निलेश बोरसे, नंदुरबार
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झिरपवाडी येथील विशाल दत्तात्रय माने या 28 वर्षीय महत्वकांक्षी तरुणाने हायड्रोपोनिक शेतीत मैलाचा दगड रोवला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विशाल माने यांनी सुरुवातीला इतरांप्रमाणे कंपनीत नोकरीही केली. परंतु काहीतरी करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातूनच त्यांनी अवघ्या दहा गुंठ्यात आधुनिक हायड्रोपोनिक शेतीचा सेटअप उभारला असून तब्बल 18 लोकांना रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे. विशेष म्हणजे, विशाल माने हे केवळ हायड्रोपोनिक शेतीच करीत नाहीत, तर त्याचे इतरांना ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणही देतात. संपूर्ण भारतात या तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी जगदंब हायड्रोपोनिक फार्मिंग या कंपनीची स्थापना केली असून आतापर्यंत त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेकांना हायड्रोपोनिकचा सेटअपही उभारुन दिला आहे. विषमुक्त भाजीपाला घरच्याघरी कसा पिकवता येईल व त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून बेरोजगारी कशी दूर करता येईल, यासाठी ते गेल्या पाच-सहा वर्षांपासून तरुणांना मार्गदर्शन करीत आहेत.
कौटुंबिक पार्श्वभूमी
विशाल माने यांच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्याकडे शेतजमीन असण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यातच वडिलांचे निधन झाल्याने विशाल यांच्यावरील जबाबदारी वाढली. म्हणून काहीतरी नवीन बिझनेस करायचा, हा विचार विशाल यांना स्वस्थ बसू देत नव्हता. परंतु, नवीन काहीतरी सुरु करायचे म्हटले म्हणजे भांडवलाचाही प्रश्न होताच. त्यामुळे मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करत असतानाच विशाल व त्यांच्या काही मित्रांनी एकत्र येत सन 2015 मध्ये शेळीपालनाला सुरुवात केली. परंतु, शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने शेळीपालनाचा व्यवसाय सुरु होताच संपुष्टात आला. शिक्षण पुढे सुरु राहिले. त्यातच कॅमिन्स इंडीया प्रा. लि. कंपनीची शिष्यवृत्ती मिळत असल्यामुळे विशाल माने हे काही पैसे भांडवलासाठी जमा करत गेले. जेणेकरुन भविष्यात काहीतरी उद्योग करता येईल.
कंपनीतील नोकरीतून घेतला अनुभव
मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतरांप्रमाणे विशाल माने यांनीही पुण्यातील एका कंपनीत नोकरी करण्यास सुरवात केली. परंतु, केवळ 8 हजार 200 रुपये मासिक पगार मिळत असल्याने घरखर्च भागविणे कठीण जात होते. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ते सतत नाविण्याच्या शोधात होते. नोकरीत मन लागत नसले तरी स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यास तो कसा संचलित करावा, याचा अनुभव विशाल यांनी या कंपनीतून घेतला. वर्षभरातच त्यांनी कंपनी व्यवस्थापनाचे सर्व तंत्र आत्मसात केले.
चार्यापासून केली सुरवात
विशाल माने यांनी सुरवातीला हायड्रोपोनिकमध्ये चारा पिके घेण्यास सुरवात केली. त्यातून त्यांना पिके घेण्याचा व व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आला. सुमारे तीन, साडेतीन वर्षे त्यांनी चारा पिके घेतली. त्यानंतर मार्च 2020 मध्ये पहिले लॉकडाऊन लागले आणि विशाल माने यांच्या आयुष्याला जणू कलाटणी मिळाली. कारण, लॉकडाऊनमध्ये भाजीपाला मिळणेही कठीण झाले होते. शिवाय नागरिक आरोग्य व खाण्यापिण्याच्या बाबतीत लोक अधिक सजग झाले होते. त्यामुळे घरच्या घरीच स्वतःला लागणारा भाजीपाला पिकवल्यास विषमुक्त भाजीपाला उपलब्ध होईल, असा विचार विशाल यांच्या डोक्यात आला. हा विचार विशालने कुटूंबियांना बोलून दाखविला. त्याला कुटूंबियांनी सकारात्मक प्रतिसाद तर दिलाच शिवाय अतिरिक्त भाजीपाला पिकवून तो परिसरातील लोकांनाही उपलब्ध करुन दिल्यास सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल, असे सांगत विशालला पाठबळ दिले.
असे वळले हायड्रोपोनिक शेतीकडे
पुण्यातील खाजगी कंपनीत नोकरी करीत असतानाच 2014-15 मध्ये विशाल माने यांना हायड्रोपोनिक शेतीची माहिती मिळाली. माती विना शेतीचे हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचे त्यांच्यातील उद्योजकीय नजरेने हेरले. स्वतःचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले असल्याने त्यांनी हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची बारिकसारिक माहिती घेण्यास सुरवात केली. त्यासाठी यूट्यूबवरील देश-विदेशातील व्हिडिओ तर पाहिलेच शिवाय हैद्राबाद, दिल्ली, बंगलोर येथे जाऊन या तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष माहिती घेतली. हायड्रोपोनिक शेतीसाठी भरपूर पाणी किंवा मोठ्या जागेची आवश्यकता नसल्याने तसेच बाराही महिने पिके घेता येणे शक्य असल्याने हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एक ते दीड वर्षे या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी 2016 मध्ये हायड्रोपोनिक शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कंपनीला रामराम ठोकून ते पूर्णतःहायड्रोपोनिक शेतीकडे वळले. सुरवातीला त्यांच्या कुटूंबियांकडून विरोध झाला खरा, नंतर मात्र यातील यश पाहून कुटूंबियांचेही पाठबळ विशाल यांना मिळत गेले.
स्वतःच उभारला हायड्रोपोनिकचा सेटअप
हायड्रोपोनिक शेतीचा सेटअप उभारण्यासाठी विशाल माने यांनी सुरवातीला मित्रांच्या पाठबळातून गावातच दहा गुंठे जागा घेतली. त्यातील पाच गुंठे जागेत शासकीय अनुदानातून पॉलिहाउस उभारले. या पॉलिहाउसमध्ये हायड्रोपोनिकचा सेटअप स्वतःच उभारला. याबाबत विशाल माने सांगतात, की हायड्रोपोनिक तंत्रज्ञानासाठी पॉलिहाउसच उभारले पाहिजे, असे नाही. तर आपण कोणती पिके घेतो, त्यावर ही बाब अवलंबून आहे. शिवाय हायड्रोपोनिकचा सेटअप उभारण्यासाठी सुरवातीला काही प्रमाणात खर्च येतो. परंतु, हा सेटअप उभारल्यानंतर दहा वर्षे कोणताच खर्च करावा लागत नाही. सेटअप तोच राहतो, इरिगेशन सिस्टिम तीच असते, कोकोपीट लागत नाही, ग्रो बॅग लागत नाही. तसेच मातीतील शेतीप्रमाणे ट्रॅक्टर किंवा अतिरिक्त मजुर खर्चही लागत नाही. शिवाय येणार्या उत्पादनाची पूर्णतः हमी असते. त्यामुळे मातीविना शेतीचे हे तंत्रज्ञान फायदेशीर असल्याचे विशाल माने सांगतात. हायड्रोेपोनिकचा सेटअप उभारण्यासाठी स्वतःच पाईप, हजार लिटर पाण्याची टाकी व इतर साहित्य आणून त्यांनी 5 गुंठे जागेत हा सेटअप उभारला आहे.
भाजीपाला उत्पादनात केली एन्ट्री
पहिल्या लॉकडाऊन नंतर विशाल यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार त्यांनी आपल्या पाच गुंठे जागेत काकडी, टमाटे, गिलके, भेंडी, वांगे, भोपळा, रंगीत ढोबळी मिरची, गवार, कारले अशी आठ ते दहा पिके घेण्यास सुरवात केली. यात कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा किटकनाशकांचा वापर त्यांनी केला नाही. संपूर्ण ऑग्रेनिक पद्धतीने त्यांनी एक्सपोर्ट क्वालिटीचे भाजीपाला उत्पादन घेतले. या भाजीपाल्याचे जवळपास 20 ते 25 कुटूंबांना नियमितचे ग्राहक बनवून त्यांना घरपोच ताजा भाजीपाला ते पुरवू लागले. ताजा व ऑर्गेनिक भाजीपाला मिळू लागल्याने त्यांच्या भाजीपाल्यास मागणी वाढू लागली. पाच गुंठ्यात ढोबळी मिरचीचे सुमारे 80 ते 100 किलो उत्पादन होऊन तिला 180 रुपये किलोचा विक्रमी दर मिळाला. या मिरची उत्पादनासाठी त्यांना प्रतिकिलो 32 ते 38 रुपये खर्च आला होता. मिरचीला चांगला भाव मिळाल्याने विशाल यांचा आत्मविश्वास आणखीनच वाढला.
हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून चांगली कमाई
हायड्रोपोनिक शेतीच्या माध्यमातून चांगली कमाई होत असल्याचे विशाल माने सांगतात. आठ-दहा गुंठे जागेत आठ ते दहा प्रकारचा भाजीपाला घेऊन व तो 20 ते 25 कुटूंबांना नियमित पुरवून महिन्याला सुमारे 20 हजार रुपये कमाई होऊ शकते, असा विश्वास विशाल माने व्यक्त करतात. त्यांनी आपले नियमित ग्राहक निश्चित केले असून त्यांना दर आठवड्याला ताजा विषमुक्त भाजीपाला ते पुरवितात. शिवाय इतर कंपन्यांशीही त्यांची बोलणी सुरु आहे. त्यांच्याकडूनही मागणी झाल्यास, त्यांनाही भाजीपाला पुरविणार असल्याचे विशाल माने सांगतात. सध्या त्यांना आपल्या पाच गुंठ्यातून नियमित व खात्रीशीर उत्पन्न मिळणे सुरु झाले असून यातून त्यांनी तब्बल 18 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. यात ट्रेनिंग सेंटरमधील कर्मचारी व मजुरांचा समावेश आहे. यातून त्यांची वर्षाला लाखोंची उलाढाल होत आहे.
असे करतात व्यवस्थापन
विशाल यांनी हायड्रोेपोनिक शेती करताना आपल्या ग्राहकांना दररोज ताजा व विषमुक्त भाजीपाला कसा उपलब्ध करुन देता येईल, याचे उत्तम नियोजन केले आहे. मातीतील शेतीत एक पीक घेतल्यानंतर दुसर्या पिकासाठी दोन-तीन महिने वाट पहावी लागते, परंतु, हायड्रोपोनिकमध्ये बाराही महिने दररोज पीक कसे उपलब्ध होऊ शकते, याची प्रचिती विशाल यांच्या हायड्रोपोनिक शेतीला भेट दिल्यानंतर येते. त्यांनी आपल्या पाच एकर जागेत पॉलिहाऊस उभारले असून त्यात काकडी, टमाटे, गिलके, भेंडी, वांगे, भोपळा, रंगीत ढोबळी मिरची, गवार, कारले असा आठ ते दहा प्रकारचा भाजीपाला ते घेतात. यात पालेभाज्यांसाठी त्यांनी एनएफटी (न्युट्रीएंटस फिल्म टेक्नॉलॉजी) स्ट्रक्चर व फळपिकांसाठी ग्रो बॅग स्ट्रक्चर तयार केले आहे. एनएफटी स्ट्रक्चरमधील पिकांना पाणी देण्यासाठी विशाल यांनी एक हजार लिटरची पाण्याची टाकी जमिनीत बसविली आहे. या टाकीतील पाणी पाईपद्वारे पिकांच्या मूळांना स्पर्श करुन पुन्हा टाकीत येते. त्यासाठी टाकीला प्रेशर गेज व फिल्टर बसविण्यात आला आहे.
जेणेकरुन पिकांना आवश्यकतेप्रमाणेच पाणी मिळेल. टाकीतून पिकांना जाणारे हे पाणी पिकांच्या मूळांना स्पर्श करुन पुन्हा टाकीत आल्यानंतर या पाण्याचा पीएच कंट्रोल होऊन ते पाणी पुन्हा पिकांना पाईपद्वारे मिळते. ही प्रक्रिया सातत्याने सुरु असते. तसेच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक (न्युट्रीएंटस) देखील याच पाण्याच्या टाकीत टाकले जातात. पिकांच्या वाढीनुसार व आवश्यकतेनुसार ते पंधरा-वीस दिवसांनी दिले जात असल्याचे विशाल सांगतात. त्याच त्या पाण्याचा वापर होत असल्याने पाच गुंठ्यातील पिकांना हजार लिटर पाणी सुमारे 20 ते 25 दिवस पुरते. यामुळे पाण्याची बचत होते. तण येण्याचा प्रश्न नसतो, नांगरणी व किंवा काढणीसाठी मजुर लावण्याची गरज पडत नाही. यातून फार मोठ्या खर्चाचीही बचत होत असल्याचे विशाल आवर्जून सांगतात. शिवाय नैसर्गिक आपत्तीने होणार्या नुकसानाची भितीही कमी असते. या पिकांची काढणी झाल्यानंतर त्याठिकाणी लागलीच दुसरे रोप (दीड-दोन महिन्याचे) लावले जाते. ही रोपे अगोदर याच ठिकाणी असलेल्या लहानशा नर्सरीत कोकोपिटच्या साहाय्याने वाढवली जातात. ती रुट झोन (मुळ्या) आल्यानंतर ही रोपे हायड्रोपोनिक सेटअपमध्ये लावली जातात. म्हणजेच पूर्वीची पिके काढणी होईपर्यंत नवीन रोप नर्सरीत तयार झालेले असते. यामुळे वेळ वाचतो. तसेच भाजीपाला उत्पादन नियमित मिळते.
तर ग्रो बॅग स्ट्रक्चरमध्ये 16 बाय 16 बाय 30 सेंटीमीटर आकारच्या ग्रो बँगमध्ये फळपिके घेतली जातात.
ग्रो बँगमधील या पिकांना पाणी व न्युट्रीएन्टस हे इरिगेशन सिस्टीमद्वारे दिले जाते. यामुळे पिकांची व्यवस्थित व निरोगी वाढ होते. यात झाडाची वाढ कमी होत असली तरी त्यास फळधारणाही उत्तम होते. कारण इरिगेशनच्या सहाय्याने थेट मुळांना न्युट्रीएन्टस दिली जातात. यामुळे मुळ्या मोठ्या प्रमाणात पसरत नाहीत. तसेच पाणीही
मर्यादीत लागते. यासाठीही विशाल यांनी ऑटोमेटीक तंत्रज्ञानाचा वापर केला असून पिकांच्या आवश्यकतेनुसार पाणी न्युट्रीएन्टस दिले जातात. यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीची फळे येतात. ग्रो बॅगची ही टेक्नॉलॉजी संपूर्ण भारतात स्विकारली जावी, अशी विशाल यांची इच्छा आहे. कारण यासाठी शेतजमिनीची किंवा खूप पाण्याची आवश्यकता नसते.
किड रोग व्यवस्थापन
विशाल माने यांनी संपूर्ण हायड्रोपोनिक सेटअपला पॉलिहाऊस उभारले आहे. त्यामुळे बाहेरील किटक येण्याचा धोका कमी असतो. असे असले तरी किड रोग व्यवस्थापनाचा धोका लक्षात घेता, पिकांवर निम ऑईल, करंज ऑईलचा वापर केला जातो. शिवाय विशाल यांनी स्वतः एक ऑर्गेनिक पेस्ट तयार केली आहे. या पेस्टचा वापर देखील किडरोग नियंत्रणासाठी केला जातो. कोणत्याही
रासायनिक किटकनाशकांचा वापर न करता संपूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने किटकांचा नायनाट केला जातो. यामुळे विशाल यांच्या हायड्रोपोनिक शेतातील कोणतेही फळ किंवा भाजीपाला न धुताही थेट खाऊ शकतो.
प्रशिक्षण देण्यास सुरवात
आपल्याप्रमाणे नागरिकांनीही घरच्या घरी टेरेसवर, बाल्कनीत किंवा अंगणात हायड्रोपोनिकचा सेटअप उभारल्यास त्यांनाही स्वतःपुरता लागणारा भाजीपाला सहज पिकवता येईल, तसेच बेरोजगार तरुणांनी व्यवसायिक दृष्टीकोनातून मोठा सेटअप उभारल्यास त्यांना अर्थार्जनाचे चांगले साधन निर्माण होईल, या विचारातून विशाल यांनी या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपल्या जगदंब हायड्रोपोनिक फार्मिंग कंपनीमार्फत सशुल्क प्रशिक्षण देण्यास तसेच सेटअप उभारुन देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी त्यांनी उर्वरीत पाच गुंठे जागेत ट्रेनिंग सेंटर उभारले. यातूनही त्यांना उत्पन्नाचे एक साधन निर्माण झाले आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ते प्रशिक्षण देतात. त्यात हायड्रोपोनिकचा सेटअप उभारण्यापासून ते लागवड, किडरोग व्यवस्थापन, पाण्यातून पिकांना पोषक घटक देणे (न्युट्रीएंट़स), भाजीपाल्याचे मार्केटिंग, हार्वेस्टिंग आदी सर्व माहिती दिली जाते. आतापर्यंत त्यांच्याकडून शेकडो तरुणांनी हे प्रशिक्षण घेतले असून काहींनी प्रत्यक्ष सेटअप उभारुन भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरवातही केली आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर हायड्रोपोनिक शेती उत्तम पर्याय ठरु शकतो, असेही विशाल माने आवर्जून सांगतात.
भविष्यातील नियोजन
भाविष्यातील नियोजनाबाबत विशाल माने सांगतात, की मला हायड्रोपोनिकची माहिती मिळविण्यासाठी तसेच सेटअप उभारण्यासाठी संपूर्ण भारतात फिरावे लागले. तसे इतरांना फिरावे लागू नये, या विचारातून जगदंब हायड्रोपोनिक फार्मिंग या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ट्रेनिंग सेंटर देखील सुरु केले आहे. या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून हायड्रोपोनिक शेतीचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते शिवाय ज्यांना सेटअप उभारायचा आहे, त्यांना तो उभारुनही दिला जातो. इतकेच नव्हे तर सेटअप उभारण्यासाठी कच्चा मालही उपलब्ध करुन दिला जातो. भविष्यात देशभरात हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम वेगाने करण्याचे नियोजन असल्याचे विशाल माने सांगतात. यातून नागरिकांना घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला पिकवता येईल. तसेच बेरोजगार तरुणांना किंवा भूमिहिन शेतकर्यांना रोजगाराचे खात्रीशीर साधन उपलब्ध होईल, असा विश्वास विशाल माने व्यक्त करतात.
हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय?
हायड्रोपोनिक शेती म्हणजेच माती विना शेती. हे मूळचे ईस्त्राईलचे तंत्रज्ञान आहे. कारण तिथे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. परंतु, आता या तंत्रज्ञानाचा वापर भारतासह इतर देशांनीही सुरु केला आहे. हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक्स म्हणजे कार्यरत. म्हणजेच पाण्यावर कार्यरत असलेली शेती. यात मातीचा वापर न करता केवळ पाण्यातून पिकांना हवे असलेले घटक देऊन त्यांची वाढ केली जाते. ही पद्धत वापरुन आपण आपल्या टेरेसवर, अंगणात, गॅलरीत किंवा एखाद्या भिंतीवरही भाजीपाला उगवू शकतो. माती विना शेती ही अतिशय सोपी व स्वस्त असून यातून घेतली जाणारी पिके आरोग्यास चांगली असतात. या पद्धतीत रासायनिक औषधांचा वापर नसल्याने उत्पादन होणारे पीक विषविरहीत असते. याचा एक फायदा असाही आहे की, वनस्पतीची वाढ कमी असून याला फळे, फुले लवकर येतात. हायड्रोपोनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे विशाल माने आवर्जुन सांगतात.
हायड्रोपोनिक तंत्रज्ञान काळाची गरज
आजच्या घडीला शेती हे सर्वांत मोठे क्षेत्र आहे. प्रत्येक घरात भाजीपाला लागतो. त्यामुळे आजच्या तरुणांसह शेतकर्यांनी हायड्रोपॉनिक शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. किमान घरी लागणारी भाजी घरीच पिकविल्यास कुटूंबियांचे आरोग्य चांगले राहील. लॉकडॉऊनमुळे ज्यांच्या नोकर्या गेल्या आहेत, त्यांनी आपल्या सोसायटीत जागा घेऊन त्यात हायड्रोपोनिकचा सेटअप उभारल्यास संपूर्ण सोसायटीला भाजीपाला पुरवता येऊ शकतो. यामुळे नोकरीवर अवलंबून न राहता, कमाई देखील चांगली होईल. एक किंवा दोन एकरात भाजीपाला लावल्यास नियमित 25-30 घरांना केमिकल विरहीत व ताजा भाजीपाला पुरवल्यास चांगले अर्थाजन होऊ शकते. विशेष म्हणजे हायड्रोपोनिक शेती कोणीही व कुठेही करु शकतो.
– विशाल दत्तात्रय माने, झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा मो. नं. 9561621500
https://www.youtube.com/watch?v=wBcnUUkdavE
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Dairy Farming – नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करणाऱ्या डेअरी सिस्टर्स अर्थात न्यू यॉर्क फार्म गर्ल्स
Inspiring Dairy Farming यशोगाथा : आधुनिक दुग्धव्यवसाय कसा करावा? आयआयटी इंजिनियर तरुणाने गावात उभा केला 44 कोटींचा डेअरी उद्योग; कसे ते जाणून घ्या ..
आधुनिक शेती : नाशिक जिल्ह्यातील उच्चशिक्षित जाधव कुटुंब दरवर्षी घेतेय 20 लाखांचे उत्पन्न Outstanding Practices!!
शेतीत रासानिक, सेंद्रियचा समन्वय… प्रयोगशील शेतकरी उमेश बंग यांचा शेतीचा यशस्वी मंत्र
चांगली माहिती दिली