नाही, व्हीलचेअरवर बसता येईल की नाही… तिला हेही माहीत नव्हतं, की तिच्या स्पाइनमध्ये तीन फ्रॅक्चर होते.बेडवरून उठताही येईल की नाही, हेही तिला माहीत नव्हतं. अशा वेळी कल्पनाच करवत नाही, की तिच्या मनात काय चाललं असेल? तिच्या कुटुंबाची काय अवस्था झाली असेल? अशात या बातम्यांनी तिच्या मनावर आघात होऊ लागले होते. शरीरावरील जखमा भरता येतात, पण मनावरचे हे आघात कसे भरतील? या आघातांना मात्र अरुणिमा धैर्याने सामोरी गेली. तिने ‘एम्स’च्याच बेडवर निर्धार केला, की मी स्वतःला पुन्हा सिद्ध करून दाखवीन की मी कोण आहे? तिने निर्णय घेतला, की आता व्हॉलिबॉल नाही, तर जगातील सर्वांत साहसी खेळ निवडेन. तिने निवडलं माउंट एव्हरेस्ट! Mount Everest |

इथं काळीज धस्स होतं… क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या ज्या एव्हरेस्टच्या कुशीत अनेक निष्णात गिर्यारोहकांनी जीव गमावला होता, तेथे अरुणिमा अकाली आलेल्या अपंगत्वासह एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार करीत होती. एव्हरेस्टवर जायचं तर उत्तम मार्गदर्शक हवा, दुसरं म्हणजे पैसा. कारण एव्हरेस्ट मोहिमेसाठी खर्च येतो तब्बल ४०-५० लाखांचा. अरुणिमाने तर एवढे पैसे कधीच पाहिलेले नव्हते आणि ते उभे करणे तिच्यासाठी केवळ अशक्यच. त्यासाठी हवा होता प्रायोजक. अरुणिमाने जेव्हा लोकांसमोर आपला प्रस्ताव ठेवला तेव्हा तिच्या वाट्याला टोमणेच अधिक आले… “काय, एव्हरेस्ट? वेडी झालीस का? तू करू शकणार नाही. एक कृत्रिम पाय, दुसऱ्यात रॉड. स्पाइनमध्येही फ्रॅक्चर आणि स्वप्न एव्हरेस्टचं! त्यापेक्षा एखादी नोकरी कर.” लोकं तिचं जखमी शरीर पाहत होते; पण तिच्या अंतरात्म्यात काय चाललंय हे पाहण्याची त्यांची क्षमता नव्हती. अशा वेळी अरुणिमाने लोकांचं ऐकलं नाही, ऐकलं ते तिच्या अंतरात्म्याचं. कारण तोच तिचा आता प्रेरणास्रोत होता. तिचा भाऊ, तिचं कुटुंबच तिच्यासाठी आधारस्तंभ होतं. त्यांनी तिला सांगितलं, मॅडम बचेंद्री पाल Bachendri Pal | यांना आपण भेटूया. कारण १९८४ मध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखराला गवसणी घातली होती. त्या आपल्याला नक्की मदत करतील.

इथे अरुणिमाला आशेचा किरण दिसला. एम्समधून बाहेर पडल्याबरोबर अरुणिमा घरी जाण्याऐवजी थेट बचेंद्री पाल यांना भेटण्यासाठी निघाली. त्या वेळी तिच्या पायाचे स्टीचेसही काढलेले नव्हते. अरुणिमासमोर एकच ध्येय होतं, ते म्हणजे एव्हरेस्ट कसं सर करता येईल? ती बचेंद्री पाल यांच्यासमोर गेली. बचेंद्री यांनी तिला पाहिलं आणि म्हणाल्या, “तू अशा अवस्थेत एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला. म्हणजे तू तुझ्या अंतरात्म्यात तर एव्हरेस्ट सर केलंच आहेस, आता तुला फक्त लोकांसाठी एव्हरेस्ट सर करायचं आहे.”

हे वाक्य अरुणिमासाठी हजार हत्तींचं बळ देणारं होतं. कारण कुटुंबाबाहेरची बचेंद्री एकमेव अशी महिला होती, ज्यांनी अरुणिमावर विश्वास व्यक्त केला होता. आता अरुणिमाने नियोजनही केलं होतं आणि ज्या मार्गदर्शकाची उणीव होती, तीही भरून निघाली होती; पण सगळं काही मनासारखं होतंच असं नाही. जेव्हा माणूस मैदानात उतरतो तेव्हा कळतं की आपण नेमके काय आहोत ते. तिचं प्रशिक्षण सुरू झालं. आधी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत चालत जावे लागते. पाठीवर भली मोठी साहित्याची बॅग असते. बेसकॅम्पचा तसा हा अगदीचा सोपा भाग. धडधाकटांना येथे पोहोचण्यासाठी केवळ दोन मिनिटे लागतात, अरुणिमाला तेवढेच अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते!

कारण तिच्या उजव्या पायाची हाडंही व्यवस्थित जुळलेली नव्हती आणि डावा पाय कृत्रिम असला तरी त्या पायाचे घाव मात्र ओले होते. जोरात पाय ठेवला तर त्यातून रक्त बाहेर येत होतं. इतर गिर्यारोहक तिला म्हणायचे, “अरुणिमा सावकाश चाल.” अरुणिमा विचार करायची, की आपण ज्या एव्हरेस्टचं नियोजन केलं, तेथे मी या लोकांच्या बरोबरीने चालूही शकत नाही? तिने त्याच वेळी संकल्प केला, की एक दिवस मी यांच्या आधी बेस कॅम्पपर्यंत पोहोचेन. विश्वास बसणार नाही, पण आठ महिन्यांनंतर अरुणिमाने पाठीवर सामान घेतलं आणि ती बेस कॅम्पपासून सर्वांसोबत निघाली आणि टॉपवर सगळ्यांच्या आधी पोहोचली. अरुणिमाला आनंद झाला. त्यापेक्षा तिला आनंद या गोष्टीचा झाला, जेव्हा तिला सगळे विचारायचे, “मॅडम, तुम्ही काय खातात? पाय नाहीत; पण तरीही तुम्ही कशा काय चालतात?” ही प्रगती पाहिल्यानंतर अरुणिमाला अखेर प्रायोजक मिळाला.

अरुणिमाची खरी कसोटी आता लागणार होती. कारण तिच्यासमोर पहिलं आव्हान होतं, शेर्पाला स्वतःविषयी समजून सांगणं, की मी हे करू शकते. एव्हरेस्ट मोहिमेला निघताना सोबत शेर्पा असणे महत्त्वाचे असते. ती शेर्पाला भेटली.शेर्पाला जेव्हा कळले, की हिच्या एका पायात रॉड आहे, तर दुसरा कृत्रिम पाय आहे, तेव्हा त्याने तत्क्षणी सांगून टाकलं, “मी नाही घेऊन जाऊ शकत. कारण तुझ्यामुळे माझाही जीव जाईल.” मात्र, बचेंद्री पाल आणि अरुणिमाने त्याला कसं तरी राजी केलं, तेव्हा तो मदत करण्यास तयार झाला. एव्हरेस्ट दिसायला जितका सुरेख आहे, तितकाच तो भयंकर आहे. अरुणिमाच्या टीममध्ये सहा जण होते. त्यात अरुणिमा सर्वांत पुढे होती. पण जसजशी ती पुढे गेली तेव्हा तिचा कृत्रिम पाय हिरव्या आणि निळ्या बर्फावरून घसरायचा. जेव्हा ती पाय पुढे टाकायची, तेव्हा तो कृत्रिम पायच वळायचा. कारण त्याला संवेदना नसतात. ती हा पाय मांडीपासूनच नियंत्रित करू शकत होती.

शेर्पा म्हणाला, “नाही होऊ शकत, अरुणिमा. तू जबरदस्ती करू नकोस.”

कृत्रिम पायाने चालण्याचा तिचा सरावही झाला नव्हता आणि ती एव्हरेस्ट सर करणार होती. कारण कृत्रिम पायाने चालण्याचाही विशेष असा सराव असतो. त्याला किमान तीन ते चार वर्षे लागतात. अरुणिमा दोन वर्षेही उलटली नाही तर एव्हरेस्टकडे निघाली होती! अरुणिमा त्याला म्हणाली, “काळजी करू नको. मला माहिती आहे. कारण हा माझा पाय आहे आणि तो कसा चालतो हे मला माहीत आहे.” एकदा, दोनदा नव्हे, तर पाच वेळा पाय घसरला; पण पाय ठेवल्यानंतर बर्फाचा तुकडा निघायचा तेव्हा त्यावर ग्रीप मिळून ती पुढे जाऊ लागली. कॅम्प ३ पर्यंत तर सर्व काही ठीक होतं; पण कॅम्प 3 नंतर खरी कसोटी लागली. जेव्हा दक्षिणी मार्गाने चालू लागतो, तेव्हा अनेक निष्णात गिर्यारोहकांनाही घाम फुटतो.

या मार्गावर अक्षरशः गिर्यारोहकांना मरताना पाहणं भयंकर असतं. एव्हरेस्टवर कूच करण्यासाठी रात्रीचा प्रहर उत्तम मानला जातो. कारण त्या वेळी वातावरण शांत असतं. अरुणिमाचाही प्रवास रात्रीच सुरू होता. नजर फिरेल तिथे तिला हेडलाइटच्या प्रकाशात मृतदेह पडलेले पाहायला मिळाले. तिचं अंग शहारलं. तिला कळत नव्हतं, की पुढे काय वाढून ठेवलंय? ती ज्या रोपमध्ये होती तेथून पुढे जात असताना एक बांगलादेशी तिला दिसला. त्याचा हात हलत होता आणि वेदनेने कण्हत होता. अरुणिमाला भीतीने कमालीचे ग्रासले. ऑक्सिजन संपल्याने तो मृत्यूच्या दारात उभा होता आणि आपण त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही ही सल अरुणिमाला सारखी सलत होती. अरुणिमा तेथे दहा ते पंधरा मिनिटे उभी राहिली आणि सगळ्यांना म्हणाली, “आपण सर्वांनी शिखर सर केलं तर ठीक आहे; पण नाही करू शकलो तर मी तुम्हा सर्वांसाठी एव्हरेस्ट सर करीन.” अरुणिमाला एक माहिती होतं, की जसा आपण विचार करू तसं आपलं शरीर त्या दिशेने काम करू लागतं. त्या बांगलादेशीचा मृतदेह रोपवरच अडकलेला होता. त्याच्या बाजूने जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. तुम्हाला तो मृतदेह ओलांडूनच पुढं जावं लागतं. अरुणिमाची टीम दक्षिणी मार्गाने पुढे निघाली, त्याच वेळी शेर्पाने अरुणिमाला जोराचा झटका दिला. अरुणिमाने शेर्पाकडे पाहिलं.

तो म्हणाला, “अरुणिमा, तू माघारी परत. तुझा ऑक्सिजन संपत आला आहे.”

शेर्पाने दिलेली ही धोक्याची घंटा होती. तुम्ही शिखरापासून हातभर जरी असला तरी ऑक्सिजनशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. अरुणिमा हिलरी स्टेपवर Hillary Step | होती. या या हिलरी स्टेपपासून काही अंतरावरच एव्हरेस्टचं शिखर summit | होतं. शिखर डोळ्यांसमोर आहे आणि कुणी तुम्हाला म्हणालं, माघारी परता. त्या वेळी काय अवस्था होईल? मुळात अरुणिमा माघारी परतण्यासाठी आलीच नव्हती. किंबहुना माघार हा तिच्या शब्दकोशात नव्हताच. आता अशा ठिकाणी ती पोहोचली होती, तेथे साक्षात ब्रह्मदेवाने जरी सांगितलं असतं, तरी तिने त्याचं ऐकलं नसतं. इथे तर एक शेर्पा तिला सांगत होता!

अरुणिमा त्याला म्हणाली, “अरे काय सर, मी अजिबात माघारी परतणार नाही.”

शेर्पा म्हणाला, “अरुणिमा, जीव वाचला तर पुन्हा येशील.”

पण अरुणिमाने मनाचा निग्रहच केला होता, की माघारी परतायचं नाही. आयुष्यात असे प्रसंग एकदाच येतात. आता निर्णय तुमचा असतो, की माघारी परतायचं की शिखर सर करायचं? अरुणिमाने दुसरा पर्याय निवडला. कारण तिला प्रायोजक मोठ्या मुश्किलीने मिळाला होता. यदाकदाचित ती माघारी परतली असती, तर पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेसाठी तिला प्रायोजक मिळणंही शक्य नव्हतं.कारण बचेंद्री पाल आणि तिच्या आईने तिला सांगितलं होतं, की आयुष्यात अशीही स्थिती येते, जेव्हा निर्णय घेताना तू एकटीच असशील. तुझ्यासोबत दुसरं कुणीही नसेल. अशा वेळी तू मागे फिरून पाहा आणि विचार कर, की तू कशी एकेक पाऊल टाकून इथपर्यंत पोहोचली आहेस. आता पुढे पाऊल टाकशील तर शिखर तुझ्या कवेत असेल. अरुणिमाच्या डोक्यात पहिल्यांदा हेच वाक्य आलं. तिने शेर्पाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, “भाऊ, चल सोबत.”त्याने ऐकलं नाही. अरुणिमाने मात्र पुढे पाऊल टाकलं. ती पुढे निघाली आणि तिच्या मागे शेर्पाही निमूटपणे आला. त्यानंतर एक ते दीड तासाने अरुणिमा शिखरावर होती. अरुणिमाला त्या वेळी मोठ्याने ओरडावंसं वाटलं. ज्यांना तिच्यावर विश्वास नव्हता त्यांना ती सांगू पाहत होती, की मी आज जगातील सर्वोच्च शिखरावर आहे. ज्यांनी पराभवानंतर उठायचा प्रयत्न केला नाही, त्यांना तिला सांगायचं होतं, की डर के आगे जीत है…!! अपंगत्व शरीराने असतं; मनाने, बुद्धीने नाही. जर बुद्धीने माणूस विकलांग असेल तर हातपाय सक्षम असूनही तो विकलांगच असतो. अरुणिमाला सांगायचं होतं, की मी अपंग नाही. अरुणिमा शिखरावर पोहोचली तेव्हा ती शेर्पाला म्हणाली, “आता माझा फोटो काढ…”

शेर्पा म्हणाला, “वेडी झालीस का? फोटो काढण्यात वेळ दवडू नकोस. तुझा ऑक्सिजन संपत आलाय.”

अरुणिमा ऐकायला तयार नव्हती. शेर्पाने संयम बाळगत अखेर तिच्या हट्टापायी तिचा फोटो काढला.अरुणिमाचे एवढ्यावरच समाधान झाले नाही.

म्हणाली, “आता व्हिडीओपण काढ.”

इथे शेर्पाची अवस्था हसावं की रडावं अशी झाली होती. तब्बल ८८४८ मीटर उंचीवर पोहोचलेल्या अरुणिमाचा ऑक्सिजन जवळजवळ संपत आला होता. त्यात अरुणिमा व्हिडीओ काढण्याचा हट्ट धरतेय म्हंटल्यावर शेर्पाचा आता संयम सुटला.

तो म्हणाला, “तू वेडी झालीस काय? मी नाही काढणार व्हिडीओ. मी चाललो आता.”

अरुणिमा म्हणाली, “अरे असे करू नका. व्हिडीओ सुरू कर.”

तसेही अरुणिमाने चार-पाच कॅमेरे सोबत घेतले होते. एखादा काम करू शकला नाही तर दुसरा काम करेल. साहजिकच कुणालाही वाटेल, की अरुणिमाने कशाला व्हिडीओ काढण्याचं खूळ डोक्यात घ्यायचं? ही मोठी रिस्क होती.

पण अरुणिमाच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू होता. तो म्हणजे कदाचित आपण जिवंत परतलोच नाही तर…? जर आपण जिवंत परतलोच नाही तर हा व्हिडीओ भारतात अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. अरुणिमाने शेर्पालाही तसं सांगितलं होतं. कारण ११ एप्रिल २०११ रोजी तिचा अपघात झाला, ज्यात तिने पाय गमावले होते आणि आता २१ मे २०१३ रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी ती जगाच्या सर्वोच्च शिखरावर होती.अखेर शेर्पाने तिचा व्हिडीओही बनवला. या व्हिडीओमध्ये तिचं वाक्य होतं.. “प्रत्येकाने लक्ष्य सेट केलं तर तो कधीच हार मानू शकत नाही. तो आपल्या शिखरावर नक्की राहील.” शेर्पा म्हणाला, “आता चल पटापट खाली उतर.”अरुणिमाही म्हणाली, “हो, आता उतरायलाच हवं.” सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी शिखर गाठणारी अरुणिमा अकराच्या सुमारास खाली उतरायला लागली तेव्हा तिला ही कल्पना होती, की एव्हरेस्टच्या इतिहासात सर्वाधिक मृत्यू खाली उतरतानाच झाले आहेत. एव्हरेस्टच्या या उतरंडीला आत्महत्येचा प्रयत्न म्हंटला जातो. अरुणिमा खाली उतरत असताना काही अंतरावरच अरुणिमाचा सगळा ऑक्सिजन संपला. ज्या शिखरावर ऑक्सिजनचा लवलेशही नाही, तेथे अरुणिमाने कृत्रिम ऑक्सिजनही गमावला होता. जेथे प्राणवायूच संपतो, तेथे शरीर निश्चल होतं. तो हळूहळू मृत्यूच्या दिशेने एक प्रवास असतो. अरुणिमा धाडकन् पडली.शेर्पाने तिला आधार दिला नि म्हणाला, “अरुणिमा, मला विश्वास नव्हता, की तू शिखरापर्यंत जाऊ शकशील; पण तू करून दाखवलेस. आता तुला उठायला हवं. उभी राहा आणि चालू लाग.” शेर्पा तिला उभं करण्याचा प्रयत्न करीत होता; पण अरुणिमा उभीच राहू शकली नाही. काय कोण जाणे, पण जसे मानवाचे काही नियम असतात, तसे त्या देवाचेही काही नियम असतात. त्याच्या यादीत अरुणिमाचं नावच नव्हतं. जर यादीत नावच नव्हतं, तर तो अरुणिमाचे प्राण कसे घेणार?

अरुणिमाने तसाही मृत्यू जवळून पाहिला होता, जेव्हा तिला ट्रेनमधून बाहेर फेकलं होतं तेव्हा ती तब्बल सात तास तिथे पडलेली होती. एकदोन नव्हे, तर तब्बल ४९ ट्रेन तेथून आल्या नि गेल्या होत्या. त्यामुळे अरुणिमाला असं वाटत होतं, की जर मला देवाने अशा भयंकर स्थितीतूनही वाचवलं असेल तर ते काही तरी इतिहास रचण्यासाठीच असू शकेल. त्याच वेळी एक ब्रिटिश गिर्यारोहक खालून वर येत होता. त्याच्याकडे दोन ऑक्सिजनच्या बाटल्या होत्या. त्याने एक बाटली अरुणिमाकडे फेकली आणि तो पुन्हा खाली जाण्यास निघाला. कारण शिखरावर जाण्यास वातावरण अनुकूल नव्हतं. हा कोणता चमत्कार होता? हे सगळंच अनाकलनीय होतं.

शेर्पा म्हणाला, “अरुणिमा, तू खूप लकी आहेस. कारण शिखरावर तुला प्राणवायू मिळाला, जो अनेकांच्या नशिबी नसतो.” शेर्पा तिच्याशी बोलताना नेहमी ‘लकी’ या शब्दावर जोर द्यायचा. पण तिला ते मान्य नव्हतं. कारण लक त्याच्याच सोबत असतं, ज्याच्याकडे जिंकण्याची धमक असते.कदाचित अरुणिमाने शेर्पाचं ऐकलं असतं नि माघारी फिरली असती तर…?

अरुणिमा शिखर सर करून खाली येत होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. पण ती कुणाशी शेअरही करू शकत नव्हती. कारण तिच्यासोबत शेर्पा होता, आजूबाजूला विखुरलेले मृतदेह होते आणि पर्वत होता. ती खाली येत होती. पाय घसरू नये म्हणून ती बर्फावर थोडे खाचे पाडत खाली येत होती. अचानक तिचा कृत्रिम पाय बाहेर आला. उणे 60 अंश तापमानात हात थंड पडले होते. हाताच्या मुठीही वळत नव्हता. संवेदना संपत चालल्या होत्या. हातातून रक्त येत होतं. अपघातात आधीच तिने एक पाय गमावलेला होता. शीतदंशामुळे Frostbite | कदाचित हातही कापावा लागला तर…?

शीतदंशाच्या तीन स्टेज असतात- लाल, निळा आणि काळा. जर हात लाल झाला तर ती शीतदंशाच्या दिशेने सुरू असलेला पहिला टप्पा असतो. पुढे तो काळा झाला तर हात कापण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. अरुणिमा शेर्पाला म्हणाली, “माझा हात वळत नाही. काही तरी होतंय.”शेर्पा म्हणाला, “त्याचा विचार करू नको. जेवढे खाली जाता येईल तेवढा प्रयत्न करीत राहा.” शेर्पा पुढे चालत होता, तर अरुणिमा त्याच्या मागे. एव्हरेस्ट शिखराचा हा परतीचा प्रवास इतका भयंकर असतो, की तेथे युद्धासारखे काळजावर दगड ठेवून निर्णय घ्यावे लागतात. अरुणिमा शेर्पाला म्हणाली, “मी जर चालू शकले नाही तर तू अजिबात थांबू नकोस. मला सोडून निघून जा.”

कारण अरुणिमाला नशिबाने ऑक्सिजन Osygen Bottle | मिळाला होता, पण कृत्रिम पाय आता बाहेर येत होता. त्यामुळे चालता येत नव्हते. इथे शेर्पा तरी काय करणार? त्याची काहीही चूक नव्हती. मग त्याने अरुणिमासाठी स्वतःचा जीव तरी गमवावा? अरुणिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते सुचत नव्हतं. दुसऱ्याच क्षणी तिच्या लक्षात आलं, की रडून काही मिळणार नाही. तिने एका हाताने रोप पकडला आणि ती पायाने घसरत घसरत खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हताच. एक तर कसंबसं घसरत जावं, नाही तर सोडून द्यावं या पलीकडे दुसरा कोणताही विचार नव्हता. अरुणिमा घसरत घसरत रॉकपर्यंत आली आणि तिथे कृत्रिम पाय बाहेर काढून पुन्हा व्यवस्थित फिट केला.कॅम्प ४ ते शिखर हे अंतर ३५०० फूट आहे. हे अंतर कोणताही गिर्यारोहक सोळा ते सतरा तासांत पूर्ण करतो. अरुणिमाला तब्बल २८ तास लागले होते.

अरुणिमाचा हा प्रवासच श्वास रोखणारा होता. ज्याने ज्याने तिला पाहिलं त्या सर्वांनी असंच मानलं होतं, की अरुणिमा आता जिवंत परतणारच नाही.जेव्हा अरुणिमा कॅम्प 4 वर पोहोचली आणि तिने तंबूची चेन उघडून आत प्रवेश केला, तेव्हा सगळे विस्मयचकित झाले.

ते म्हणाले, “अरे तू आलीस? आम्हाला वाटलं तू गेलीस!”

हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी तिला ऐकायला मिळालं; पण अरुणिमा आली होती. सगळ्यांनी आनंद सेलिब्रेट केला.अनेकांना वाटलं, की अरुणिमाने एव्हरेस्ट कृत्रिम पायाने सर केला; पण वस्तुस्थिती तशी नव्हती. तिने शिखर सर केलं मन आणि बुद्धीच्या जोरावर!!

अर्थात, अरुणिमा इथेच थांबली नाही. तिने जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरं सर केली. आशिया खंडातील एव्हरेस्ट तर सर केलंच आहे. पाठोपाठ तिने आफ्रिका खंडातील किलीमांजारो Kilimanjaro |, युरोप खंडातील एल्ब्रसही Elbrus | जिंकलं.

जगातील सात सर्वोच्च शिखरांना गवसणी घालणारी ती पहिली दिव्यांग महिला ठरली. तिच्या या अतुलनीय कामगिरीचा देशभर नव्हे, जगभर गौरव झाला. 2015 मध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. तेन्झिंग नोर्गे सर्वाेच्च शिखर सन्मान, अर्जुन पुरस्कार, फर्स्ट लेडी पुरस्कार, 2016 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद…

अरुणिमाला सगळं काही मिळालं. अर्थात, त्यासाठी तिला स्वतःला सिद्ध करावं लागलं.. सीतेने दिलेली अग्निपरीक्षा वेगळी होती. मात्र, अरुणिमाने दिलेल्या या परीक्षांना काय म्हणावं? राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटूने गुंडांशी केलेल्या झटापटीत पाय गमावले एवढ्यावरच तिची कहाणी कदाचित संपली असती..

मात्र, खूप कमी असतात, जे स्वतःचा इतिहास लिहितात. अरुणिमा त्यातलीच एक होती.

आपल्या या प्रेरणादायी प्रवासावर ती नेहमी सांगत असते…

अभी तो इस बाज की असली उडान बाकी है
अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है
अभी अभी मैने लांघा है समुंदरों को
अभी तो पूरा आसमां बाकी है

(https://kheliyad.com/ या संकेतस्थळावर गाजलेल्या माउंट एव्हरेस्ट मालिकेतून साभार…)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: AIIMSअरुणिमाअॅनेस्थेशियाएव्हरेस्टकृत्रिम ऑक्सिजनकृत्रिम पायगिर्यारोहकदिल्लीबेस कॅम्पमृत्यूमॅडमरक्तलखनौशीतदंशशेर्पा
Previous Post

आज २ जानेवारी ; आज महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस.

Next Post

पावनखिंड भाग – 18 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – 18 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish