पुणे ः वातावरणात सध्या हवामानातील बदलाचा सर्व घटकांना जसा फटका बसत आहे. तसा फटका बीजोत्पादन कार्यक्रम राबवणार्या कंपन्यांनाही बसत आहे. महाबीजच्या संदर्भातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने महाबीजने चक्क उन्हाळ्यात बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे.
सध्या वातावरणात कधी अतिवृष्टी तरी अवकाळी पाऊस होत आहे. शेतकर्यांवर निसर्गाचे हे संकट तर नेहमीच डोक्यावर घोंगावत असते. त्यामुळे अशा वातावरणीय प्रतिकूल परिस्थितीचा फटका हा शेती पिकांना बसतो व उत्पादनात फार प्रमाणात घट येते. बीजोत्पादन कार्यक्रम राबवणाऱ्या कंपन्यांनाही बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. महाबीज ही कंपनी खरीप तसेच रब्बी हंगामातील विविध पिकांचे बियाणे पुरवण्यात प्रथमस्थानी आहे.
उन्हाळ्यात बीजोत्पादन
सोयाबीन पिकाचा विचार केला, तर सोयाबीनचे बियाणे महाबीज मोठ्या प्रमाणात पुरवते. परंतु या वातावरण बदलाचा फटका बीजोत्पादन कार्यक्रमाला बसून बीजोत्पादनात देखील घट येत आहे. त्यामुळे महाबीजने बीजोत्पादनासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महाबीजने बीजोत्पादनाचा कार्यक्रम चक्क उन्हाळ्यात घेण्याचे ठरविले आहे. राज्यात महाबीजकडून उन्हाळ्यात २५ हजार हेक्टरवर सोयाबीनचे बीजोत्पादन केले जात आहे. सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून उत्पादनात घट झाली आहे. नेमके पीक काढणीला आल्यानंतर नैसर्गिक संकटे येतात व मालाचा दर्जा खराब होतो. याचा फटका बीजोत्पादनाचा देखील बसत आहे. त्यामुळे बीजोत्पादनाचा माध्यमातून दर्जेदार बियाणे मिळवताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महाबीजने उन्हाळ्यात बीजोत्पादन करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी महाबीज ने २५ हजार हेक्टरसाठी नियोजन केल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
——————–