पुणे : वातावरणात सध्या थंडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशातच काहीसे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर होताना दिसून येत आहे. विशेषतः घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव हरभऱ्यावर होत आहे. रोप अवस्थेत हरभर्यांमध्ये रोप कुरतडणाऱ्या अळी देखील काही भागात निर्माण होत आहेत. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने काही उपाययोजना सूचविल्या आहेत. त्यांचा अवलंब करुन किडींचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला विद्यापीठ शास्त्रज्ञांनी दिला आहे.
हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभऱ्यावर पडणारे बुरशीचे रोग आणि होणारा किडीचा प्रादुर्भाव यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट होते. त्यामुळे हरभरा वाढीच्या वेळेला मर, मानकुजव्या, मुळकुज यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोखला जावा सोबतच घाटे अळीसारख्या किडींपासून हरभर्याचे संरक्षण व्हावे, यासाठी आतापासूनच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हरभऱ्यावर पडणारा मर रोग हा फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीतून आणि बियांद्वारे देखील होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी सहा वर्षापर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. मात्र, ज्या भागात हवामान जास्त थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो. मरचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाचा जमिनीवरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात. हा रोग पडू नये यासाठी वेळेवर पेरणी होणे गरजेचे आहे. सोबतच मोहरी किंवा जवस हे आंतरपीक म्हणून घ्यावे असाही सल्ला शेतकर्यांना देण्यात आला आहे.
कीड रोग व्यवस्थापन
घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतामध्ये इंग्रजीतील ‘टी’ आकाराचे प्रती एकरी २० पक्षी थांबे लावावेत. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रती एकरी २ कामगंध सापळे लावावेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. यात इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० टक्के ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १२५ ग्रॅम फवारावे. जमिनीलगत रोपे कुरतडणार्या अळीचा प्रादुर्भाव असल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के २० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ४०० मिली खोडाभोवती आळवणी करावी, असा सल्ला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या ०२४५२-२२९००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.