पुणे – आपला देश हा कृषी प्रधान आहे. उद्योग धंद्यांना मिळणारा 80% हून अधिक कच्चा माल हा शेतीतून मिळतो. त्यातही महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षीत तरुण शेती व शेतीपूरक उद्योगात येत आहेत. ही खरतर भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्याची मोठी संधी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोडशेडिंग महाराष्टातील खेड्यांना विळखा घालून बसले आहे. त्यातही पाणी असूनही विजेअभावी शेतीसाठी ते देता येत नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. अनेक सत्तांतरे झाली पण या गंभीर प्रश्नाला बगल दिली गेली. सिंगल फेज, थ्री फेज, 8 – 8 तासांचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले, पण लोडशेडिंग कायम ठेवले आहे. इतर उद्योगांप्रमाणे शेतीतील लोडशेडिंग कायमचे हद्दपार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. हीच मागणी पुणे येथील प्रेमाली येवले यांनी पत्राच्या माध्यमातून अॅग्रोवर्ल्ड कडे केली.
शेतीवर याचे प्रतिकूल परिणाम पुढीलप्रमाणे –
1) शेतीच्या सिंचनाच्या कामात अडथळे निर्माण होतात. पर्यायाने उत्पन्न कमी होते.
2) वीजेच्या उपलब्धतेनुसार शेतकरी रात्री-अपरात्री शेतीसाठी पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी करतो आणि यामुळे बऱ्याचदा साप, विंचू-काटा चावून अपघात होतात. अनेकदा रात्रीच्या वेळी खड्ड्यांमुळे अपघात घडतात. जागरणामुळे आरोग्यावर होणारे त्रासही सहन करावे लागतात.
3) ज्या ज्या वेळी थ्री फेज वीज पुरवठा होतो, तेव्हा शेतीच्या कामासाठी शेतकरी सज्ज होतो. पण त्यातही खंडित वीजपुरवठा, नादुरुस्त विजेचे फ्यूज, कधी कमी तर कधी अतिउच्च दाबावे वीज पुरवठ्यामुळे फिडर नादुरुस्त होतात. यामुळे शेतकरी अधिक हवालदिल होतो.
4) लोडशेडिंगमुळे वीजबचत होत नाही. कारण रात्री-अपरात्री कधी ना कधी शेतीच्या कामासाठी तेवढीच वीज वापरली जाते. फक्त असुविधेमुळे शेतकरी बेजार होतो.
5) शेतीचे उत्पन्न आणि पर्यायाने अर्थ व्यवस्था यांच्या दरात घसरण होते.
6) वीजपुरवठा हा सशुल्क असूनही शेतकरी त्रास सहन करत आहे.
7) अनेक नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ यांनी आधीच शेतकरी त्रासला आहे त्यातही लोडशेडिंगचा मनस्ताप.
8) आता खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे निदान रब्बी हंगामातील पिकांची तरी पुरेसा व दिवसा वीज पुरवठा करून उपाय योजना आता करण्यात यावी.
9) इतर उद्योगांप्रमाणे शेतकऱ्याला 24 / 7 वीजपुरवठा केल्यास शेतीच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल पर्यायाने उद्योगधंदे तेजीत येतील.
10) वीजपुरवठा 24 / 7 केला तरीही त्याचे बिल भरणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग बंद करण्यात यावे.
11) 24/7 वीजपुरवठा मिळणे हा शेतकऱ्यांचा मुलभुत अधिकार आहे.
लोडशेडिंग या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, राजकारणाचा कोणताही रंग न देता समाजकारण करुन शेतकऱ्यांच्या हिताचा आग्रह धरला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनो, उठा.. संघटीत व्हा.. आणि एकत्र येऊन चांगला बदल घडवा. सरकारनेही क्रांतिकारी बदल करून शेतीत येऊ घातलेल्या सुशिक्षित तरुण पिढीचा उत्साह वाढेल, त्यांना शाश्वती वाटेल, असे उपाय योजण्याची गरज आहे.
– प्रेमाली कदम येवले, पुणे 93566 18549
Kharch 24 tas vi pahije ch shetila